अमित शहांच्या विरोधात वंचित बहुजनचे राज्यभर आंदोलन:भाजपचे चारित्र्य दिसून आले, प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बेताल विधान केले होते. त्यांनी केलेल्या या विधानाच्या निषेधार्थ राज्यात अनेक भागांमध्ये वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केले आहे. मुंबई येथील महानगर पालिकेच्या इमारतीच्या समोर वंचितच्या कार्यकर्त्यांनी जमा होत जोरदार आंदोलन केले. यावेळी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर देखील उपस्थित होते. या आंदोलनावेळी प्रकाश आंबेडकर यांनी जमलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी अमित शहा यांच्यावर जोरदार टीका देखील केली आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, अमित शहाला वाचवायला नरेंद्र मोदी धावून आले. आपल्याला माहीत असेल की, या मुंबईत एक रंगा बिल्ला नावाची जोडी होती आणि आताचे हे रंगा बिल्ला एकमेकांना वाचवत आहेत. प्रकाश आंबेडकर म्हणाले, मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगायचे आहे की, बाबासाहेब आंबेडकरांना असे संबोधल्याने आम्हाला काही फरक पडणार नाही पण तुमचे चारित्र्य समोर येत आहे. पंतप्रधान मोदींनी आपल्या गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अन्यथा हे आंदोलन सुरूच राहील, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, कॉंग्रेसने बाबासाहेबांचा पराभव केला असे भाजप सांगते. पंतप्रधान नरेंद्र मोदी मइ तुम्हाला विचारतो की, या मध्य मुंबई मधील 1952 च्या लोकसभा निवडणुकीत आरएसएस आणि डावे पक्ष एकत्र होते की नाही? हे सांगा. या दोघांनी मिळून मध्य मुंबईमध्ये बाबासाहेबांना निवडणूकीत हरवले आहे. हा इतिहास आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विरोध करणाऱ्या सर्वांचे मी स्वागत करतो. या विरोधात लाखोंच्या संख्येने बाहेर पडावे, असे आवाहन सर्वांनी केले आहे. आज आम्ही हा संताप मोर्चा शांततेने करत आहोत पण भविष्यात आमचा मोर्चा संतापाने भरलेला असेल, हा आमचा मार्ग आहे. अमित शहा यांनी केलेले विधान हे द्वेषपूर्ण भावनेतून केले असल्याचा आरोप वंचितकडून करण्यात येत आहे. तसेच वंचितचे लातूर शहर अध्यक्ष सचिन गायकवाड यांनी शहा यांनी बिनशर्त माफी मागावी आणि तसे न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. काय म्हणाले होते अमित शहा?
राज्यसभेत संविधानावर झालेल्या चर्चेदरम्यान अमित शहा म्हणाले होते की, “आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर म्हणण्याची फॅशन झाली आहे. त्यांनी एवढ्या वेळा देवाचे नाव घेतले असते तर त्यांना स्वर्गात स्थान मिळाले असते.” शहा यांच्या या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांचे नेते भाजपवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत.