सुनीता जमगडे प्रकरणात नवा खुलासा:एका धर्मगुरुने अटारीमार्गे पाकमध्ये जाण्याचा दिला होता सल्ला; नेमके कोणाला भेटली?

नागपूरच्या सुनीता जमगडे हिने पाकिस्तानात जाण्यासाठी एलओसी ओलांडल्याच्या घटनेत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुनीताने याआधी दोन वेळा अटारी बॉर्डरमार्गे पाकिस्तानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र दोन्ही वेळा ती अपयशी ठरली. या प्रकरणात एक महत्त्वाचा खुलासा झाला आहे, सुनीताला अटारी बॉर्डरमार्गे पाकिस्तानात जाऊ शकते, असा सल्ला एका पाकिस्तानी ख्रिश्चन धर्मगुरूने दिला होता. हा ख्रिश्चन धर्मगुरू तिला भारतातील एका धार्मिक कार्यासाठी तयार करण्यात आलेल्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर भेटला होता, असा दावा तिने तपास यंत्रणांकडे केला आहे. त्यामुळे आता तपास यंत्रणा या प्रकरणाचा सखोल छडा घेत असून, भारतामधील धार्मिक व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाकिस्तानातील हा धर्मगुरू कसा आणि कोणत्या हेतूने सामील झाला? या दिशेने तपास सुरू आहे. पाकिस्तानात जाण्यासाठी एलओसी ओलांडणाऱ्या नागपूरच्या सुनीता जमगडे हिच्या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सुनीताचा मुलगा, जो एलओसी ओलांडण्याच्या घटनेच्या वेळी तिच्यासोबत होता, त्याला आता काश्मीरमधून नागपूरात आणण्यात आले आहे. सुनीता 14 मे रोजी कारगिलजवळून LOC क्रॉस करून पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेली होती. त्या घटनेनंतर तिचा मुलगा कारगिल येथील बालकल्याण समितीच्या ताब्यात होता. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याला नागपूरला परत आणण्यात आले आहे. दरम्यान, सुनीताने एलओसी ओलांडण्यामागील नेमके कारण काय होते आणि तिने कोणत्या पाकिस्तानी नागरिकाला भेटण्यासाठी ही धोकादायक कृती केली, याबाबत ती पोलिसांना सहकार्य करत नसल्याचे समजते. ती चौकशीदरम्यान उडवाउडवीची उत्तरे देत असून, पाकिस्तानातील ‘झुल्फिकार’ नावाच्या एका व्यक्तीला भेटण्यासाठीच तिने एलओसी पार केली होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. 14 मे रोजी एलओसी ओलांडताच पाकिस्तानी रेंजर्सने तिला ताब्यात घेऊन चौकशी केली आणि दोन दिवसांनी तिला बीएसएफ जवनांकडे सुपूर्त केले. सध्या सुनीता नागपूर पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. झुल्फिकार नेमका कोण आहे? सुनीता जमगडे हिला पाकिस्तानात भेटण्यासाठी ज्याच्याकडे गेल्याचे सांगितले जात होते, त्या ‘झुल्फिकार’ नावाच्या व्यक्तीविषयी संशय वाढला आहे. झुल्फिकार हा खरोखरचा व्यक्ती आहे का, की तो केवळ पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी तयार केलेला बनावट सोशल मीडिया अकाउंट होता? याचा तपास आता भारतीय तपास यंत्रणा करत आहेत. त्यामुळे प्रकरण केवळ एलओसी ओलांडण्यापेक्षा अधिक गंभीर आणि संभाव्य राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, सुनीता जमगडे हिला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता तिला 2 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्या कोठडीचा कालावधी आज संपत असल्यामुळे तिला पुन्हा न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे. पोलिस आणि तपास यंत्रणा आता तिच्याकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, विशेषतः ‘झुल्फिकार’शी तिचा संपर्क नेमका कसा झाला आणि त्यामागचा हेतू काय होता, याचा छडा लावण्यावर भर दिला जात आहे.