स्वातंत्र्य संपू लागलं की संस्कृती रसातळाला जाते:साहित्य अकादमी पुरस्काराचे मानकरी सुधीर रसाळांचे प्रतिपादन; वाचा रोखठोक मुलाखत! VIDEO

स्वातंत्र्य संपू लागलं की संस्कृती रसातळाला जाते:साहित्य अकादमी पुरस्काराचे मानकरी सुधीर रसाळांचे प्रतिपादन; वाचा रोखठोक मुलाखत! VIDEO

लेखक असो, चित्रकार असो, गायक असो; कुठल्याही कलावंताला निर्मिती करू द्यायची असेल, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावं लागतं. तो समाजाच्या विरोधात असला, तरी त्याला व्यक्त होता आलं पाहिजे. तरच श्रेष्ठ दर्जाचं वाङ्‍मय आणि कला निर्माण होईल. एका हिंदूनं मुसलमान घरातील मुलाशी, मुलीशी लग्न केलं की झालं लोकांनीच मारायचं. हे सुरू झालं तर आचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नष्ट व्हायला लागेल. स्वातंत्र्य नष्ट व्हायला लागलं की संस्कृती रसातळाला जाते. आपण केवळ पशू म्हणून जगू लागतो…ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. त्या औचित्याने त्यांच्याशी साधलेल्या संवादाचा संपादित भाग… सुधीर रसाळ यांच्या विंदांचे गद्यरूप पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याची गोड बातमी आली. खरं तर हा पुरस्कार मिळायला खूप उशीर झाला. तो आधीच मिळायला हवा होता. असो, या बातमीनं मन मोहरून गेलं. रसाळ सरांशी दिलखुलास गप्पा कराव्यात म्हणून त्यांची वेळ घेतली. ठरल्याप्रमाणं दुपारी दोनच्या सुमारास त्यांच्या घराची बेल वाजवली. वातावरणात थंडी होतीच. दार उघडलं गेलं. झब्बा, त्यावर स्वेटर घातलेले सर समोर आले. तोच उत्साह, त्याच स्मितानं स्वागत. सरांनी आमचं तोंड आवर्जुन गोड केलं. मग अखंड गप्पा सुरू झाल्या. रसाळ सरांना त्यांच्या वाटचालीबद्दल विचारलं. म्हणाले, निझामी राजवटीत वाढलो. तेव्हाचा हैदराबाद प्रदेश. निझामाला प्रांताची भाषा उर्दू करायची होती. सगळं शिक्षण उर्दूत. त्यानं इथल्या मराठी, कन्नड, तेलगू भाषांची गळचेपी सुरू केलेली. तेव्हाच्या औरंगाबादहून नगर, नाशिकला जायचंही अतिशय कष्टाचं काम. औरंगाबादहून मनमाडपर्यंत मीटरगेज. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ब्रॉडगेज. त्यामुळं इकडून तिकडं जाणं दिव्यच. बरं औरंगाबादहून पुण्याला जायचं, तर मध्ये गोदावरीवर पूल नाही. छोट्या-छोट्या नावेत बसून पलीकडं जावं लागायचं. शक्यतो पश्चिम महाराष्ट्राचा मराठवाड्याशी संबंध येऊ नये याची एक तरतूद निझामानं केलेली. इथं ग्रंथालयं स्थापन झालेली नव्हती. बाहेरून पुस्तकं येऊ दिली जात नसत. आलेली पुस्तकं सेन्सॉर केली जायची. हरी नारायण आपटे यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांना बंदी होती. कारण त्यात इस्लामविरुद्ध भूमिका घेतली, असं त्याचं म्हणणं. मराठी वर्तमानपत्र नव्हतं. मराठीत पुस्तकं छापली जात नव्हती. मराठी प्रकाशन संस्था नव्हत्या. असं सगळं मध्ययुगीन वातावरण. तरीही इथं लेखक निर्माण होतं. तरुण कथाकार सुंदर हस्ताक्षरात कथा लिहून काढी. त्याचे बाइंडिग करून हेच आपलं पुस्तक म्हणे. आमचं ऐकणं सुरू होतं. रसाळ सर आठवणीत रमलेले. म्हणाले, औरंगाबादला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आलेले. ते धावणी मोहल्ला भागात उतरलेले. याचा अतिशय आनंद मराठी माणसांना झालेला. त्यामुळं त्यांच्या नावानं ग्रंथालय स्थापन करायचं ठरलं. मात्र, निझामानं टिळक नावाला परवानगी नाकारली. मग इथल्या लोकांनी टिळक नाही, तर त्यांचं मूळ नाव लावू असं ठरवलं. अन् बळवंत मोफत वाचनालय इथं सुरू झालं. मराठवाड्यातल्या जनतेनं खचून जावू नये म्हणून कर्त्या लोकांनी जागोजाग कुस्तींच्या तालमी सुरू केल्या. ग्रंथालंय स्थापन केली. त्यातून लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. स्टेट काँग्रेस सुरू झाली. मात्र, तिच्यावरही बंदी आली. तेव्हा लोकांनी राजकीय हेतूनं मराठवाडा साहित्य परिषद स्थापन केली. तिच्यामार्फत मराठी भाषेची सेवा सुरू झाली. इथल्या लोकांनी वेगवेगळ्या मार्गांनी आपली भाषा, संस्कृती टिकवायचा प्रयत्न केला. या वातावरणात आम्ही वाढलो. तशात आत साहित्याचं बीज रुजलं. सुधीर रसाळ यांचं ‘कविता आणि प्रतिमा’ हे मराठी समीक्षेच्या इतिहासात कवितेची सैद्धांतिक मांडणी करणारं पहिलंच पुस्तक. आजही ते एकमेवय. या पुस्तकाच्या निर्मितीची गोष्ट खूप मजेशीरय. त्याबद्दल रसाळ सर म्हणाले, एम. ए. झाल्यावर तीनेक वर्ष गर्व्हमेंट कॉलेज आणि नंतर विद्यापीठात मराठीचा प्राध्यापक म्हणून चिकटलो. आमचे गुरू म. भि. चिटणीस. मिलिंद कॉलेजचे प्राचार्य. त्यांनी मला बोलावलं. म्हणाले, तू कवितेवर पीएच.डी. कर. ‘प्रतिभा’ हा विषय घे. म्हटलं ठीकय. कविता वाचलेली होतीच. त्यामुळं कवितेकडं वळालो. 1950 ते 1970 या काळातील मराठी कवितांच्या प्रतिमा, त्यावर मला संशोधन करायचं होतं. अभ्यास सुरू केला. तेव्हा असं लक्षात आलं की, मराठी समीक्षेत प्रतिमा कशाला म्हणायचं हे काहीच लिहिलेलं नाही. प्रतिमा कशाला म्हणायचं, कविता आणि प्रतिमा यांचं नातं काय, याबद्दल जोपर्यंत समजावून दिलं जात नाही, तोपर्यंत या कवितेतल्या प्रतिमेचं विवेचन करता येणं शक्य नव्हतं. जर तसं न करता काही विवेचन केलं, तर ते वाचकांना कळालं नसतं. त्यामुळं सहा महिन्यांनी माझे मार्गदर्शक आणि विभागप्रमुख वा. ल. कुलकर्णी यांच्याकडे गेलो. त्यांना म्हणालो, मला ‘कविता आणि प्रतिमा’ असा विषय बदलून द्या. मात्र, ते म्हणाले असे सैद्धांतिक विवेचन करणं फार अवघड गोष्टय. तू करशील याची खात्री मला वाटत नाही. मी ठाम होतो. आपल्याला पीएच.डी. नाही मिळाली तरी चालेल, पण असंच काम करायचा हट्ट धरला. त्यासाठी जवळपास आठ वर्ष केवळ इंग्रजी वाचन केलं. नोट्स काढल्या. सगळे हसायचे. अरे एक-दोन वर्षात पीएच.डी. होते. सहा वर्ष तुझं कामच होत नाही म्हणायचे. व्हाइस चान्सलरांनी दोनदा बोलावून तंबी दिली. तरीही वाचन पूर्ण होईपर्यंत मी याकडं लक्ष दिलं नाही. आपण लवकर काम नाही केलं, तर पीएच.डी. रद्द करतील. तसं झालं तर त्याचं पुस्तक करू, असा निर्धार केला. वा. ल. कुलकर्णी सुद्धा माझ्यावर वैतागून गेलेले. ते म्हणाले, पहिली टर्म जून ते ऑक्टोबर दरम्यान तू प्रबंध लिहायचं काम कर. एकही वर्ग घेऊ नको. तुझे सगळे वर्ग मी घेईन. दुसऱ्या टर्ममध्ये तू माझे वर्ग घे. त्याप्रमाणे ते वर्ग घेऊ लागले. मी विद्यापीठात बसून सकाळपासून संध्याकाळपर्यंत लेखनाचं काम केलं. तीन महिन्यात लिहून झालं. टाइप झालं. प्रबंध सादर झाला. रा. भा. पाटणकर, मेघश्याम पुंडलिक रेगे हे माझे परीक्षक. या दोघांनी तीन तास मौखिक परीक्षा घेतली. मी खरंच वाचलंय का, की कुठून तरी तळटीपा दिल्यात हे पाहिलं. त्यानंतर हा प्रबंध चांगला असून यांना पीएच.डी. द्यावी, असा रिपोर्ट दिला. याच परीक्षकांनी मोठे समीक्षक प्रभाकर पाध्ये यांना हा प्रबंध खूप उत्तम असल्याचं सांगितलं. त्यामुळे पाध्येंनी मला पत्र पाठवून प्रबंध वाचायला मागितला. त्यांनाही आवडला. त्यांनी कौतुकाच पत्र लिहून कळवलं, तुमचा हा प्रबंध मी मौजकडे श्री. पु. भागवतांकडे दिलाय. त्यांना वाचायची उत्सुकताय. श्री. पु. भागवतांनी मला मुंबईत बोलावून पुन्हा प्रबंध वाचला. चर्चा केली. अन् 1982 मध्ये कविता आणि प्रतिमा हे पुस्तक प्रसिद्ध झालं. श्री. पु. भागवतांनी या पुस्तकाचं महत्त्व ओळखलेलं. त्यामुळं त्या मोठ्या संपादकानं माझं सर्व लेखन मौज छापेल, असं सांगितलं. रसाळ सर पुढे म्हणाले, मी मराठीचा शिक्षक. शिकवायचं म्हणजे साहित्यकृतीचं विश्लेषण करून तिचं स्वरूप काय, हे समजावावं लागतं. यासाठी तुमची समीक्षा पक्कीच पाहिजे. चांगला शिक्षक व्हायचं असेल, तर मुळात तो चांगला समीक्षक असावा लागतो. मी शिक्षक असल्यामुळं समीक्षेकडं वळलो. वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व समीक्षा मराठीत आणल्या. सेवानिवृत्त होण्यापूर्वी दोनच पुस्तकं आलेली. पहिलं कविता आणि प्रतिमा, दुसरं काही मराठी कवी, जाणीवा आणि शैली. त्यानंतर इतर सारी पुस्तकं आली. मर्ढेकर, विंदा करंदीकर, पु. शि. रेगे ते नवकवितेचा प्रारंभ, नवकविता नाकारणारं बंड इथपर्यंतचा कवितेचा सगळा काळ ग्रंथरूपानं सिद्ध केला. पण मला खरा रस नाट्यवाड्मयात. मी कवितेकडे केवळ अपघाताने वळलो. मग नाटकावर लिहायचं ठरवलं. मराठीतला मोठा नाटककार महेश एलकुंचवार. त्यांच्यावर प्रदीर्घ लेख लिहिला. शेक्सपिअरच्या किंग लिअर या महान शोकांतिकेचं अतिशय उत्तम भाषांतर विंदांनी केलंय. म्हणलं याचं आपण मूल्यमापन करू. यावर शंभर पानांचा लेख लिहिला. काही नाटकांवर चार-पाच लेख लिहिलेले. या साऱ्यांचं एक पुस्तक झालं. रसाळ सरांनी नव्वदीपार केलीय. या वयातही त्यांचं लिखाण सुरूय. त्यांचं कादंबरीवरचं एक पुस्तक एक-दोन महिन्यात मौजेकडून येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रसाळ सर म्हणाले, ‘सांस्कृतिक आक्रमण आणि मराठी कादंबरी’ असं या पुस्तकाचं नावय. पाश्चात्य कादंबऱ्या, त्यांच्या भूमिकांचं आक्रमण मराठी कादंबरी आणि एकूणच वाङ्‍मयावर झालंय. तिकडं ‘एलिनियशन’चा मुद्दा कादंबरीतून मांडला जातोय. या पृथ्वीवर असूनही आपलं आणि पृथ्वीचं काही नातंच नाही. आपण इथे परके आहोत. झाडाची मुळं पूर्ण जमिनीत पसरलेली असतात. हे झाडं जमिनीचं आहे, पण आम्ही जमिनीच्या वर नांदणारी माणसं. आमचं जमिनीशी काही नातंच नाही, अशी एक चमत्कारीक भावना कादंबऱ्यांतून मांडली जावू लागलीय. आधुनिक संस्कृतीनं माणसाला यंत्र बनवलंय. त्याला ते ‘डी. ह्युमनायझेशन’ म्हणतात. तेव्हा आपलं डी. ह्युमनायझेशन विज्ञानानं केलंय. सगळीकडे यंत्र, यंत्र, यंत्र. माझ्या हातांना काम करायला वावच ठेवलेला नाही. निसर्गानं मला हात दिले. हातातून मी निर्मिती केली पाहिजे. मी कुदळ घेऊन जमीन खोदली पाहिजे. मी बी पेरलं पाहिजे. मी त्याला पाणी घातलं पाहिजे. मी झाड उगवलं पाहिजे. ही माझी निर्मितीय. ट्रॅक्टरनं जमीन नांगरली. दुसऱ्या यंत्रानं बी शेतामध्ये टाकलं. तिसऱ्या यंत्रानं शेतामध्ये पाणी दिलं. चौथ्या यंत्रानं तयार झालेलं पीक कापून घेतलं. मग मी कशासाठी? मला या जगात काय कामय? माझं तुम्ही ‘अमानवीकरण’ करता. माणसाचा जो निसर्गय. स्वतः निर्मिती करायची. आपलं अन्न आपण निर्माण करायचं. आपली वस्त्र आपण निर्माण करायची. हे आम्हाला करताच येत नाही. त्यामुळं या जगात आमचं जगणं अर्थविहीन झालंय. हे पाश्चातीकरण. तिथं यांत्रिक संस्कृती मोठ्या प्रमाणात. आपल्याकडं अजून शहरात वॉशिंग मशीन्स नाहीत. आपली सगळी परिस्थितीच वेगळीय. त्यामुळे त्यांच्या संस्कृतीमध्ये जे निर्माण झालं, ते घेऊन आपण कशाला लिहायचं? आपण आपल्या जगाकडं बघावं. आपले प्रश्न विचारात घ्यावेत. त्यातून आपलं वाङ्‍मय निर्माण करावं. पण आमचे कादंबरीकार तिकडचे विचार घेतात आणि कादंबरीत मांडतात. हे आक्रमण मराठी कादंबरीमध्ये कसं आलं? ते घेऊन काही कादंबऱ्या निवडल्या. त्यावरचं हे पुस्तक येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रसाळ सरांना विचारलं, सध्याचं सरकार व्यक्तिस्वातंत्र्य, राज्यघटनेवर आक्रमण करते आहे, असा आरोप अनेक लेखक-कवी करतायत? तुम्ही याकडे कसे पाहता? रसाळ सर काही सेकंद थांबले. म्हणाले, लेखक असो, चित्रकार असो, गायक असो. कुठल्याही कलावंताला निर्मिती करू द्यायची असेल, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलंच पाहिजे. कलावंताला जे निर्माण करावंसं वाटतं, ते निर्माण करण्याचं स्वातंत्र्य म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. जे आपल्या मनात निर्माण होतं, ते व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य. विचारवंताला विचार मांडता आला पाहिजेत. तो समाजाच्या विरोधात असला, तरी त्याला व्यक्त होता आलं पाहिजे. विचार स्वातंत्र्य ही सांस्कृतिक विकासासाठी आवश्यक गोष्ट आहे. म्हणजे तुमच्या संस्कृतीमध्ये संपन्न विचार निर्माण होतात. तुमच्या संस्कृतीमध्ये श्रेष्ठ दर्जाचं वाङ्‍मय आणि कला निर्माण होतात. आणि तुमची संस्कृती सांस्कृतिक पातळीवर मोठी बनते. तुमच्या जगण्याच्या पद्धती, तुमची मूल्यव्यवस्था यात बदल करण्याचा तुम्हाला अधिकार पाहिजे. जर सत्ता म्हणू लागली या जातीमधल्या युवकानं या जातीतल्या मुलीशी लग्न करायचं नाही. या धर्माच्या मुलानं या धर्माच्या मुलीशी लग्न करायचं नाही. कायद्यानं बंदी. तर हा बदल होणारच नाही. समाज आहे तसा स्थिर राहील. बदल हा जीवनावश्यक आहे. कारण जीवनात नवे-नवे प्रश्न निर्माण होतात. आणि त्याला तोंड देण्यासाठी बदल हे करावे लागतात. आपल्या संस्कृतीमध्ये त्यासाठी आपदधर्म नावाचा शब्द आहे. उदाहरणार्थ मी मांसाहारी नाही. परंतु अशी परिस्थिती निर्माण झाली की मला जगायचं असेल, तर मांसाहार केलाच पाहिजे. तर करायला परवानगी आहे. त्याला आपदधर्म असं म्हणतात. तेव्हा बदल ही एक आवश्यक अशी गोष्ट आहे. हा बदल करण्याचं स्वातंत्र्य पाहिजे. याला आचार स्वातंत्र्य असं मी म्हणतो. वागण्याचं स्वातंत्र्य, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य, कृती करण्याचं स्वातंत्र्य. हे समाजामध्ये प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे. ज्या देशांमध्ये लेखकांच्या लेखनावर अनेक बंधनं टाकली. तिथलं वाङ्‍मय पार नष्ट झालं. याचं उत्कृष्ट उदाहरण रशिया आहे. रशिया हा देश कादंबरी वाड्मयाच्या निर्मितीमध्ये फार मोठा होता. टॉलस्टॉय, दोस्तोव्हस्की असे लेखक तिथे झाले. जगात शेक्सपिअरचं जे स्थान नाटकात आहे, ते या दोन कादंबरीकारांचं स्थान मानलं जातं. स्टॅलीनची राजवट आल्यावर अनेक बंधनं घातली. तुम्ही हेच लिहिलं पाहिजे, मार्क्सवादी तत्वज्ञान तुमच्या लेखनात आलंच पाहिजे. व्यक्ती समाजाचा घटक आहे. त्यामुळे व्यक्ती नव्हे, समाज महत्त्वाचा. त्यामुळे व्यक्तीच्या नको तर समाजाच्या भावना व्यक्त करा. ही बंधनं ज्यांनी तोडली त्यांची सैबेरियात रवानगी केली. नाही तर हत्या केल्या. किती तरी लेखक मारले गेले. सैबेरियासारख्या अतीशीत प्रदेशात जिथं माणूस जगणं अशक्य आहे, तिथं लेखक हद्दपार केले गेले. त्यामुळं स्टॅलीनच्या काळात 1920 पासून रशियाचं विभाजन होईपर्यंत संपूर्ण वाङ्‍मयीन वातावरण अतिशय वाईट अशा प्रकारचं होतं. त्यामुळं थॉ हा काळ तयार झाला. बर्फ वितळून उबदार अशी हवा तयार होते आहे, असं वातावरण नंतर रशियात आलं. त्या नंतर रशियन कादंबरीनं पुन्हा उभारी घेतली. झिवॅगो या कादंबरीला नोबेल पुरस्कार मिळाला. एका हिंदूनं मुसलमान घरातील मुलाशी, मुलीशी लग्न केलं की झालं लोकांनीच मारायचं. हे सुरू झालं तर आचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य नष्ट व्हायला लागेल. हे एकदा सुरू झालं की तुमची संस्कृती पूर्ण रसातळाला जाते. तुम्ही केवळ पशू म्हणून जगायला लागता. खाणं, पिणं याच्यापलीकडे तुम्हाला काहीच करता येत नाही. माणूहा हा माणूस आहे, कारण तो विचार करतो. विचाराप्रमाणे वर्तन करतो. आपल्या वागण्यात बदल करतो. त्यातून थंडी वाजते म्हणून उबदार कपडे निर्माण झाले. ह्या आमच्या गरजा लक्षात घेऊन निर्मिती झाली ना? सगळ्या पातळीवर निर्मिती जर होऊ द्यायची असेल, तर तुम्हाला आचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य समाजात आवश्यक आहे. यावर जर बंधनं येऊ लागली तर समजायचं आपल्या संस्कृतीला ग्रहण लागत आहे. तिचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे लेखक, कलावंत एवढंच नव्हे, तर वाचकांनी काय वाचावं हे तुम्ही ठरवणार. लज्जा ही बंगाली लेखिकेची कादंबरी तिच्यावर बंदी. किंवा सलमान रश्दी या लेखकावर आम्ही बंदी घालू. त्यांची कादंबरी आम्ही वाचू देणार नाही. म्हणून अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही अशी गोष्ट आहे, जी लेखकांनाही आवश्यक असते. वाचकांनाही आवश्यक असते. म्हणून ही सांस्कृतिकदृष्ट्या अत्यावश्यक अशी गोष्ट आहे. हे स्वातंत्र्य अबाधित रहावं. संस्कृतीचा ऱ्हास होऊ नये. रसाळ सरांशी खूप गप्पा झाल्या. चारच्या सुमारास त्या आवरत्या घ्याव्या लागल्या. बाहेर पडलो. अंगाला बोचरं वारं जाणवलं. सरांचं बोलणं कानात होतं. जणू उरे घोटभर गोड हिवाळा, असंच काहीसं वाटलं. गाडी सुरू केली. सहजच विंदांच्या ओळी आठवल्या, व्होल्गाचे पाणी वाहू दे गंगेत, लाभो निग्रो रेत पांढरीला, रक्तारक्तातील कोसळोत भिंती मानवाचे अंती एक गोत्र! सुधीर रसाळांची अनकट मुलाखत येथे पाहता येईल

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment