ठाकरे बंधूंना एकत्र येऊ द्या, मग काय करायचे ते ठरवू:पवार कुटुंब एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर रोहित पवारांचे सूचक विधान

ठाकरे बंधूंना एकत्र येऊ द्या, मग काय करायचे ते ठरवू:पवार कुटुंब एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर रोहित पवारांचे सूचक विधान

महाराष्ट्रात लवकरच महापालिकेच्या निवडणुका जाहीर होतील. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी देखील सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. तर दुसरीकडे पवार कुटुंबही एकत्र आले पाहिजे, अशी भावना अनेकांनी बोलून दाखवली आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सूचक विधान केले आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आधी एकत्र येऊ द्या, मग काय करायचे ते ठरवू, असे ते म्हणाले आहेत. राजकारणात काहीही होऊ शकते असेही अनेकांनी म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी तसेच काही शिवसैनिकांनी देखील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र आले पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एका बैठकीत एकत्र दिसले होते. त्यानंतर पवार कुटुंब एकत्र येणार का असे प्रश्न सुरू झाले होते. यावर रोहित पवारांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आधी एकत्र येऊ द्या, मग काय काय करायचे ते ठरवू, असे म्हटले आहे. पुढे बोलताना रोहित पवारांनी महाराष्ट्रातील परिस्थितीवर नाराजी व्यक्त करत थेट युपी बिहारसोबत महाराष्ट्राची तुलना केली आहे. रोहित पवार म्हणाले, राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. एकट्या पुण्यात वर्षभरात 650 बलात्काराच्या तर 850 विनयभंगाच्या घटना घडल्यात. जिल्ह्यात रोज 20 महिला बेपत्ता होत आहेत. त्यातून महिला किती असुरक्षित आहेत, हे अधोरेखित होते. याबाबत ठोस काहीच होत नाही, उलट राजकीय नेतेच गुन्हेगारांना सोबत बाळगून चुकीची प्रवृत्ती निर्माण करत आहेत. हे पाहता महाराष्ट्राचा यूपी-बिहार झाला आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. नाशिकच्या पालकमंत्रिपदावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले, नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा तिढा मुख्यमंत्र्यांनी हुशारीने सोडवला आहे. आता, 2027 पर्यंत तरी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्रीच नाशिकचे पालकत्व पाहतील, पण रायगडचा तिढा मात्र कायम राहील, असे म्हणत रोहित पवारांनी महायुतीत आलबेल नसल्याचे म्हटले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment