ठाकरे गटाच्या उमेदवारासह समर्थकांचे कळमनुरी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या:विरोधीपक्षाच्या उमेदवार समर्थकांकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप
कळमनुरी विधानसभा मतदार संघात विरोधी गटाच्या उमेदवाराकडू पैसे वाटप होत असतांनाही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याच्या आरोपावरून ठाकरे गटाचे उमेदवार डॉ. संतोष टारफे यांच्यासह समर्थकांनी बुधवारी ता. १३ सायंकाळी कळमनुरी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यानंतर सायंकाळी उशीरा अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. कळमनुरी विधानसभा मतदार संघात निवडणुक प्रचारात चांगलीच रंगत वाढली आहे. ठाकरे सेना, अपक्ष उमेदवार व शिंदेसेनेच्या उमेदवारासह वंचितचे उमेदवार निवडणुक रिंगणात असल्याने या ठिकाणी बहुरंगी लढतीचे चित्र पहावयास मिळत आहे. सर्वच उमेदवार व समर्थकांकडून दिवस रात्र प्रचार सुरु असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. आज दुपारच्या सुमारास कळमनुरी तालुक्यातील वाकोडी येथे प्रचाराच्या कारणावरून एका जीपची तोडफोड केल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, सायंकाळी उशीरा ठाकरे गटाचे उमेदवार डॉ. संतोष टारफे, माजी खासदार ॲड. शिवाजी माने, ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील सावंत, राष्ट्रवादीचे ठाकूरसिंग बावरी, प्रशांत बोडखे, काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीष पाचपुते, बाळासाहेब मगर यांच्यासह कार्यकर्त्यांनी कळमनुरी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करून प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली. यावेळी त्यांनी विरोधीगटाच्या उमेदवाराच्या विरोधातही घोषणाबाजी केली असून काही उमेदवार पैसे वाटप करीत असतांनाही प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारची कारवाई केली जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी तातडीने पोलिस विभागाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांनी घटनास्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु होती.