ठाकरेंच्या नेत्याच्या तोंडून राहुल गांधींना काळे फासण्याची भाषा:दगडफेकीचाही इशारा; काँग्रेसचेही प्रत्युत्तर, आघाडीत बिघाडी?

ठाकरेंच्या नेत्याच्या तोंडून राहुल गांधींना काळे फासण्याची भाषा:दगडफेकीचाही इशारा; काँग्रेसचेही प्रत्युत्तर, आघाडीत बिघाडी?

काँग्रेस नेते राहुल गांधी नाशिक मध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासणार असल्याची धमकी महा विकास आघाडी मधील घटक पक्ष असणाऱ्या उद्धव ठाकरे गटाचे नेते बाळा दराडे यांनी दिली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्ध अपशब्द सहन करणार नसल्याचे बाळा दराडे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महा विकास आघाडीत मिठाचा खडा पडणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. काँग्रेसच्या वतीने देखील त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. या संदर्भात बाळा दराडे म्हणाले की, आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मभूमीमध्ये राहतो. याचा आम्हाला खूप अभिमान आहे. मात्र, राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या बद्दल अपशब्द वापरले होते. त्याचा आम्ही निषेध व्यक्त करत असल्याचे बाळा दराडे यांनी म्हटले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पक्षाचे नेते संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीत राहुल गांधी यांना सुनावले आहे. सावरकर यांच्या बद्दल अपशब्द वापरल्यास आम्ही त्यांना धडा शिकवू. आम्ही महा विकास आघाडीमध्ये असलो तरी महा विकास आघाडी गेली खड्ड्यात, असेही बाळा दराडे यांनी म्हटले आहे. अशा धमक्यांना काँग्रेस भीक घालत नाही – हर्षवर्धन सपकाळ बाळा दराडे यांच्या या भूमिकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील कडाडून विरोध केला आहे. अशा धमक्या सहन केल्या जाणार नसल्याचे सपकाळ यांनी म्हटले आहे. मात्र या सर्व प्रकरणामुळे आता महा विकास आघाडीमध्ये चांगलाच वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. त्याला उत्तर देण्यास आमचे कार्यकर्ते देखील पुरेसे असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्यावर दगडफेक देखील करू राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरुद्ध अपशब्द वापरले तर ते नाशिकमध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासू, इतकेच नाही तर राहुल गांधी यांच्यावर दगडफेक देखील करू, असा इशारा दराडे यांनी दिला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त नाशिक मध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दराडे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला. राहुल गांधी यांना तुम्ही हात लावून दाखवा – यशोमती ठाकूर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. आता महानगरपालिकांच्या निवडणुका असल्याने सदरील राजकारण केले जात असल्याचे काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे. मात्र राहुल गांधी यांना अशा शब्दात बोलणे कोणीही खपवून घेणार नाही. राहुल गांधी यांना तुम्ही हात लावून दाखवा, असा इशारा यशोमती ठाकूर यांनी दिला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment