सर्वसामान्य जनता जातीयवादी नाही तर पुढारी आहेत:आपल्या स्वार्थासाठी ते जात उभी करतात, नितीन गडकरी यांचे मोठे विधान

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच आपल्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखले जातात. आजही त्यांनी अमरावती येथे एका कार्यक्रमात बोलताना पुढाऱ्यांबाबत मोठे विधान केले आहे. सर्वसामान्य जनता जातीयवादी नाही, तर पुढारी जातीयवादी आहेत, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. पुढारी आपल्या स्वार्थासाठी जात उभी करतात, असेही ते म्हणाले. नागपूर येथे नुकतीच हिंसाचाराची घटना घडली असताना नितीन गडकरींच्या या वक्तव्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2024’ने सन्मान करण्यात आला. पाच लाख रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमाला खासदार डॉ अनिल बोंडे, खासदार बळवंत वानखडे, आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, माजी आमदार प्रवीण पोटे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यावेळी बोलताना नितीन गडकरी यांनी उपरोक्त विधान केले. नेमके काय म्हणाले नितीन गडकरी? नितीन गडकरी म्हणाले की, माझा मुलगा आहे म्हणून त्याला राजकारणात स्थान मिळेल हे मला मान्य नाही. त्यांनी त्याच्या कर्तृत्वावर स्थान निर्माण करावे. आमदाराच्या पोटातून आमदार नाही झाला पाहिजे, खासदाराच्या पोटातून खासदार नाही झाला पाहिजे. आमदार खासदारांनी म्हणायच्या ऐवजी जनतेने आणि कार्यकर्त्यांनी जर म्हटले तर त्यांना अधिकार आहे. जे लोक आपले कर्तृत्व सिद्ध करतात त्यांना हा पूर्ण अधिकार आहे. माझ्या हिशोबाने राजकारण चालेल कुणाचा मुलगा, मुलगी असणे गुन्हा नाही. आज आपल्या सामाजिक जीवनामध्ये राजकारणाचा अर्थच समाजकारण आहे. विकासकारण आहे. मी लोकसभेत निवडून आलो पण मी लोकांना सांगितले माझ्या हिशोबाने राजकारण चालेल, तुमच्या हिशोबाने नाही. तुम्हाला मत द्यायचं असेल तर द्या, नाही द्यायचं असेल तरी चालेल. जो मत देईल त्याचे काम करेल, जो नाही देईल त्याचेही काम करेल. त्यामुळे जनता जातीयवादी नाही तर पुढारी जातीवादी आहेत, हे पुढारी आपल्या स्वार्थासाठी जात उभी करतात, असेही नितीन गडकरी म्हणाले. पुरस्काराची रक्कम परत करत गडकरींची मोठी घोषणा नितीन गडकरी यांनी त्यांना मिळालेल्या पुरस्काराची रक्कम परत करत मोठी घोषणा केली. मला 5 लाख रुपये पुरस्कारातून मिळाले. त्यात 20 लाख रुपये टाकून मी 25 लाख रुपये देत आहे. ते 25 लाख रुपये विदर्भातील पाच शेतकऱ्यांना पुरस्कार म्हणून संस्थेने द्यावे, असे नितीन गडकरी म्हणाले. अकोला आणि भंडारा जिल्ह्यातील महिलांना सन्मान दरम्यान, अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पुरस्कार सोहळ्यात ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2024’ सह शरद पवार यांनी दिलेल्या दान निधीतून विदर्भातील उत्कृष्ट शेतकरी महिला अकोला येथील वंदना धोत्रे यांना ‘शारदाबाई पवार उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार 2024’ तर श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने ‘श्रीमती विमलाबाई देशमुख शेतीनिष्ठ महिला शेतकरी पुरस्कार 2024’ हा भंडारा जिल्ह्यातील वंदना वैद्य यांना प्रदान करण्यात आला.