काळाच्या ओघात लेण्या नामशेष होण्याच्या मार्गावर:जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक लेण्यांकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष झाल्याने मोठ्या प्रमाणात दुरवस्था

काळाच्या ओघात लेण्या नामशेष होण्याच्या मार्गावर:जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक लेण्यांकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष झाल्याने मोठ्या प्रमाणात दुरवस्था

जगाच्या पाठीवर कमीत कमी भूभागावर सर्वाधिक लेण्या असणारे एकमेव ठिकाण म्हणजे जुन्नर तालुका! मात्र, येथील सर्वच लेण्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. पुरातत्त्व विभागाच्या उदासीनतेमुळे काळाच्या ओघात या लेण्या नामशेष होण्याच्या मार्गावर असून, सध्या भग्नावस्थेत उभ्या आहेत. जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव जोगा धरणाच्या जवळ असणाऱ्या खिरेश्वर येथील नागेश्वर मंदिराच्या काही अंतरावर एक भूसपाटीला असणाऱ्या खडकात एक प्राचीन लेणी कोरलेली आहे. या लेण्यांमध्ये सुमारे ३० फूट बाय ५० लांबीचा सभामंडप असून, हा सभामंडप १० दगडी खांबांवर उभा आहे. सभामंडपाच्या शेजारीच एक १० बाय १० ची खोली आहे. दरवर्षी पावसाळ्यात या लेण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठले जाते. सभामंडपाला असणाऱ्या दगडी खांबांची अनेक ठिकाणी तुटफूट झाली आहे. काही खांबांना मोठे तडे गेले आहेत. ही लेणी भुईसपाटीला असल्याने नागेश्वराचे दर्शन घेऊन निघाल्यानंतर ही लेणी लक्षात येत नाहीत. अगदीच जवळ जाऊन पाहिल्यानंतर या ठिकाणी लेणी असल्याचे जाणवते. लेणी म्हणजे दगडात कोरलेले विवर होय. भारतातील सर्व लेण्या या लोहयुगात तयार करण्यात आल्या आहेत. भारतात आतापर्यंत १२०० लेण्या सापडल्या असून, त्यापैकी ८०० बुद्ध लेण्या आहेत, तर एकट्या जुन्नर तालुक्यात ३५० लेण्या आहेत. या लेण्यांमध्ये काही जैन, तर काही बुद्ध लेण्या आहेत. जुन्नर तालुक्यात सर्वात पहिली खोदलेली लेणी ही तुळजा लेणी आहे. या सर्व लेण्या राजे, महाराजे यांनी दिलेल्या दान व देणग्यांमधून तयार झाल्याचे शिलालेखांमधून आढळते. लेणी कोरण्याची कला महाराष्ट्रात १००० ते १२०० वर्षे जोपासली गेली. जुन्नर तालुक्यातील लेण्या या सातवाहनकालीन असून, चंद्रगुप्त मौर्य कालाखेर ते इ. स. पूर्वीच्या दुसऱ्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील आहेत. बौद्ध धर्माच्या प्रसाराचा व प्रचाराचा केंद्रबिंदू म्हणून जुन्नर तालुक्याची एक आगळीवेगळी ओळख आहे. बौद्ध धर्माचा प्रचार करण्याचे कार्य सर्वप्रथम जुन्नर तालुक्यात सुरू असल्याचे काही ठिकाणी उल्लेख आहे. लेण्यांमधील शिलालेख हे ब्राम्ही लिपीत असून, त्याची प्राकृत भाषा असल्याचे इतिहास अभ्यासक बापू ताम्हाणे यांनी सांगितले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment