राज्यात तापमानात अंदाजे 2 अंशांनी वाढ:पुणे, नाशिक, मुंबईत 12 ते 16 तर मराठवाड्यात 18 ते 20 अंशापर्यंत किमान तापमानाची नोंद
राज्यातील मध्य महाराष्ट्रासह बहुतांश भागात किमान तापमान सामान्य तापमानाच्या तुलनेत अधिक नोंदवले जात आहे. पुणे, नाशिक, मुंबई या भागातील तापमान 12 ते 16 अंशापर्यंत नोंदवले जात आहे. तर मराठवाड्यामध्ये 18 ते 20 अंशापर्यंत किमान तापमानाची नोंद होत आहे. दरम्यान येत्या 24 तासात राज्यात पुन्हा तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. महाराष्ट्रातील तापमानात अंदाजे दोन अंशांनी वाढ नोंदवली जाणार असून विदर्भात मात्र ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. राज्यात मागील दोन दिवसापासून किमान तापमानाचा पारा कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने चढ-उतार होताना नोंदवले जात आहे. त्यातच अवकाळी पावसाला पोषक हवामान तयार झाल्याने राज्यातील शेतकरी धास्तावले होते. मात्र अद्याप तरी अवकाळी पावसाचा फटका राज्यातील कोणत्याच भागाला बसलेला नाही. मात्र, यादरम्यान नागरिक मात्र उकाड्याने हैराण झाले होते. पहाटे आणि संध्याकाळी हलका गार वारा आणि धुक्याची चादर याचा परिणाम मात्र राज्यातील नागरिकांना सहन करावा लागला. उत्तर महाराष्ट्रातही तापमान वाढले दरम्यान बुधवारी राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापामान हे दहा अंशांच्या वर गेले होते. तर कोकण किनारपट्टी परिसरामध्ये काही भागांमध्ये 20 अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली आहे. यात रत्नागिरी 21 अंश तर सिंधुदुर्गात 23 अंशापर्यंत तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर पुण्यात देखील सामान्य तापमानाच्या तुलनेत तापमानात वाढ नोंदवण्यात आली. मराठवाड्यात तापमानाचा पारा सोळा ते अठरा अंशावर येऊन थांबला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातही तापमान वाढले आहे. राज्यात पहाटेच्या वेळी गारवा आणि धुक्याची चादर उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यात पहाटेच्या वेळी गारवा आणि धुक्याची चादर दिसून येत आहे. मात्र बहुतांश भागात थंडीचा जोर काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाली असून ढगाळ वातावरणामुळे हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. वास्तविक पाकिस्तान परिसर आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये चक्रीकार वाऱ्यांची स्थिती पाहता पंजाबसह उत्तर भारतातील काही भागात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. तर दक्षिणनेतही अवकाळी पावसाचा आणि वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व घडामोडींचा परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होत असून राज्यात ढगाळ वातावरण असल्याने तापमानात दोन अंशांनी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.