राज्य सरकारने सगळे ढिले सोडले:पोलिसांवर तर नाहीच वैद्यकीय क्षेत्रावरही अंकुश नाही, दीनानाथ रुग्णालय प्रकरणी जयंत पाटलांची टीका

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर अनामत रक्कम मागीतल्याचे तसेच ती रक्कम न भरल्याने गर्भवती महिलेवर वेळीच उपचार न केल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. तनिषा भिसे यांच्या मृत्यूनंतर राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. तसेच चौकशी समितीने देखील अनामत रक्कम मागितल्याचा ठपका प्राथमिक अहवालात ठेवला आहे. तसेच या प्रकरणावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देत सरकारवर टीका केली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेच्या मृत्यूवरून जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. जयंत पाटील म्हणाले, या सरकारचा व्यवस्थेवर अंकुश नाही. प्रशासनावर आणि पोलिसांवर देखील सरकारचा काही अंकुश राहिलेला नव्हताच. आता तर वैद्यकीय क्षेत्रावर देखील अंकुश राहिलेला नाही. सरकारने सगळे ढिले सोडले आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. तसेच दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रकरणी सरकारने आता टोकाची कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. ते सांगलीवाडी येथे आयोजित बैलगाडी शर्यतीच्या कार्यक्रमात बोलत होते. पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, देशातल्या अर्थव्यवस्थेला झटके बसत आहेत. महागाई वाढत आहे. शेअर मार्केट कोसळत आहे. पण या धक्क्यांवर देशात काहीही चर्चा होताना दिसत नाही. त्याऐवजी आपण हिंदुत्ववादीने एवढे प्रेरित झालो आहोत की आपल्याला बाकीचे प्रश्नच आठवत नाहीत. जगामध्ये टॅरिफचा विषय चालू आहे. देशात इंधन, गॅस दर वाढलेले आहेत. दररोज शेअर मार्केट कोसळत आहे. हे महत्तवाचे प्रश्न आहेत. दरम्यान, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ. घैसास हे या प्रकरणाच्या केंद्रस्थानी असून त्यांच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या चौकशीसाठी धर्मादाय आयुक्तांच्या नेतृत्त्वाखाली पाच सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीने आपला अहवाल प्रधान सचिवांकडे सुपूर्द केला होता. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अहवालावर चर्चाही झाल्याची माहिती आहे.