आपल्या 16 व्या मुख्यमंत्र्यांचा राजकीय प्रवास:अशोक चव्हाणांकडे ज्या वेगाने CM पद आले, त्याच वेगाने ते गेले
अशोक चव्हाण हे काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र. ते काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेते होते. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. ‘काँग्रेसमध्ये असेपर्यंत मी प्रामाणिकपणे काम केले. पक्षाने मला खूप काही दिले, तसे मी ही पक्षाला खूप काही दिले’, असे ते काँग्रेस सोडताना म्हणाले. काँग्रेसने अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी दिली. पण हे पद त्यांच्या वाट्याला ज्या वेगाने आले, त्याच वेगाने त्यांना ते सोडावेही लागले. चला तर मग मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या मालिकेत आज आपण पाहूया महाराष्ट्राचे 16 वे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा राजकीय प्रवास… अशोक चव्हाण यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1958 रोजी झाला. त्यांनी बीएसस्सी व एमबीए या 2 पदव्या घेतल्या. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. शंकररावांचा वारसा त्यांच्या 2 शिष्यांना मिळाला. एक विलासराव देशमुख व दोन अशोक चव्हाण. शंकररावांचे हे दोन्ही शिष्य नंतर राज्याचे मुख्यमंत्री झाले. पण राज्याच्या इतिहासात मुख्यमंत्रीपदापर्यंत मजल मारणारी चव्हाण पिता-पुत्राची जोडी ही पहिलीच ठरली. अशोक चव्हाण ज्या सहजपणे आणि वेगाने राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचले, त्याला त्यांचा पक्षातील जनसंपर्क विशेषतः शंकरराव चव्हाण यांचा राजकीय वारसा कारणीभूत ठरला असे मानले जाते. अशोक चव्हाणांचा कॉलेजमध्ये राडा अशोक चव्हाण यांचे बालपण सर्वसामान्य मुलांसारखेच गेले. ते 10वीपर्यंत स्कूल बसने शाळेला जायचे. ते कॉलेजला गेले तेव्हा शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री झाले होते. पण त्यानंतरही अशोक चव्हाण यांना शाळेत पोहोचवण्यासाठी सरकारी कार किंवा इतर कोणतीही व्हीआयपी सुविधा मिळाली नाही. यासाठी शंकररावांची शिस्त कारणीभूत होती. अशोक चव्हाण सिटी बसनेच कॉलेजला जात. अशोक चव्हाण एकेठिकाणी यासंबंधीची आठवण सांगताना म्हणतात, शंकरराव चव्हाण हे माझे वडील आहेत, हे मी बराच काळ कॉलेजमध्ये माहिती होऊ दिले नव्हते. कारण मी त्यांचा मुलगा आहे हे समजले तर मित्र आणि शिक्षकांच्या वागणुकीत कदाचित कृत्रीमपणा वाढेल अशी भीती मला वाटायची. या काळात अशोक चव्हाण यांची भेट झालेल्या एका मित्राशी त्यांची दोस्ती आजही कायम आहे. तो मित्र म्हणजे हिंदी सिनेमा सृष्टी गाजवणारे अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर. 70 च्या दशकात एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये हे दोघे एकत्र होते. महेश मांजरेकर यांना देखील अशोक चव्हाण हे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आहेत हे ठाऊक नव्हते. दोघांची घट्ट मैत्री झाली अन् पुढे एकदा वर्तमानपत्रात फोटो आल्यानंतर मांजरेकरांना अशोक चव्हाणांचे सिक्रेट समजले. ‘मेरे सपनो कि राणी’ कॉलेज मध्ये त्यांचा एक मोठा ग्रुप बनला होता. अनेकदा ते सर्व मित्र सिनेमा पाहायला जायचे. अशोक चव्हाण यांना अभिनेते राजेश खन्ना खूप आवडायचे. ते नेहमी आराधना या सिनेमातील ‘मेरे सपनो कि राणी’ हे गाणे गुणगुणत असायचे. महेश मांजरेकर एका मुलाखतीमध्ये सांगतात की, अशोक चव्हाण यांचे कॉलेजमध्ये एका मुलासोबत वाद झाला होता. त्या मुलाने त्यांना खूप त्रास दिला. त्यानंतर अशोक चव्हाण चिडून मांजरेकरांकडे आले आणि काहीतरी कर असे म्हणाले. त्यानंतर मी काही मित्रांना घेऊन गेलो आणि त्या मुलाला डोस दिला. या राड्यामुळे हे प्रकरण मिटले. खरे तर अशोक चव्हाण हे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र होते. त्यांनी नुसते सांगितले असते तर मुंबईतला कोणताही पोलिस अधिकारी धावत तिकडे आला असता आणि त्या मुलाला झोडपत आपल्यासोबत गेला असता. पण अशोकने तसे काहीच केले नाही. त्यांना हेडमास्तर असणाऱ्या आपल्या वडिलांचे म्हणजे शंकरराव चव्हाण यांचे संस्कार फार महत्त्वाचे होते. तेरे जैसा यार कहा… अशोक चव्हाण व डी. पी. सावंत यांची मैत्रीही फार जुनी आहे. डी. पी. सावंत हे मूळचे कोकणातील, पण त्यांचा जन्म आणि शिक्षण मुंबईत झाले. मुंबईत 1976 मध्ये भवन्स कॉलेजमध्ये अशोक चव्हाण, डी. पी. सावंत, महेश मांजरेकर, सुरेश गर्जे असे सर्व मित्र शिकण्याच्या निमित्ताने एकत्र आले आणि एकमेकांचे चांगले मित्र बनले. अशोक चव्हाण शिक्षण झाल्यानंतर नांदेडला आले आणि काही दिवसानंतर 1982 साली डी. पी. सावंतही नांदेडला आले. मित्राला मदत म्हणून त्यांनी तेव्हापासून सुरु केलेले काम आजही अव्याहतपणे सुरुच आहे. डी. पी. सावंत हे सुरवातीला लायन्स क्लब, साई सेवा ट्रस्ट आदींच्या माध्यमातून काम पाहत होते. नंतर 1998 मध्ये त्यांच्यावर श्री शारदा भवन शिक्षण संस्थेच्या सचिवपदाची जबाबदारी येऊन पडली. त्यानंतर डी. पी. सावंत आमदार अन् मंत्री झाले, पण त्यांची व अशोकरावांची मैत्रीत कोणतीही खोट पडली नाही. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतरही ही मैत्री अबाधित आहे. अशोक अन् अमित चव्हाण यांची लव्हस्टोरी अशोक चव्हाण व अमिता चव्हाण यांची मैत्री कॉलेजमध्ये असताना झाली. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. या दोघांचीही घर एकमेकांच्या जवळ होते. त्यामुळे त्यांची नियमितपणे भेट होत होती. पुढे आयुष्यात आलेल्या प्रत्येक गोष्टीत त्या दोघांनी एकमेकांचा हात घट्ट पकडून ठेवला. एका मुलाखतीमध्ये अशोक चव्हाण यांना त्यांच्या लव्हस्टोरीविषयी विचारण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी हे सर्व देवाने जमवले आणि देवामुळेच आम्ही आनंदी असल्याचे प्रांजळपणे सांगितले होते. शाळेत गणितात कच्चे, पण राजकारणात पक्के अशोक चव्हाण शाळेत असताना गणितात थोडे कच्चे होते, पण राजकीय समीकरणे त्यांनी अगदी खमकेपणाने सांभाळली. पण त्यांना स्वतःला तसे वाटत नाही. ते एकेठिकाणी म्हणतात, मी राजकीय गणितात देखील कच्चाच आहे, पक्का नाही झालो. मला कधीच खरा आणि खोटा चेहरा हा प्रकार जमला नाही. मी माझ्या मतदार संघातील लोकांना आणि सहकाऱ्यांसाठी अव्हेलेबल असतो. राजकारणात खोट बोलणे सोयीचे आहे. अनेकजण समोर एक आणि मागे दुसरेच काहीतरी बोलतात. ते आम्हाला माहितीही असते, पण मला ते केव्हाच जमले नाही. जे आता माझ्या तोंडात आहे, तेच नंतर माघारीही माझ्या तोंडात राहील. 1985 मध्ये राजकारणाचा श्रीगणेशा अशोक चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीला 1985 साली सुरुवात झाली. त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस म्हणून राजकारणात प्रवेश केला. 1986 ते 1995 पर्यंत ते महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. काँग्रेसने 12 मार्च 1986 रोजी शंकरराव चव्हाण यांच्या हाती दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सोपवले. ते महाराष्ट्रात परतल्यामुळे त्यांची लोकसभेची जागा रिक्त झाली. त्यामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. 1987 च्या या पोटनिवडणुकीत काँग्रेसने अशोक चव्हाण यांना उमेदवारी दिली. त्यांच्याविरोधात प्रकाश आंबेडकर उभे होते. या निवडणुकीत अशोक चव्हाणांनी आंबेडकरांचा पराभव केला आणि वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी लोकसभेत पाऊल ठेवले. अशोक चव्हाण यांना 2 लाख 83 हजार 10, तर प्रकाश आंबेडकरांना 1 लाख 71 हजार 901 मते मिळाली. मतांचा हा फरक फार मोठा नव्हता. पण चव्हाणांच्या बालेकिल्ल्यात हा फरकही अत्यंत चुरशीचा मानला गेला. त्यानंतर 1989 च्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा पराभव झाला. तद्नंतर अशोक चव्हाण थेट 2014 साली लोकसभेच्या आखाड्यात उतरले. या निवडणुकीत काँग्रेसची प्रचंड हाराकिरी झाली. काँग्रेसचे राज्यातून केवळ दोनच खासदार निवडून आले. नांदेडमधून स्वतः अशोक चव्हाण व शेजारच्या हिंगोलीतून राजीव सातव लोकसभेवर पोहोचले. अशोक चव्हाण यांनी विधान परिषदेचे सदस्य म्हणूनही काम केले. आपल्या राजकीय कारकिर्दीत ते 2 वेळा खासदार व 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये ते सांस्कृतिक प्रकरणे, उद्योग, खणीकर्म व राजशिष्टाचार मंत्री होते. विलासरावांचा राजीनामा अन् चव्हाण मुख्यमंत्री 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर पाकिस्तानी अतिरेक्यांचा हल्ला झाला. या हल्ल्यानंतर विलासराव ताज हॉटेलवरील हल्ल्याच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी गेले होते. वरवर पाहता हा एक सरकारी दौरा होता. पण या पाहणीचे फुटेज टीव्हीवर झळकले आणि एकच गजहब झाला. विलासरावांसोबत या दौऱ्यात त्यांचा अभिनेता मुलगा रितेश देशमुख व चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्मा हे दोघे होते. या दोघांना सोबत नेल्यामुळे विलासरावांवर टीकेची झोड उठली. ‘मुंबईवर एवढा मोठा हल्ला झाला, पण त्याचे कोणतेही गांभिर्य मुख्यमंत्र्यांना नाही’, असा आरोप विरोधकांनी त्यांच्यावर केला. यामुळे विलासरावांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडीत अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे सुद्धा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. तसेच शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले नारायण राणे सुद्धा या पदाचे दावेदार होते. पण काँग्रेसने देशमुखांच्या जागी मराठवाड्यातील एखाद्या नेत्याला मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेतला होता. अखेर देशमुखांनीही आपले वजन अशोक चव्हाणांच्या पारड्यात टाकल्याने त्यांना हे पद मिळाले. विभागीय आयुक्तालयावरून विलासरावांशी संघर्ष विलासराव देशमुख यांच्या जागी किंबहुना त्यांच्याच संमतीने अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. त्यामुळे चव्हाण हे विलासरावांच्या निर्देशांनुसारच राज्यशकट हाकतील असा दावा केला जात होता. पण चव्हाण यांनी आपला स्वतंत्र कारभार करत विलासरावांना धक्के देण्यास सुरुवात केली. अशोक चव्हाण यांच्या काळात नांदेड येथे विभागीय आयुक्तालय स्थापन करण्याचा मुद्दा चांगलाच गाजला. मराठवाड्याचे आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे. पण या कार्यालयावर मोठा ताण आहे. त्यामुळे नांदेडला स्वतंत्र आयुक्तालय स्थापन करावे अशी जुनी मागणी होती. विलासराव देशमुख यांचा हे कार्यालय नांदेडला व्हावे असा होता, तर अशोक चव्हाण यांना ते नांदेडला व्हावे असे वाटत होते. यासंबंधी राज्य सरकारने एक अभ्यास समिती नेमली होती. या समितीने हे आयुक्तालय नांदेडला करण्याची शिफारस केली. पण विलासरावांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नाही. पण त्यानंतर अशोक चव्हाणांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली आणि हे कार्यालय लातूरहून नांदेडला हलवण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय विलासरावांना अजिबात आवडला नाही. त्यामुळे शंकरराव चव्हाण यांचे शिष्य असलेल्या या दोन्ही नेत्यांत राजकीय वितुष्ट निर्माण झाले. नंतरच्या काळात विलासरावांनी स्वतः पुढाकार घेऊन हे वितुष्ट दूर करण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अशोकपर्व 2009 च्या विधानसभा निवडणुकीत ‘अशोकपर्व’ या जाहिरातीचे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यावेळी वर्तमानपत्रांमध्ये ‘अशोकपर्व’ नामक एक पुरवणी छापण्यात आली होती. त्यात अशोक चव्हाण यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेण्यात आला होता. या निवडणुकीतील अपक्ष उमेदवार माधवराव किन्हाळकर यांनी ही पुरवणी म्हणजे पेड न्यूज असल्याचा आरोप केला होता. तसेच त्याचा खर्च अशोक चव्हाण यांनी आपल्या निवडणूक खर्चात दाखवला नसल्याचा दावाही त्यांनी केला होता. हे प्रकरण अशोक चव्हाण यांना चांगलेच जड गेले. आदर्श सोसायटी घोटाळ्यात गेले मुख्यमंत्रीपद अशोक चव्हाण 8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर 2009 ची विधानसभा निवडणूक झाली. या निवडणुकीनंतर काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा चव्हाण यांच्या हातात राज्याची सूत्रे दिली. पण त्यानंतर अवघ्या वर्षभरातच त्यांना आदर्श सोसायटी घोटाळ्यात आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. मुंबईत 2010 मध्ये कारगिल युद्धातील हुतात्म्यांच्या वारसांसाठी आदर्श हाउसिंग सोसायटी बांधण्यात आली होती. चव्हाण यांच्यावर या सोसायटीतील काही फ्लॅट आपल्या नातेवाईकांना दिल्याचा आरोप झाला. विरोधकांनी या प्रकरणी काँग्रेसवर टीकेची झोड उठवल्यानंतर अखेर काँग्रेसने 9 नोव्हेंबर 2010 रोजी अशोक चव्हाण यांचा राजीनामा घेतला. राहुल गांधींचे विश्वासू सहकारी अशोक चव्हाण हे राहुल गांधी यांचे विश्वासू म्हणून ओळखले जात. काँग्रेसने नोव्हेंबर 2010 मध्ये आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी त्यांचा राजीनामा घेतला. पण भ्रष्टाचाराच्या आरोपानंतरही ते 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. या निवडणुकीत भाजप व नरेंद्र मोदी यांचा चौफेर झंजावात असताना चव्हाणांनी नांदेडमध्ये काँग्रेसची लाज राखली. त्यानंतर 2015 मध्ये त्यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी नव्या जोमाने काँग्रेसच्या पक्षसंघटनेत प्राण ओतण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना फारसे यश आले नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा नांदेड लोकसभा मतदारसंघात पराभव झाला. भाजप उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी त्यांना अस्मान दाखवले. त्यावेळी अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा पराभव एकट्या राहुल गांधींचा नव्हे तर संपूर्ण पक्षाची सामूहिक जबाबदारी असल्याचे विधान केले होते. यावरून त्यांचे व राहुल गांधी यांच्यातील संबंध अधोरेखित झाले होते. पण 2024 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन त्यांनी राहुल गांधी यांनाच जबरदस्त झटका दिला. 2019 मध्ये ‘वंचित’ फॅक्टरमुळे पराभव प्रताप चिखलीकर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना पराभवाची धूळ चारली होती. चव्हाणांचा चिखलीकरांकडून पराभव झाला, पण त्यांच्या पराभवात खऱ्या अर्थाने वंचित बहुजन आघाडीच्या डॉक्टर यशपाल भिंगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. भिंगे यांना या निवडणुकीत तब्बल 1 लाख 65 हजार 340 मते पडली. त्यामुळे काँग्रेसच्या पारंपरिक व्होट बँकेला मोठे भगदाड पडले. अशोक चव्हाण यांना हमखास मिळणारी मते वंचितकडे वळली. त्याचा फायदा भाजपच्या चिखलीकरांना झाला. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण व भोकर हे 3 विधानसभा मतदार संघ अशोक चव्हाण यांच्या बाजूने उभे राहिले. नांदेड उत्तरमधून त्यांना सर्वाधिक 30 हजार 117 मतांची आघाडी मिळाली. तर नांदेड दक्षिणमधून 4 हजार 864, तर भोकरमधून त्यांना 4 हजार 786 मतांची आघाडी मिळाली. उल्लेखनीय बाब म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही चव्हाण यांना नांदेड उत्तर व दक्षिण मधून 70 हजार, तर भोकरमधून 23 हजार मतांची आघाडी मिळाली होती. दुसरीकडे, प्रताप पाटील चिखलीकरांच्या मदतीला नायगाव, देगलूर व मुखेड हे 3 विधानसभा मतदार संघ धावून आले. मुखेडमधून त्यांना सर्वाधिक 35 हजार 826 मतांची आघाडी मिळाली. तर देगलूरमधून 25, 515, तर नायगावमधून 20,641 मतांची आघाडी मिळाली. त्यातच वंचितने काँग्रेसच्या वाट्याची मते खाल्ल्यामुळे काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातच अशोक चव्हाण यांना पराभवाची चव चाखावी लागली. अशोकरावांच्या राजकीय वारसदार श्रीजया अशोक चव्हाण 1992 मध्ये राज्यात मंत्री झाले. त्यानंतर कायम सत्तेच्या राजकारणात वावरत राहिले. 2008 मध्ये त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद चालून आले. काँग्रेसने वेळोवेळी मोठमोठी पदे देऊन त्यांचा सन्मान केला. पण सत्ता व संघटनेत राज्यकारभार करण्याची संधी मिळूनही अशोक चव्हाण यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. ते भाजपच्या नव्या वाटेवर गेले. विशेषतः देशभरात विविध नेते काँग्रेसची साथ सोडत असताना चव्हाणांच्या 2 पिढ्या गांधी कुटुंबीयांशी एकनिष्ठ राहिल्याची चर्चा सुरू असताना अशोकरावांनी काँग्रेस सोडली. त्यामुळे त्यांच्या जाण्याने काँग्रेसला मोठा झटका बसला. राजकीय विश्लेषकांच्या मते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसकडे आपल्या ज्येष्ठ कन्या श्रीजया यांच्यासाठी तिकीट मागितले होते. पण सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी भाजपमध्ये पसंत केले. या प्रकरणी मजेशीर बाब म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या भोकर विधानसभा मतदारसंघातही भाजपला फारशी लीड मिळाली नाही. चव्हाणांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात भाजप उमेदवाराला केवळ 844 मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीतही हा मतदारसंघ भाजपला धोकादायक ठरू शकतो असे मानले जात आहे.