ते प्रत्यक्षदर्शी असल्यासारखे बोलत आहेत:मर्डर म्हणणे योग्य नाही, राहुल गांधींच्या आरोपांवर सुधीर मुनगंटीवारांचे प्रत्युत्तर
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी परभणी येथे मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या भेटीनंतर राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. तसेच पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला असल्याने यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार असल्याचे देखील त्यांनी म्हंटले आहे. त्यांच्या या आरोपानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले, पराभवावर पराभव झाल्यानंतर, तसेच महाराष्ट्रात सत्तेत येण्याचे हसीन स्वप्ने बघितल्यानंतर जेव्हा एखादा नेता तोंडघाशी पडतो तेव्हा नेत्यांनी कार्यकर्त्यावर संशय घेऊ नये, नेता अपयशी आहे असा शिक्का लागू नये, म्हणून इतक्या मोठ्या संविधानिक पदावर असणारे इतक्या सहजपणे मर्डर म्हणत आहेत. जसे काही राहुल गांधी हे पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पुरावाच देणार आहेत. संशय व्यक्त केला तर आपण ते समजू शकतो. मात्र ते इतक्या विश्वासाने सांगत आहेत, जसे काही ते प्रत्यक्ष साक्षीदार होते आणि त्यांनी मर्डर होताना बघितला आहे, असा टोला मुनगंटीवार यांनी राहुल गांधी यांना लगावला आहे. मर्डर म्हणणे योग्य नाही
सोमनाथ सूर्यवंशी हे संविधानाचे रक्षण करत होते, ते दलित होते म्हणून त्यांची हत्या करण्यात आली. राहुल गांधी यांच्या या आरोपांवर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, खरेच असे वाटते का की असे झाले असेल? एका माथेफिरूनी जे कृत्य केले, त्या कृत्याच्या संदर्भात जे तीव्र आंदोलन झाले त्या घटनेचा आपण उल्लेख करत आहोत, घटनेच्या चौकटीत राहून त्या ठिकाणी काही कारवाई करण्यात आली. चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. किंबहुना या संदर्भात आणखी काही चौकशी करायची असेल तर ती ही करता येईल. मात्र एका संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने असे मर्डर म्हणणे योग्य नाही. पोलिस कर्मचारी देखील सर्व जाती धर्मातले
पुढे सुधीर मुनगंटीवार म्हणाले, एखाद्या चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्यांनी असे मत व्यक्त केले असते तर गोष्ट वेगळी होती. शंका उपस्थित करणे आणि ठासून बोलणे यात जमीन आसमानचा फरक आहे. एक प्रकारे असे बोलून पोलिसांना फसवण्याचे हे काम आहे. या प्रकरणाची चौकशी करणारे पोलिस कर्मचारी देखील सर्व जाती धर्मातले आहेत. तुम्ही त्यांच्यावर आरोप करून स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांच्यावर शंका उपस्थित करून त्यांना अडचणीत आणत आहात, असे मुनगंटीवार म्हणाले. ज्या पोलिसांच्या भरवशावर तुमची सुरक्षा असते, जे पोलिस अधिकारी तुमच्यासाठी जीवाची बाजी लावतात, त्यांना तुम्ही शंकेच्या कटघऱ्यात उभे करत आहात? कशासाठी? केवळ तुमचा मनसुबा पूर्ण व्हावा यासाठी? असा संतप्त सवाल देखील सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.