पुण्यात तीन पोलिस ठाण्यांत घरफोडीचे गुन्हे:कुलुपे तोडून १९ लाखांचे दागिने व लॅपटॉप चोरीला

पुणे शहरात घरफोडी व चोरीच्या घटनांत मोठी वाढ झाली आहे. पण पोलिसांना या घटनांवर अंकुश लावण्यात अपयश येत आहे. विविध घरफोडी गुन्ह्याच्या घटनेत चोरट्यांनी घरांचे कुलूप तोडून १९ लाखांचा मुद्देमाल चोरी केला आहे. याप्रकरणी विश्रामबाग, बंडगार्डन आणि सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंहगड रस्त्यावरील आनंदनगर भागात एका घराचे कुलूप तोडून अनोळखी चोरट्यांनी सात लाख ३९ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. याबाबत बिपीन अजयराव घाडगे (वय ४५, रा. आशिष अपार्टमेंट, आनंदनगर, सिंहगड रस्ता) यांनी फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक भांडवलकर पुढील तपास करत आहेत. चोरटे सोसायटीतील बंद घरची पाहणी करतात. ज्या सोसायटीत रखवालदार नाहीत, अशा सोसायटीतील घरांचे कुलूप तोडून ऐवज चोरुन नेतात. याच पद्धतीने नवी पेठेतील लोकमान्यनगर परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी दहा लाख ९८ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. याबाबत नेहा श्रीराम वाघ (रा. बिबवेवाडी) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या मााहितीनुसार, वाघ यांची आई चारधाम यात्रेला गेल्या आहेत. चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून कपाटातून १० लाख ९८ हजारांचे दागिने चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक एस खाडे पुढील तपास करत आहेत. पुणे स्टेशन भागातील आगरकरनगर परिसरात एका फ्लॅट मध्ये राकेशकुमार भगवती प्रसाद (वय ३७) हे खासगी रेल्वे आरक्षण केंद्र चालवितात. चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून ६८ हजार रुपयांचा लॅपटाॅप आणि रोकड चोरुन नेली. याबाबत प्रसाद यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस काळे पुढील तपास करत आहेत.