तिरुपती प्रसादमचे प्रकरण सुप्रीम काेर्टात:केंद्राने मागवला अहवाल, धर्म रक्षण बाेर्ड बनवा- उपमुख्यमंत्री पवन कल्याण

साजूक तुपातील भेसळ उजेडात आल्यानंतर तिरुमला तिरुपती देवस्थानमने (टीटीडी) पुरवठादार कंपन्यांशी असलेला करार संपुष्टात आणला. प्रीमियर ॲग्री फूड्स, कृपाराम डेअरी, वैष्णवी, श्री पराग मिल्क व एआर फूड कंपनीचा यात समावेश होता. पाच कंपन्यांपैकी केवळ एआर डेअरीच्या तुपामध्ये बीफच्या चरबीची पुष्टी झाली. कंपनीच्या चार ट्रकमध्ये अशुद्ध तूप आढळले. तरीही पाचही कंपन्यांची सेवा बंद केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पुरवठा करणाऱ्या केएमएफशी पुन्हा करार करावा लागला. कंपनीचे दर ४५० रुपयांहून जास्त असल्याने करार थांबवला होता. एआर फूडसोबतचा करार ३२० ते ४११ रुपये असा होता. टीटीडीचे कार्यकारी अधिकारी शामला राव ‘भास्कर’ला शुक्रवारी म्हणाले, मंदिरात आल्यानंतर तुपाचे परीक्षण होत नाही. कंपनीने त्याचा फायदा घेत भेसळयुक्त तूप पाठवले. तुपाच्या शुद्धतेचे परीक्षण करणारी प्रयोगशाळा एनडीडीबी कोलफने तिरुपतीला तुपाची शुद्धता तपासणीसाठी एक यंत्र दान करण्यास सहमती दर्शवली. त्यासाठी ७५ लाख रुपये खर्च येईल. ३२० रुपये किलोचे तूप भेसळीचेच असेल : नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी शुक्रवारी प्रसादमसंबंधी पुन्हा वक्तव्य केले. प्रकाशम जिल्ह्यातील एका सभेत नायडू म्हणाले, बाजारात ५०० रुपये किलो दराने साजूक तूप मिळत होते. तेव्हा जगन सरकारने ३२० रुपये किलोने खरेदी केले. त्यामुळे कंपनी अशी भेसळ करणार होतीच. कमी किमतीच्या तूप खरेदीची चौकशी होईल. प्राण्यांची चरबी असलेल्या तुपापासून बनलेल्या लाडवांमुळे तिरुपती मंदिराच्या पावित्र्याला डाग लागला. कर्नाटक : मंदिरांत नंदिनी ब्रँडच्या तुपाचा वापर प्रसादम लाडवातील भेसळीवरून वादातच कर्नाटक सरकारने शुक्रवारी एक महत्त्वाचा आदेश काढला. सरकारने सर्व धार्मिक संस्थांना व ट्रस्टद्वारे चालवल्या जाणाऱ्या मंदिरांत कर्नाटक मिल्क फेडरेशनच्या नंदिनी ब्रँडच्या तुपाच्या वापराचे आदेश दिले. आंध्रचे सीएम नायडू यांनीही तिरुपती मंदिरातील भेसळयुक्त तूप पुरवठ्यानंतर कर्नाटकच्या नंदिनी ब्रँडचेच तूप वापरण्याचे आदेश दिले आहेत. आंध्र प्रदेशातील तिरुपती तिरुमला मंदिरातील प्रसादम लाडवात वापरलेल्या तुपात प्राण्याच्या चरबीची भेसळ केल्याचे प्रकरण सर्वाेच्च न्यायालयात गेले. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्याकडे मांडलेल्या याचिकेतून धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकारांच्या संरक्षणाची विनंती केली गेली आहे. केंद्रीय आराेग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी आंध्र प्रदेश सरकारला या प्रकरणाचा सविस्तर अहवाल द्यायला सांगितला. नड्डा यांनी कारवाईची हमी दिली आहे. केंद्रीय खाद्यमंत्री प्रल्हाद जाेशी यांनी कारवाईचे आश्वासन दिले.
आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या वक्तव्यानंतर शुक्रवारी माजी मुख्यमंत्री जगनमाेहन रेड्डी यांनी पलटवार केला. नायडूंवर सुडाचे राजकारण पसरवण्याचा आराेप करून ते म्हणाले, नायडूंनी शंभर दिवसांच्या कार्यकाळात नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. त्यापासून लक्ष इतरत्र वळवण्यासाठी नायडू मंदिराच्या प्रसादमचा मुद्दा मांडून काेट्यवधी लाेकांच्या श्रद्धेशी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण म्हणाले, आता मंदिरांशी संबंधित मुद्द्यांवर विचार करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर ‘सनातन धर्म रक्षण बाेर्ड’ ची स्थापना करण्याची वेळ आली आहे. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी म्हणाले, प्रसाद अपवित्र झाल्याची बातमी अस्वस्थ करणारी आहे. मंदिर व्यवस्थापनांनी धार्मिक स्थळांच्या पावित्र्याचे रक्षण करायला हवे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment