तू लढला नाहीस तरी चालेल, पण मत विकू नको:विद्यार्थ्यांचे जनजागृती करत मतदान करण्याचे आवाहन
शालेय विद्यार्थ्यांनी हातात वेगवेगळे संदेश लिहिलेले फलक घेवून मतदानासंबंधी केलेल्या जागृतीचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. यात “तू लढला नाहीस तरी चालेल. पण, मत विकू नको’, असे आवाहन केले आहे. आजचा जनावरांचा बाजारभाव या फलकापासून व्हिडिओची सुरूवात होते. म्हैस ९ हजार रूपये, गाय १ लाख रूपये, शेळी १२ हजार तर कुत्रा ६ हजार रूपये असे फलक घेवून विद्यार्थी एका मागोमाग एक येत जातात. निवडणुकीत स्वत:ला विकणाऱ्या माणसाची किंमत फक्त ५०० रूपये आहे. मुर्ख माणसा तुझ्यापेक्षा कुत्रा महाग आहे असे फलक घेवून विद्यार्थी येत राहातात…आपला स्वाभिमान गहाण ठेवू नका, आपले मत बहुमूल्य आहे ते विकू नका आणि वाया घालवू नका असे आवाहनही ते करतात. आणि सरते शेवटी सोडा सर्व काम करूया मतदान असा संदेशही देतात… विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर हा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे. निवडणुकीत मते विकत घेण्याचे, मतदारांना प्रलोभन दाखवण्याचे प्रयत्न होतात. अनेक प्रसंगी मतदार या प्रलोभनांना बळी पडल्याचेही दिसून येते. यावर अंजन घालणारा हा व्हिडीओ आहे…लोकशाही सुदृढ करायची असेल तर निवडणूक स्वच्छ व पारदर्शक होण्याची गरज असते. त्यासाठी शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना लोकशाही शिक्षण देण्याची आवश्यकता असते. शालेय शिक्षणात नागरिकशास्त्र शिकवले जाते. पण विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून नागरिकशास्त्र शिकवण्याचा यशस्वी प्रयोग अनेक शाळा करतात. मतदान वाढीसाठी एक अफलातून उपक्रम करणाऱ्या राज्यातील एका शाळेचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओत विद्यार्थ्यांनी काहीही करा, पण मतदान करा असे आवाहन करताना स्वत:चे मत विकू नका असे आवाहनही केले आहे. विधानसभा निवडणूक २०२४ साठी बुधवार,२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान आहे. शासनातर्फे मतदान वाढीसाठी पथनाट्य, फ्लॅशमॉब, शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती असे उपक्रम केले जात आहे. मतदानाच्या दिवशी लागून सुट्या आल्यास लोक सहलीला निघून जातात. परिणामी मतदानाचा टक्का घसरतो. हे टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने यावर्षी आठवड्याच्या मध्यातला दिवस निवडला आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठीच आयोगाने हा निर्णय घेतल्याचे दिसून येते.