तुम्ही हिंदूंना मारून गुन्हा करत आहात:भविष्यात गजवा-ए-हिंद झाले तर मराठी लोकांना कोण वाचवणार? सुनिल शुक्लांचा राज ठाकरेंना सवाल

भाषेचा आम्ही आदर करतो पण भाषेच्या नावाखाली तुम्ही कोणाला मारू शकत नाही. तुम्ही हिंदूंना मारून सर्वात मोठा गुन्हा करत आहात, अशी टीका उत्तर भारतीय विकास सेनेचे प्रमुख सुनिल शुक्ला यांनी राज ठाकरे यांच्यावर केली. जे 100 टक्के मुस्लीम आहेत, त्यांना तुम्ही मारत नाहीत. मात्र, ब्राह्मण, क्षत्रिय असणाऱ्या उत्तर भारतीयांना मारले जाते. याद्वारे तुम्ही हिंदूंमध्ये फूट पाडत आहात, असा आरोप शुक्ला यांनी राज ठाकरेंवर केला. महाराष्ट्रात कुठेही गजवा ए हिंद झाले तर मराठी लोकांना वाचवण्यासाठी माझा उत्तर भारतीय उभा राहयला हवा की नको? असा सवालही सुनिल शुक्ला यांनी राज ठाकरेंना केला. राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या भाषणात मनसैनिकांना सर्व बँकांमध्ये जाऊन मराठी भाषा वापरली जाते की नाही हे पाहण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर कार्यकर्त्यांनी सर्व बँकांमध्ये जाऊन मराठी भाषा वापरली जात आहे की नाही हे तपासले तसेच हिंदी भाषिकांना देखील चांगलाच दम दिल्याचे पाहायला मिळाले. यावरून राजकीय पडसाद देखील उमटण्यास सुरू झाले आहेत. उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांनी मनसेच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी सुनील शुक्ला यांनी याचिकेतून केली आहे. नेमके काय म्हणाले सुनिल शुक्ला? आरएसएस, बजरंग दलात 90 टक्के कार्यकर्ते हे उत्तर भारतीय आहेत याचा आम्हाला गर्व आहे. त्यांचे वडील, काका, मोठे भाऊ, आजोबा ड्युटीवर आहेत ते तिथे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. त्यांच्या कानफाडीत तुम्ही मारत आहात. उद्या तुम्हाला या लोकांनी मदत केली पाहिजे. हे कसले राजकारण…आम्ही तुमचा विरोध करतो, सुप्रीम कोर्टात तुमच्याविरोधात आदेश आणणारच आहे. सनातनी हिंदू पक्ष म्हणून आम्ही सर्वांना एकत्रित करून तुमच्याविरोधात उभे करणार, असा इशारा सुनिल शुक्ला यांनी राज ठाकरे यांना दिला. हिंदूंना मारून राज ठाकरे मोठा गुन्हा करत आहेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मराठी न येणाऱ्यांना मारा असा आदेश दिला. त्यानंतर सर्व मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. मराठी भाषा येत नाही त्यांना मारले जाते. सिक्युरिटी गार्ड असो वा बँकेत काम करणारा कर्मचारी याला मारहाण होते. भाषेचा आम्ही आदर करतो पण भाषेच्या नावाखाली तुम्ही कोणाला मारू शकत नाही. तुम्ही हिंदूंना मारून सर्वात मोठा गुन्हा करत आहात, असे सुनिल शुक्ला म्हणाले. तुम्ही मुस्लिमांना मारत नाहीत तुम्ही पंक्चरवाला, चावी बनवणाऱ्यांना, मटण-चिकन दुकानदारांना मारत नाहीत जे 100 टक्के मुस्लीम आहेत. मात्र तुम्ही उत्तर भारतीय जो ब्राह्मण, क्षत्रिय असेल त्यांना मारहाण करत आहात. तुम्ही हिंदूंमध्ये फूट पाडत आहात असे सुनील शुक्ला यांनी म्हटले. जर भविष्यात महाराष्ट्रात कुठेही गजवा ए हिंद झाले तर मराठी लोकांना वाचवण्यासाठी माझा उत्तर भारतीय उभा राहयला हवा की नको? असा सवाल करत तुम्ही उत्तर भारतीय आणि मराठी माणसांचे विभाजन करत आहात, असा आरोप सुनिल शुक्ला यांनी राज ठाकरेंवर केला. हिंदूंना कृपा करून विभाजित करू नका, अशी विनंतीही शुक्ला यांनी केली. राज ठाकरे हिंदवी स्वराज्याचा अपमान करत आहेत उत्तर भारतीय विकास सेना हा राजकीय पक्ष असून आम्ही उघडपणे सनातनी पक्ष असल्याचे सांगतो. जर तुम्ही हिंदूंविरोधात अशी भूमिका घेत असाल, तर आम्ही सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. तुम्ही संविधानाचे उल्लंघन करत आहात. तुम्ही हिंदूंना मारण्याचे आदेश दिलेत असे वाटते. तुम्ही ज्या लोकांना मारले ते हिंदू होते. तुम्ही हिंदूविरोधी आहात. महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा अपमान तुम्ही करताय. मराठा आरक्षणाला तुमचा पाठिंबा नाही. तुम्ही केवळ उत्तर भारतीय नव्हे तर मराठी लोकांचेही विरोधक आहात, अशी टीका सुनिल शुक्ला यांनी केली.