उद्धव अन् राज ठाकरेंनी एकत्र यावे:गुढीपाडव्याच्या दिवशी ‘बंधू मिलन’ कार्यक्रम आयोजित; बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी निमंत्रण पत्रिका

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र यावेत अशी भावना मराठी माणसांकडून व्यक्त केली जात आहे. तसे प्रयत्नही त्यांच्याकडून सुरू आहेत. पण या दोन्ही भावांनी अद्याप एकमेकांपुढे मैत्रीचा हात पुढे केला नाही. पण आता मुंबईतील मराठी माणसाने या दोन्ही भावांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी यासाठी गुढीपाडव्याच्या निमित्ताने बंधू मिलन कार्यक्रम आयोजित केला आहे. मोहनिश रवींद्र राऊळ नामक व्यक्तीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने ठाकरे बंधूंच्या मिलनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या निमित्ताने उद्धव व राज ठाकरे यांना गुढीपाडव्याच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर मराठी माणसांच्या हितासाठी एकत्र यावे अशी विनंती त्यांना केली जाणार आहे. राऊळ यांनी या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळावर ठेवली आहे. नेमके काय आहे निमंत्रण पत्रिकेत? मोहनिश राऊळ यांनी आपल्या निमंत्रण पत्रिकेत म्हटले आहे की, बंधू मिलन निमंत्रण… भाऊ माझा आधार, माझ्या ध्येयाचा किनारा, आयुष्याच्या प्रत्येक सुख दुःखाचा सोबती, भाऊ माझ्या जीवनाचा आधार. बंधू मिलन कार्यक्रम दिनांक 30 मार्च 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज मैदान मुंबई येथे सकाळी 11 वाजता स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाजवळ घेण्याचे योजिले आहे. मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येण ही काळाची गरज आहे, तरी आपली उपस्थिती वंदनीय असेल. ठाकरे बंधू निमंत्रण स्वीकारणार का? विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही ठाकरेंची पुरती वाताहात झाली आहे. विशेषतः शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्या राजकीय भवितव्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. राज ठाकरेंच्या बाबतीतही अशीच काहीशी स्थिती आहे. विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाला अवघ्या 20 जागांवर समाधान मानावे लागले. तर 128 जागा लढवणाऱ्या मनसेला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे या दोन्ही बंधूंनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी एकत्र येऊन आपले राजकीय अस्तित्व अबाधित ठेवावे असे सांगितले जात आहे. त्यानुसार या बंधू मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आता ठाकरे बंधू या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांना बळ मिळेल दुसरीकडे, ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी माणसाला मोठे बळ मिळणार असल्याची भावना मोहनिश राऊळ यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, आज होळीचा सण आहे, त्यामुळे यानिमित्ताने सर्वकाही विसरुन राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे. भाऊच भावासाठी धावून येतो. महाराष्ट्राला सध्या या दोघांची व एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. पण सध्या मराठी माणूसच मराठी माणसांसोबत भांडतो. दोन ठाकरे ब्रँड वेगळे झाले आहेत. ते एकत्र आले तर कुठेतरी मराठी माणसाला बळ मिळेल.