उद्धव ठाकरे संयमी, पण खंबीर राजकारणी:दिल्ली ते गल्लीपर्यंतच्या विखारी राजकारणात स्वतःला सिद्ध करणारा मुख्यमंत्री
मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेली संघटना म्हणजे शिवसेना… बाळासाहेब ठाकरे यांनी या संघटनेची स्थापना केली. तो दिवस होता 19 जून 1966. या संघटनेला आता तब्बल 58 वर्षे झालीत. या 58 वर्षांत अनेक गोष्टी बदलल्या. बाळासाहेबांच्या शिवसेनेची दोन शकले झाली. मूळ शिवसेना एकनाथ शिंदेंकडे गेली, तर उद्धव ठाकरेंना त्यांच्या वडिलांच्या नावाचा समावेश असणारी नवी शिवसेना मिळाली. शिवसेना विभागली गेली, पण त्यातून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला एक नवी झळाळी मिळाली. होय, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या मालिकेत आज आपण पाहत आहोत एक व्यावसायिक फोटोग्राफर, सिद्धहस्त लेखक, खंबीर अन् तेवढेच संयमी राजकारणी तथा शिवसेना पक्षप्रमुख ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख म्हणून परिचित असणारे महाराष्ट्राचे 19 वे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजकीय प्रवास… सुरुवातीला थोडेसे शेवटचे… महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवताना उद्धव ठाकरे अचानक राजकीय राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त झाले. काहीवेळापूर्वी साहेब-साहेब म्हणणारे पक्षाचे आमदार त्यांच्या विरोधात गेले. त्यानंतर वडिलांनी विश्वासाने सोपवलेला पक्षही दुसऱ्याच कुणाच्या तरी हातात गेला… पण अखेर विखारी राजकारणात स्वतःला व स्वतःच्या कुटुंबाला सावरत गाठीशी असणाऱ्या निवडक सहकाऱ्यांच्या जोरावर पुन्हा एकदा पक्ष संघटना उभी करण्याची किमया उद्धव ठाकरेंनी करून दाखवली. दिल्लीपासून गल्लीपर्यंत अत्यंत विखारी प्रचार सुरू असताना उद्धव यांनी लोकसभा निवडणुकीत एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेतली. त्यांची ही कर्तबगारी राजकीय विश्लेषकांसह त्यांचे विरोधकही मोठ्या मनाने मान्य करतात. आता पाहू उद्धव ठाकरे यांची पार्श्वभूमी उद्धव ठाकरे यांचा जन्म 27 जुलै 1960 रोजी मुंबईत झाला. त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमधून पदवी घेतली. त्यांनी काढलेल्या छायाचित्रांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. एक सिद्धहस्त लेखक व व्यावसायिक छायाचित्रकार असलेल्या ठाकरे यांच्या कलाकृतींची दखल अनेक विख्यात वृत्तपत्रांनी वेळोवेळी घेतली. तसेच त्यांच्यातील जागतिक दर्जाच्या छायाचित्रकाराचे दर्शनही विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून रसिकांना घडते. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा अलौकिक सौंदर्याचे मूर्तीमंत व विहंगम छायाचित्रण आपल्या ‘महाराष्ट्र देशा’ या 2010 ला प्रकाशित झालेल्या पुस्तकात केले. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिकतेचा मानबिंदू असलेल्या ‘पंढरपूर वारी’चे व ग्रामीण महाराष्ट्राचे यथार्थ छायाचित्रण त्यांच्या ‘पहावा विठ्ठल’ या 2011 मधील पुस्तकातून दिसते. उद्धव ठाकरे यांनी आपल्या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून निधी उभारून दुष्काळी भागातील शेतकरी व वन्यजीव संरक्षणासाठी भरीव मदत केली. संवेदनशील लेखक, कवी, अभ्यासू आणि छायाचित्रकार असलेल्या उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणले. त्यांच्यामुळेच शिवसेनेला एका सुसंघटित पक्षाचे रुप मिळाले. शिवसेनची धुरा कशी आली हातात? शिवसेना कार्याध्यक्ष ते शिवसेनेतील सर्वांत मोठ्या बंडापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. पण ते राजकारणात कसे आले? आणि थेट शिवसेनेचे कार्याध्यक्ष कसे बनले? याचा इतिहास फारच रंजक आहे. 30 जानेवारी 2003 ची घटना आहे. महाबळेश्वरमध्ये शिवसेनेचे अधिवेशन भरले होते. त्यावेळी तिथे हजर असलेल्यांत एकच चर्चा सुरू होती, ती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा उत्तराधिकारी कोण? राज ठाकरे की उद्धव ठाकरे? अधिवेशनस्थळी दबक्या आवाजात वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या. एखादी मोठी घोषणा होण्याची सर्वांनाच अपेक्षा होती. त्यानंतर या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांच्या गैरहजेरीत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव कार्याध्यक्षपदासाठी मांडला आणि तिथेच सर्वांच्या प्रश्नांना उत्तर मिळाले. उद्धव ठाकरेंचे नाव कार्याध्यक्षपदासाठी पुढे येणे हे अनेकांसाठी आश्चर्यकारकच नव्हे तर धक्कादायकही होते. पण बाळासाहेबांचा निर्णय अंतिम अशी सेनेची परंपरा होती. त्यामुळे कुणीही या निर्णयाचा विरोध केला नाही. पण या घटनेमुळे राज ठाकरे यांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न उभा टाकला. पण त्याची बिजे 1995 च्या युतीची सत्ता आली तेव्हापासूनच रोवली गेली होती. राज ठाकरे कशामुळे मागे पडले? 1995 मध्ये युतीची सत्ता आल्यानंतर राज ठाकरे पूर्ण जोमात होते. शिव उद्योग सेनेच्या माध्यमातून त्यांनी कामांचा व कार्यक्रमांचा धडाका लावला होता. बाळासाहेबांचे नैसर्गिक वारसदार तेच असतील अशी चर्चा त्यावेळी शिवसेनेच्या वर्तुळात सुरू झाली होती. पण अचानक रमेश केणी हत्याकांडात राज ठाकरे यांचे नाव आले आणि ते काहीसे बाजूला फेकले गेले. या प्रकरणामुळे राज ठाकरे राजकारणात मागे पडले ते कायमचेच… 18 डिसेंबर 2005 रोजी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याची घोषणा केली. यावेळी बाळासाहेबांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यांचा निरोप घेऊन मनोहर जोशी व संजय राऊत हे दोघे राज यांच्या निवासस्थानी गेले. पण तिथे राऊत यांच्या गाडीची मोडतोड करण्यात आली. हा तोच काळ होता जेव्हा एकीकडे राज यांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता सतावत होती, तर दुसरीकडे, उद्धव आपल्या नेतृत्वाचा खुंटा हलवून तो अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नांत होते. अखेर राज यांनी 9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची घोषणा केली आणि उद्धव यांच्या हाती शिवसेनेची धुरा आली ती कायमची. पण भविष्याच्या पोटात त्यांच्यासाठी काहीतरी वेगळेच वाढून ठेवले होते.
ठाकरे घराण्याचा पहिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाकरे घराण्याचा पहिला व शिवसेनेचा तिसरा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची सूत्रे हाती घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली. त्यात त्यांनी त्यांना अत्यंत कडक शब्दांत समज दिली. ते म्हणाले की, मी या ठिकाणी नवीन जरूर आहे, पण आम्ही बाहेर राहून बरेच पाहिले आहे. मला लोकांच्या समस्या माहिती आहेत. त्यामुळे माझ्यासमोर चुकीच्या फायली अजिबात आणू नका. त्यांनी हा कडक इशारा दिल्यानंतर कोणत्याही अधिकाऱ्याने त्यांच्यासमोर चुकीच्या फायली आणण्याचे धाडस काय विचारही केला नाही. वेगवान, ऐतिहासिक आणि अभूतपूर्व अशा घडामोडींनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. त्यांच्या सरकारमध्ये 2 माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्राच्या प्रशासनावर मांड ठोकून असणाऱ्या अनुभवी मंत्र्यांचा समावेश होता. त्यामुळे त्यांच्या सानिध्यात राहून स्वतःचा वेगळा ठसा उमटवून प्रशासकीय वाटचाल करण्याचे मोठे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यापुढे होते. त्यात ते बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाले. वादग्रस्त मुद्यांवर लागली सचोटीची कसोटी कोणतेही नवे सरकार आले की आपल्या मर्जीच्या अधिकाऱ्यांना चांगली पदे देणे आणि आधीच्या सरकारमधील अधिकाऱ्यांना हटवणे हा नियमच असतो. उद्धव ठाकरेही त्याला अपवाद नव्हते. त्यांनी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या, तर काही जुन्या जाणत्या अधिकाऱ्यांवर विश्वास दाखवला. पण त्यानंतरही अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या, कंगना राणावतचे वाक्बाण, अर्णब गोस्वामी व टीआरपी घोटाळा आदी मुद्यांवर त्यांची चांगलीच कसोटी लागली. त्यातच कोरोना महामारीने त्यांच्या नेतृत्व गुणांचा कस लागला. कोरोना महामारी अन् उद्धव ठाकरे महाराष्ट्रात 9 मार्च 2020 रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर झपाट्यने रुग्णसंख्येत वाढ झाली. विशेषतः मुंबई व पुण्यात स्थिती गंभीर बनली होती. ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्यापुढे विविध राजकीय व आर्थिक आव्हाने होती. त्यात कोरोना महामारीमुळे आरोग्याचे सर्वात मोठे आव्हान त्यांच्यापुढे उभे टाकले. ही महामारी रोखण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या. मुंबई, पुण्यात जंबो हॉस्पिटल्सची उभारणी केली. ठाकरे सरकारने कोव्हिडवर देशातील पहिली टास्क फोर्स स्थापन केली. उद्धव ठाकरेंनी वेळोवेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या टास्क फोर्सच्या कामकाजाचा आढावा घेत होते. तसेच कोव्हिड लस अधिकाधिक लोकसंख्येपर्यंत पोहोचवावी याची काळजीही घेत होते. संकट काळात राज्याला उद्देशून संबोधन करणे हे त्यांचे एक ठळक वैशिष्ट्य होते. या संबोधनांतून त्यांनी कोव्हिडच्या परिस्थितीची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली. कधी सौम्य तर कधी कडक शब्दांत त्यांनी जनतेला सूचना केल्या. यातून त्यांनी राज्याचा प्रमुख म्हणून आपली प्रतिमाही ठळकपणे जनतेच्या मनात उभी केली. पण त्यानंतरही त्यांना वाढती रुग्णसंख्या, बेड्सचा तुटवडा, लॉकडाऊनमधील जिवनावश्यक वस्तुंचा तुटवडा, दळणवळण, कुलूपबंद मंदिरांच्या मुद्यांवरून विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले. कोविड काळातील धारावी पॅटर्नचे कौतुक उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळालेला कार्यकाळ अत्यंत नाजूक होता. त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळातील साधारण दीड वर्षांचा कार्यकाळ कोविड सारख्या महामारीत गेला. या काळात उद्धव यांनी आपल्यातील संयमी, कणखर अन् तेवढ्याच काळजी करणाऱ्या कुटुंबप्रमुखाची झलक जनतेला दाखवली. त्यांनी कोविडमध्ये केलेल्या कामाची अनेकांनी स्तुती केली. त्यांनी या काळात राबवलेला धारावी पॅटर्नची जगाने दखल घेतली. त्यांनी फेसबुक लाईव्हच्या मदतीने थेट जनतेशी कौटुंबिक पातळीवर जाऊन संवाद साधला. त्यामुळे त्यांच्या प्रतिमा निर्मितीत मोठी मदत झाली. त्यानंतर उद्धव ठाकरेंना आलेले आजारपण व त्यात पडलेली पक्षात फूट, भाजपने केलेली दगाबाजी केल्याचा त्यांचा प्रचार व त्याला मिळालेली जनतेची साथ हीच त्यांच्या यशाची खरी क्रोनोलॉजी असल्याचे मानले जात आहे. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा वाद उद्धव ठाकरे यांच्या काळात अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने आत्महत्या केली. या प्रकरणी उद्धव ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठली. भाजप नेते नारायण राणे यांनी तर थेट या घटनेप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्याकडे अंगुलिनिर्देश केला. त्यांनी यासंबंधी आदित्य यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. पण आदित्य यांनी हे सर्वच आरोप फेटाळून लावले. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. मुंबई पोलिस हे प्रकरण दाबत असल्याचा आरोप झाला. सोशल मीडियावरही याचे तीव्र पडसाद उमटले. त्यातच महाराष्ट्र सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची काहीच गरज नसल्याचे स्पष्ट केले. यामुळेही ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठली. नंतरच्या काळात ठाकरे सरकार पडले. या प्रकरणाचे भूत ठाकरे कुटुंबावर कायमच घोंगावत राहिले. उद्धव ठाकरेंनी शिवसेना मवाळ केली? बाळासाहेबांच्या हयातीत शिवसेनेवर कुणीही टीका करण्याची हिंमत करत नव्हते. कुणी केलीच, तर त्याचे पडसाद तोडफोडीच्या स्वरुपात उमटत होते. याऊलट उद्धव ठाकरे यांच्यावर नेहमीच तिखट टीका होते. पण त्यावर कोणतीही प्रतिक्रिया उमटत नाही. त्यामुळे उद्धव यांच्यावर शिवसेनेला मवाळ केल्याचा आरोप होतो. विश्लेषकांच्या मते, उद्धव ठाकरे हे केव्हाच स्वभावाने बाळासाहेबांसारखे नव्हते. ते आपल्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या जवळचे होते. मीनाताई ठाकरे आपल्या प्रेमळ व सौम्य स्वभावामुळे ओळखल्या जात. त्यामुळे त्यांच्या याच स्वभावाची चुणूक उद्धव ठाकरे यांच्यात दिसते. अखेर एकनाथ शिंदेंचे ऐतिहासिक बंड शिवसेनेत 20 जून 2022 रोजी ऐतिहासिक बंड झाले. उद्धव ठाकरे सरकारमधील तत्कालीन नगरविकास मंत्री 20 जून 2022 रोजी विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर अचानक नॉट रिचेबल झाले. विधानभवनातून ते प्रथम ठाण्यातून गुजरातच्या सुरतला गेले. त्यानंतर गुवाहाटी व गोव्यापर्यंत अनेक झाडी, डोंगर अन् हॉटेल पादाक्रांत करत ते महाराष्ट्रात पोहोचले. 30 जून 2022 रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि शिवसेनेतील या नाट्याच्या पहिल्या अंकावर पडदा पडला. एकनाथ शिंदे यांच्या या बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यावेळी शिंदेंच्या पाठिशी तब्बल 40 आमदार व 13 खासदार उभे टाकले होते. याऊलट ठाकरेंकडे केवळ 15 आमदार व 5 खासदार उरले होते. त्यामुळे विरोधकांनी आता उद्धव ठाकरे पार उद्ध्वस्त झाल्याची आवई उठवली. यामुळे ‘मातोश्री’चा दबदबा कमी झाल्याचा दावाही करण्यात आला. या घटनाक्रमामुळे उद्धव काहीसे खचल्याचे दिसले, पण त्यांनी हार केव्हाच मानली नाही. शिवसेनेतील बंडखोरीनंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. ते त्यांच्यापुढे आलेल्या प्रसंगाला धिरोदात्तपणे सामोरे गेले. सोबत राहिलेल्या निवडक सहकाऱ्यांच्या जोरावर त्यांनी एकनाथ शिंदेंसह केंद्रातील बलाढ्य भाजपविरोधात मोठा संघर्ष उभा केला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही शिंगावर घेतले. त्यांनी आपले सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातून गत लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचे 9 खासदार निवडून आले. या माध्यमातून त्यांनी आपल्या संघटनेला पुन्हा गतवैभव मिळवून दिले. पण तोपर्यंत त्यांना राजकीय आघाडीवर मोठा संघर्ष करावा लागला. आता पाहूया एकनाथ शिंदेंच्या बंडाची पार्श्वभूमी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार व मुख्यमंत्रीपद शिवसेनेला मिळणार हे स्पष्ट झाले तेव्हा एकनाथ शिंदे व त्यांच्या निकटवर्तीयांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आपल्या नावाची घोषणा करतील असे वाटत होते. कारण, तेव्हा एकनाथ शिंदे यांच्याएवढा मोठा नेता शिवसेनेत दुसरा कोणताही नव्हता. शिंदे यांच्याकडे जनाधार होता, पैसा होता व महाराष्ट्राच्या एका मोठ्या भागात नेटवर्कही होते. त्यांनी आपल्या खिशातून अनेक सामाजिक कार्य केले. पण त्याचे श्रेय शिवसेनेला दिले. शिवसेना भवनात झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली. तेव्हा त्यांची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वकांक्षा अधिकच बळावली. उद्धव ठाकरेही आपल्या वडिलांसारखेच म्हणजे बाळासाहेबांसारखे सरकारबाहेर राहून सरकार चालवतील असा त्यांचा मानस होता. पण झाले उलटेच. राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष शरद पवार महाविकास आघाडीच्या सरकारसाठी काँग्रेसचा पाठिंबा मागण्यासाठी दिल्लीत गेले तेव्हा सोनिया गांधी यांनी त्यांच्यापुढे वेगळीच अट ठेवली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार असतील तरच काँग्रेस मविआ सरकारला आपला पाठिंबा देईल असे त्या म्हणाल्या. दुसरीकडे, उद्धव यांनाही त्यांच्या पत्नी व मुलांनी हे पद स्वीकारण्यासाठी तयार केले. त्यामुळे उद्धव मुख्यमंत्री झाले आणि एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगले. ज्येष्ठ पत्रकार जितेंद्र दीक्षित आपल्या ‘सर्वात मोठी बंडखोरी’ या पुस्तकात म्हणतात, महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले तेव्हा शिवसेनेला काही निवडक महत्त्वाचे खाती मिळाली. त्यात नगरविकास मंत्रालयाचा समावेश होता. सामान्यतः मुख्यमंत्री हा विभाग स्वतःकडे ठेवतात. पण उद्धव ठाकरे यांनी हे महत्त्वाचे खाते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवले. त्याचवेळी त्यांनी शिंदेंवर सातत्याने नजर ठेवण्याचीही तजवीज केली. एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांनुसार, आदित्य ठाकरे हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये पर्यावरण व पर्यटन मंत्री होते. पण ते शिंदेंच्या मंत्रालयावरही अघोषितपणे अधिकार गाजवत होते. ते त्यांच्या विभागाच्या बैठकाही घेत होते. नगरविकास खात्याचे सर्वच निर्णय आदित्य ठाकरे घेत होते. केवळ स्वाक्षरीसाठी फाईल शिंदेंकडे जात होती. यामुळे शिंदे कमालीचे नाराज झाले होते. त्याचे पर्यावसान अखेर एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीत झाले. संजय राऊत यांची खमकी साथ शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षाच्या बड्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंसोबत जाणे पसंत केले. त्यामुळे पक्षाची बाजू ठामपणे मांडणारा एकही मोठा नेता उद्धव ठाकरे यांच्यासोबत उरला नव्हता. त्यामुळे या कठीण प्रसंगांत महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे खासदार संजय राऊत त्यांच्या मदतीला धावून आले. संजय राऊत यांनी धडाडीने उद्धव ठाकरे यांची बाजू माध्यमांपुढे मांडली. विरोधकांचे होणारे चौफेर हल्ले त्यांनी यशस्वीपणे परतावून लावले. मधल्या काळात त्यांना तुरुंगातही जाण्याची वेळ आली. पण ‘आपली मान कापली तरी बेहत्तर, पण मी भाजपला शरण जाणार नाही’, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली. त्यांची ही भूमिका जनतेच्याही पसंतीस उतरली. संजय राऊत यांनी ठाकरे गटाचा किल्ला एकहाती लढवला. त्यांची उद्धव ठाकरेंसोबत असणारी मैत्रीही राजकारणापलिकडची आहे हे विशेष. उद्धव ठाकरे भाजपविरोधी आघाडीचा प्रमुख चेहरा उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून देशाच्या राजकीय पटलावरील अनेक महत्त्वाच्या मुद्यांना हात घालत आपली राजकीय दिशा स्पष्ट केली. त्यांनी थेट नरेंद्र मोदी – अमित शहांच्या सत्ताकेंद्राला आव्हान दिले. मोदींच्या नेतृत्वात देशाची आर्थिक व सामाजिक घडी विस्कळीत होत असल्याचा आरोप त्यांनी केला. या माध्यमातून ठाकरे स्वतःला भाजप विरोधी आघाडीचा प्रमुख चेहरा म्हणून स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे लोकांसाठी महत्त्वाचे कायम असणारे राजकीय, सामाजिक व आर्थिक मुद्यांवरून सातत्याने केंद्रावर टीका करून त्यांनी राष्ट्रीय राजकारणाच्या सामिल होण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. अखेर शिवसेना व ठाकरे हे समीकरण तुटले प्रत्येक संघटना चढ-उतार पाहत असते. पण तिच्या प्रवासात कधी-कधी अशा घटना घडतात की, तिच्या अस्तित्वाला आव्हान निर्माण होते किंवा ती अवघी संघटनाच बदलून जाते. शिवसेनेचा जन्म 60 च्या दशकात झाला. तेव्हापासून या पक्षाने 4 मोठ्या बंडखोऱ्या पाहिल्या. पहिल्या 3 बंडखोऱ्या झाल्या तेव्हा बाळासाहेब ठाकरे हयात होते. पण शिवसेना सत्तेत नव्हती. या बंडखोरीमुळे शिवसेनेला मुळापासून हलवले, पण त्याचा पक्षावर प्रदिर्घ काळापर्यंत कोणताही प्रभाव राहिला नाही. पक्षाची सूत्रे ठाकरे कुटुंबाकडेच राहिली. पण जून 2022 मध्ये झालेली बंडखोरी यापूर्वी झालेल्या बंडखोरीहून पूर्णतः वेगळी होती. सर्वात मोठी होती. या बंडखोरीमुळे केवळ उद्धव ठाकरे यांच्या हातून महाराष्ट्राची सत्ताच हिरावली गेली नाही, तर शिवसेनेची सूत्रेही ठाकरे कुटुंबाकडून हिरावली गेली. शिवसेना व ठाकरे एकमेकांना समानार्थी शब्द होते. पण आता हे समीकरण पूर्णतः बदलले आहे. आता शिवसेनेची दोन शकले झाली आहेत. एका गटाचे नेतृ्त्व एकनाथ शिंदे करत आहेत. या गटाला शिवसेना म्हणून ओळखले जाते. तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नामक दुसरा गट कार्यरत आहे. हा गट सध्या मशाल या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. ही विधानसभा निवडणूक या दोन्ही गटांसाठी सत्वपरीक्षा असून, त्यात कोण वर्चस्व गाजवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या विशेष मालिकेतील शेवटच्या भागात उद्या आपण पाहूया विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जीवनप्रवास… तूर्त खाली वाचा या मालिकेतील आतापर्यंतच्या सर्व स्टोरीज… संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर मराठी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण:निष्ठेमुळे पंतप्रधान पदाची संधीही गमावली पेपर विकणाऱ्या माणसाने केले महाराष्ट्राचे सारथ्य:हातात झाडू घेऊन स्वतः रस्त्यावर उतरला होता आपला दुसरा मुख्यमंत्री सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद सांभाळणारे वसंतराव नाईक:कृषी क्षेत्राच्या प्रगतीसाठी शनिवारवाड्यासमोर फाशी घेण्याची शपथ घेतली गोदाकाठचा राजयोगी शंकरराव चव्हाण:महाराष्ट्राला सिंचनाच्या नकाशावर ठळक स्थान मिळवून देणारा कडक शिस्तीचा हेडमास्तर विधवेशी दुसरे लग्न करणारे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील:देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत लागली होती इंग्रजांची गोळी बंडखोरी करून पहिल्यांदा बनले मुख्यमंत्री, 4 वेळा CM:शरद पवार यांची 5 हून अधिक दशकांची कारकीर्द; इतरांना बेसावध ठेवून राजकारणात नेहमीच ठरले सरस ब्रिटीश पंतप्रधानांना आव्हान देणारा मुख्यमंत्री:बॅरिस्टर अंतुले… शेतकरी कर्जमाफीसाठी RBI ला भिडले; संजय गांधी निराधार योजनेचे जनक ते मुख्यमंत्री होणे हा चमत्कारच:कुणाच्याही ध्यानी-मनी नसताना CM बनले होते बाबासाहेब भोसले, वाचा रंजक किस्से अवघे 282 दिवस राहिले CM:MBBS परीक्षेत मुलीचे 2 मार्क वाढवल्याचा आरोपामुळे शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी सोडले होते मुख्यमंत्रिपद मुंबईतील माफियाराज संपवणारे मुख्यमंत्री:जाणून घ्या, सरपंच ते राज्यपाल पदापर्यंतचा सुधाकरराव नाईक यांचा प्रवास! शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशी:रिमोट कंट्रोल मुख्यमंत्री म्हणून टीका; नगरसेवक ते लोकसभा अध्यक्ष पर्यंतचा प्रवास आक्रमक मराठा चेहरा म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी नारायण राणेंना मुख्यमंत्री केले:पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अपूर्णच; वाचा त्यांचा राजकीय प्रवास काँग्रेसमधून निलंबित होऊनही CM बनले विलासराव देशमुख:सरपंच ते मुख्यमंत्री असा प्रवास; म्हणाले होते-रक्तातली काँग्रेस कशी काढणार? कोर्टातील शिपाई ते देशाचे गृहमंत्री:पहिले दलित CM, शरद पवारांमुळे राजकारणात एन्ट्री अन् त्यांच्याच विरोधात बंड अशोक चव्हाणांकडे CM पद आले तसे गेले:त्यांचा ‘आदर्श’ काँग्रेसला पडला महागात; आता नव्या पिढीसाठी नव्या वाटेवर काँग्रेसची प्रतिमा खराब असताना पृथ्वीराज चव्हाणांवर मुख्यमंत्री पदाची धुरा:गांधी घराण्याशी निष्ठा आणि मराठा वादातीत चेहरा ठरले कारण देवेंद्र फडणवीस ठरले 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री:सर्वात कमी काळाचा विक्रमही त्यांच्याच नावावर