उद्धव ठाकरे म्हणाले- मला मोदी-शहा घरी बसवू शकत नाही:तुम्ही सांगाल तेव्हा घरी बसेन; तुमच्यासाठी प्राण गेला तरी बेहत्तर, लढून जिंकून दाखवेन
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित सभेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे म्हणाले, मागच्या वेळेस लोकसभेला आलो होतो तेव्हा देखील अशीच गर्दी होती. मात्र तेव्हा पराभव झाला. काही प्रश्न मी तुम्हाला विचारतो, जे सरकार माझ्या नेतृत्वात अडीच वर्ष होतं ते तुम्हाला आवडले नव्हते का? म्हणून आपला पराभव झाला का? माझे नेतृत्व मान्य नाहीये का? मला मोदी आणि शहा घरी नाही बसवू शकत. तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हा मी घरी बसेल. तुमच्यासाठी प्राण गेला तरी बेहत्तर लढून जिंकून दाखवेल. उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेना प्रमुखांनी मला सांगितले, जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे. माझ्या हातात काही नाही, तरी देखील तुम्ही मोठ्या संख्येने आलात हेच माझ्यासाठी खूप आहे. मला तुम्हाला काही तरी द्यायचे आहे. ती देण्याची ताकद जोपर्यंत तुम्ही माझ्या हातात देत नाहीत तोपर्यंत त्याला काही अर्थ नाही. कोणाच्या हातात मशाल आहे, कोण हात घेऊन उभा आहे तर कुठे तुतारी फुंकणारा मावळा आहे. आम्ही का लढत आहोत? महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मिता ही पायदळी तुडवली जात आहे, त्याचे रक्षण करण्यासाठी आम्ही लढत आहोत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा इथे झाली. या शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आम्ही केले, त्या मिंधेचे कौतुक केले. तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही 40 आमदार घेऊन गुवाहाटीला गेले होते, त्यावेळेला मी मंत्रालयात बसून या जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर करून दाखवले. जर ते म्हणत असतील की याचे नामकरण त्यांनी केले, तर मग त्यांनी सांगावे की संभाजीनगर कुठे आले? लोकसभा मतदारसंघ औरंगाबाद आहे. ज्या तत्परतेने तुमचा नोकर निवडणूक आयोगाने माझे पक्ष आणि चिन्ह चोरून तुम्हाला दिले, त्या तत्परतेने तुमचा नोकर निवडणूक आयोगाने या जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर का नाही केले? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. बाळासाहेबांचे स्वप्न या दाढीवाल्याने पूर्ण केले असे तुम्ही म्हणता, मग नवाज शरीफच्या वाढदिवसचा केक खाण्याचे स्वप्न तुमचे होते का? मी मुख्यमंत्री असताना आणि आपलं महाविकास आघाडी सरकार असताना याच संभाजीनगर मध्ये मेडिकल डिवाइस पार्क आणत होतो. कुठे गेला तो मेडिकल डिवाइस पार्क? गुजरात. तुम्हाला कल्पना आहे इथे जर मेडिकल डिवाइस पार्क आले असते तर किती रोजगार निर्माण झाला असता. जसं बजाज आल्यानंतर अनेकांना रोजगार मिळाले. तसेच मेडिकल डिवाइस पार्क जेव्हा मी छत्रपती संभाजीनगर मध्ये आणत होतो तो जर इथे आला असता तर माझ्या मराठवाड्यातल्या किमान एक लाख तरुणांना त्यातून रोजगार मिळाला असता.