उद्धव ठाकरेंचे मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचे संकेत:शिवसैनिकांना तयारीचे दिले आदेश, म्हणाले – यावेळी मला सूड उगवून पाहिजे
विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे सर्व राजकीय पक्षांना वेध लागले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यापूर्वीच शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली होती. आता उद्धव ठाकरे यांनी देखील महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकत एकला चलो चा नारा दिला आहे. महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांच्या इच्छेप्रमाणे निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले. तसेच शिवसैनिकांना तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. अंधेरीत केलेल्या भाषणावेळी त्यांनी स्वतंत्र निवडणुका लढण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज अंधेरी येथे शिवसेना ठाकरे गटाचा मेळाव पार पडला. तर दुसरीकडे, बीकेसीच्या मैदानावर एकनाथ शिंदे यांनीही मेळावा घेतला. उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना मागदर्शन करताना अमित शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच आगामी महापालिका निवडणुकांबाबत कार्यकर्त्यांच्या इच्छेप्रमाणे निर्णय घेणार असल्याचे सांगत स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. काय म्हणाले उद्धव ठाकरे?
सर्वांचे मत आहे. एकटे लढा. ताकद आहे? अमित शाहांना जागा दाखवणार आहात. ठीक आहे. अजून निवडणूक जाहीर झाली नाही. तुमची जिद्द आणि तयारी बघू द्या. ज्या भ्रमात राहिलो त्यातून बाहेर या. जेव्हा आपली खात्री पटेल आपली तयारी झाली. तेव्हा कार्यकर्त्यांच्या मनासारखा निर्णय घेईल. यावेळी मला सूड उगवून पाहिजे. जो मराठी मातीवर वार करतो, मराठी आईच्या कुशीवर वार करतो, तो गद्दार दिसता कामा नये. शपथ घेऊन सांगत असाल तेव्हा वेळ येईल, तेव्हा एकटा लढल्याशिवाय राहणार नाही. अमित शाहांना सांगतो जास्त नादी लागू नका. जेवढे अंगावर याल तेवढे वळ घेऊन दिल्लीला जाल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. कपटाने वागाल तर उचलून आपटू आमचे हिंदुत्व राष्ट्रवादी आहे. आमचे हिंदुत्व राष्ट्रीयत्व आहे. आमचे हिंदुत्व गोमूत्रधारी नाही. अमित शाह यांनी त्यांच्या हिंदुत्वाची व्याख्या सांगावी. आमच्याशी युती तोडली तेव्हा आम्ही हिंदूत्व नव्हतो. प्रबोधनकाराचा नातू आणि बाळासाहेबांचा मुलगा हिंदूत्ववादी नसेल. हिंदुत्व सोडू शकेल. मी हिंदू अभिमानी आहे. तसाच मराठीचा कडवट अभिमानी आहे. प्रेमाने वागाल तर उचलून देऊ. कपटाने वागाल तर उचलून आपटू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना दिला. गद्दाराच्या वाराने उद्धव ठाकरे संपणार नाही शिवसेनाप्रमुख म्हणायचे, जोपर्यंत शिवसैनिक आहेत, तोपर्यंत मी शिवसेना प्रमुख आहे. तेच मी आता सांगतोय, जोपर्यंत तुम्ही शिवसैनिक आहात, तोपर्यंत मी तुमचा पक्षप्रमुख आहे. गद्दाराने वार केले तर उद्धव ठाकरे संपणार नाही, त्यांना गाडूनच मी संपेन, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला.