उद्धव ठाकरेंनी संबंध ठेवले नाहीत:देवेंद्र फडणवीस यांची सडेतोड उत्तरे; शिंदे-पवार, मुंडे-सालियन सर्वच प्रश्नांवर मांडली बेबाक भूमिका

उद्धव ठाकरे यांच्याशी आता पुन्हा युती होऊ शकत नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर उद्धव ठाकरे यांनी काहीही संबंध ठेवले नाही, त्यांनी संबंध तोडून टाकले आहेत. म्हणजे आमच्यात मारामारी झाली नाही, समोर आलो तर आम्ही चांगले बोलतो, नमस्कार करतो. पण आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत संबंध नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात आयोजित करण्यात आलेल्या विशेष मुलाखती दरम्यान त्यांनी अनेक प्रश्नांची सडेतोड उत्तर दिली. लाडके ठाकरे कोण? उद्धव ठाकरे की राज ठाकरे? लाडके ठाकरे कोण? उद्धव ठाकरे की राज ठाकरे? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उत्तर देणे टाळले आहे. ठाकरे असे आहेत की, त्यांना आपण लाडके म्हणायचे आणि त्यांनी आपल्याला दोडके म्हणायचे. त्यामुळे यामध्ये आपण कशासाठी पडायचे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गेल्या पाच वर्षांमध्ये माझा उद्धव ठाकरेंसोबत काही संबंध राहिलेला नाही. राज ठाकरेंसोबत मात्र संबंध राहिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी संबंध तोडून टाकले. म्हणजे मारामारी नाही, मात्र समोर आलो तर आम्ही चांगले बोलतो, नमस्कार करतो. पण उद्धव ठाकरे सोबत कोणताही संबंध नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. शिंदे भावनिक तर अजित पवार प्रॅक्टिकल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांच्या संबंधांबद्दल देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात उत्तरे दिली. यापैकी नाराजी नाट्य कोण जास्त करते? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर नाराजी नाट्य कोणीही करत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. अजित दादा असो किंवा एकनाथ शिंदे दोघांचेही नाराजी नाट्य नाहीत. आमच्या मध्ये काही प्रश्न असतात, मात्र ते आम्ही एकत्र येऊन सोडवतो. एकनाथ शिंदे हे शिवसैनिक असल्यामुळे थोडे भावनिक आहेत. त्यात अजित पवार हे प्रॅक्टिकल असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पुरावे दिले तर मुंडेंची चौकशी आणि कारवाई करण्याची देखील तयारी संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड याला अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना देखील राजीनामा द्यावा लागला होता. या राजीनाम्यावर देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा राईट हँड होता. गेली अनेक वर्षे तो धनंजय मुंडे यांचे राजकारण सांभाळत होता. त्यामुळे सहाजिकच राज्यातील जनतेची तशी भावना होती. त्या भावनेचा विचार करूनच आम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. आम्ही नैतिकतेच्या आधारावर अशा प्रकारचा निर्णय घेतला. वास्तविक धनंजय मुंडे यांचे या प्रकरणात कुठेही नाव नाही. धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोणी आजही पुरावा आणून दिलेला नाही. जर कोणी तसा पुरावा आणून दिला तर आमची चौकशी आणि कारवाई करण्याची देखील तयारी आहे. मात्र उगीचच हवेत तीर मारण्यात काहीही अर्थ नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.