वडिलांना औरंगजेबाची उपमा दिल्याने लेक संतापला:अनिकेत तटकरेंनी महेंद्र थोरवेंना दिले प्रत्युत्तर, व्हिडिओ दाखवत गद्दारीचा आरोपही केला

शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांना औरंगजेबाशी तुलना केली होती. यावर आता सुनील तटकरे यांचा मुलगा आक्रमक झाला असल्याचे समोर आले आहे. आमदार महेंद्र थोरवे यांनी गद्दारी केली म्हणत थेट व्हिडिओच दाखवले आहेत. खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव येथील क्रिकेटच्या एका सामन्यात पालकमंत्री पदाला घेऊन पंचाचा निर्णय अंतिम असतो, अशी कोपरखळी मंत्री भरत गोगावले यांना लगावली होती. त्यानंतर, तटकरे यांच्या याच टीकेचा धागा पकडत आमदार महेंद्र थोरवे यांनी क्रिकेटच्या मैदानातूनच खासदार सुनील तटकरे यांच्यावर पलटवार केला होता. ‘छावा’ चित्रपटातील औरंगजेबाचा दाखल देत सुनील तटकरे यांना थोरवे यांनी औरंगजेबाची उपमा दिली, आमचा औरंगजेब हा सुतारवाडीत बसलाय, असे म्हणत तटकरेंवर निशाणा साधला होता. आता तटकरेंचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे टीका करताना म्हणाले, महेंद्र थोरवे ही कालची पिलावळ असून हेच गद्दारीचे पिलावळ आहेत, याशिवाय सुनील तटकरे हे राजकारणात 40 वर्ष कार्यरत असून ते जनतेसाठी अहोरात्र काम करत आहेत. त्यामुळे महेंद्र थोरवे जर का वल्गना करत असतील तर त्यांना आम्ही जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा अनिकेत तटकरे यांनी दिला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या काळात महेंद्र थोरवे यांनी आमच्यासोबत गद्दारी केली असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीमधील नेत्यांसोबतचे महेंद्र थोरवे यांचे व्हिडिओ दाखवले. अनिकेत तटकरे यांनी विधानसभा निवडणुकीत महेंद्र थोरवे यांनी अदिती तटकरे यांच्या विरोधात काम केल्याचे म्हटले आहे. यावेळी अनिकेत तटकरे यांनी त्यांच्या मोबाईलमधून महेंद्र थोरवे यांचे फोटो, व्हिडिओ दाखवत गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आधीच रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये पेटलेल्या वादात आणखी वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.