वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण:सासरा राजेंद्र हगवणेसह दीर सुशील हगवणेला अटक; पोलिसांनी फक्त 2 मिनिटांत गुंडाळली PC

राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे व त्याच्या कुटुंबीयांनी धाकटी सून वैष्णवीचा हुंड्यासाठी खून केला असा आरोप होत आहे. हगवणे कुटुंबावर गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता. त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्या सोबतच त्याचा मुलगा सुशील हगवणेला देखील स्वारगेट येथून अटक करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड बावधन पोलिसांनी ही कामगिरी केली. ही बातमी देखील वाचा… : हगवणे बाप-लेकाचा जेवणावर ताव आणि पोलिसांची धडक:7 दिवस तळेगाव परिसरातच मुक्काम; सीसीटीव्ही फुटेज आले समोर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे (23) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वैष्णवीच्या हत्येनंतर सासरे राजेंद्र हगवणे फरार झाला होता. त्याच्या विरोधात हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून क्रूर वागणूक दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सुनेच्या संशयास्पद मृत्यूनंतर तिचा सासरा राजेंद्र हगवणे याने मुलाला घेऊन पलायन केले होते. दरम्यान, पोलिसांनी पती, सासू आणि नणंद यांना अटक करून न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्यांना 21 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आता सासरा आणि दीर देखील पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांनी 2 मिनिटांत गुंडाळली PC बावधन पोलिसांनी आज सकाळी यासंबंधी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत या प्रकरणी पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता होती. पण पोलिसांनी 2 मिनिटांतच आपली पीसी गुंडाळल्याने अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले. बावधन पोलिस म्हणाले, बावधन पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी वैष्णवी हगवणे यांच्या कुटुंबातील 3 जण अटकेत होते. उर्वरित 2 आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गादर्शनाखाली 6 पथके तैनात करण्यात आली होती. या पथकाने राजेंद्र हगवणे (वैष्णवीचे सासरे) व सुशील हगवणे (वैष्णवीचा दीर) यांना आज पहाटे पुणे स्वारगेट येथून अटक केली. त्यांना न्यायालयासमोर पीसीआरसाठी हजर केले जाणार आहे. या प्रकरणी सर्व पुरावे संकलित केले जात आहेत. हे पुरावे घेऊन योग्य कलमांखाली दोषारोपपत्र तयार केले जाईल. या संपूर्ण गुन्ह्याला लॉजिकल एन्डला नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तशा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूचना आलेल्या आहेत, एवढे बोलून पोलिस अधिकारी जागेवरून उठून निघून गेले. हुंड्यात घेतले 51 तोळे सोनं अन् फॉर्च्युनर मिळालेल्या माहितीनुसार शशांक आणि वैष्णवीच्या लग्नाच्या वेळी तिच्या माहेरच्यांनी 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर कार आणि चांदीची भांडी दिली होती. मात्र जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपये घेऊन ये या मागणीसाठी सासरचे लोकं तिचा छळ करत होते. तर शशांक तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता, या सर्व गोष्टीला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे समजते. याप्रकरणी वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे, सासू, पती, दिर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीने घेतला होता चारित्र्यावर संशय वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) मुळशी तालुक्यातील भुकूमची होती. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, वैष्णवीचा सासरच्या कुटुंबाने अमानुष छळ केला. तिच्यावर मानसिक अत्याचार करण्यात आला. ऑगस्ट 2023 मध्ये गरोदर असलेल्या वैष्णवीने पती शशांकला या बाबत माहिती दिली असता, त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन ‘हे बाळ माझे नाही, दुसऱ्या कोणाचे असावे’ असे म्हटले. यावरून पती शशांक आणि सासरचे लोकांनी वैष्णवीला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला, शशांकने तिला मारहाण केली. शिवीगाळ करत घरातून हाकलून देईन असे धमकावत तिला घरातून बाहेर काढले. सर्वांचा काटा काढतो वैष्णवी आपल्या आई-वडिलांकडे माहेरी गेली आणि तिच्या सासरच्या कुटुंबीयांकडून होत असलेल्या छळवणुकीची आणि हुंड्यासाठी पैशाची मागणी याबाबत माहिती दिली. त्यानंतर, 27 नोव्हेंबर 2023 रोजी वैष्णवीने मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून विषारी औषध खाल्ले. त्यानंतरही पुन्हा शशांकने वैष्णवीला शिवीगाळ करत तुझ्या बापाने पैसे दिले नाही, तर त्यांचा सर्वांचा काटा काढतो अशी धमकी दिल्याचे एफआयआरमध्ये म्हटले आहे. राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून, पोलिसांना निष्पक्ष आणि तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलिस महासंचालकांना तीन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.