वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट:आरोपी पिता-पुत्रांना आसरा देणाऱ्या पाच जणांना अटक; माजी मंत्र्यांच्या मुलाचाही समावेश

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत आणखी पाच जणांना अटक केली आहे. या पाच जणांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी राजेंद्र हगवणे व त्याचा मुलगा सुशील हगवणे यांना फरार राहण्यासाठी मदत केली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कर्नाटकातील माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रितम पाटील याचाही समावेश आहे. अटक केलेल्या पाचही आरोपींना उद्या (27 मे) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. वैष्णवी हगवणे हिने हुंड्यासाठी सासरच्यांकडून होणाऱ्या अत्याचार व मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केली होती. या प्रकरणी तिचा पती, सासू आणि नणंद यांना पोलिसांनी सुरुवातीलाच अटक केली होती. तर सासरा राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे हे दोघेही 17 मेपासून फरार होते. 22 मे रोजी पहाटे पोलिसांनी त्यांना अटक केली. सर्व आरोपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. आरोपींना मदत करणाऱ्या पाच जणांना अटक आरोपी राजेंद्र आणि सुशील हगवणे हे अटक टाळण्यासाठी 17 मे ते 22 मे या पाच दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी लपून राहत होते. या काळात त्यांना आश्रय व मदत करणाऱ्या पाच जणांविरोधात पोलिसांनी कारवाई करत त्यांना अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पुण्यातून पलायन केलेल्या या दोघांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास या आरोपींनी मदत केली होती. आरोपींमध्ये माजी मंत्र्याच्या मुलाचाही समावेश मोहन उर्फ बंदू उत्तम भेगडे (वय 60, रा. वडगाव मावळ), बंदू लक्ष्मण फाटक (वय 55, रा. लोणावळा), अमोल विजय जाधव (वय 35, रा. पुसगाव, ता. खटाव, जि. सातारा), राहुल दशरथ जाधव (वय 45, रा. पुसगाव, ता. खटाव, जि. सातारा), प्रितम वीरकुमार पाटील (वय 47, रा. कोगनोळी, ता. चिकोडी, जि. बेळगाव, कर्नाटक) अशी आरोपींची नावे आहेत. प्रितम पाटील हे कर्नाटकातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचे सुपुत्र आहेत. वीरकुमार पाटील यांनी सलग 28 वर्षे आमदार राहिले असून, आपल्या कार्यकाळात ते ऊर्जा मंत्री देखील होते. मोहन भेगडे हा हगवणेंचा मित्र आहे. मोहन बंडू फाटक हा पवना डॅम जवळील फार्म हाऊसचा मालक आहे. अमोल जाधव आणि राहुल जाधव यांनी सातारा जिल्ह्यातील पुसेगावमध्ये हगवणे पिता पुत्रांना फार्म हाऊसवर आसरा दिला होता. तर प्रितम वीरकुमार पाटील याने कर्नाटकातील कोगनोळी या ठिकाणी हगवणे पिता पुत्रांना आसरा दिला होता. हे ही वाचा… वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात नवा खुलासा:मृत्यूपूर्वी अंगावर 29 जखमा; पती-सासू-नणंदेची पोलीस कोठडी 28 मेपर्यंत वाढवली वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात एक नवीन माहिती सोमवारी समोर आली आहे. वैष्णवी हगवणे हिला आत्महत्या करण्याचे दिवसापर्यंत सासरच्या व्यक्तींनी बेदम मारहाण करत छळ केल्याचे स्पष्ट झाले आहे. वैष्णवी हिच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या अंगावर एकूण २९ मारहाणीचे व्रण मिळाले असून त्यातील पाच ते सहा व्रण ताजे असल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे. तसेच आत्महत्येच्या दिवसापर्यंत वैष्णवी हगवणेचा कुटुंबीयांकडून छळ होत असल्याची माहिती देखील बावधन पोलिसांनी न्यायालयात दिली आहे. पूर्ण बातमी वाचा…