वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण:मुलासोबत चॅटींग, त्याचा 18 तारखेला साखरपुडा; त्यामुळेच आत्महत्या केल्याचा वकिलांचा दावा

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण:मुलासोबत चॅटींग, त्याचा 18 तारखेला साखरपुडा; त्यामुळेच आत्महत्या केल्याचा वकिलांचा दावा

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणांमध्ये बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या दाव्यामुळे आता या प्रकरणाला नवे वळण देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. हगवणे कुटुंबांच्या वतीने न्यायालयात वैष्णवी हगवणे यांच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला गेला आहे. इतकेच नव्हे तर वैष्णवीचे ज्या मुलासोबत नाव जोडले जात आहे, त्या मुलाचा 18 तारखेला साखरपुडा होता. त्यामुळेच वैष्णवीने आत्महत्या केली असल्याचा दावा देखील वकिलांनी केला आहे. वैष्णवी हगवणे कुटुंबीयांचा बचाव करणाऱ्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद केला आहे. यामध्ये त्यांनी वैष्णवी नको त्या व्यक्तीसोबत चॅट करत होती. हे चॅट हगवणे यांनी पकडले होते, असा दावा देखील केला आहे. त्या व्यक्तीने नकार दिल्यानेच वैष्णवीने आत्महत्या केली असल्याचा दावा देखील वकिलांच्या वतीने करण्यात आला आहे. त्या मुलाचा 18 तारखेला साखरपुडा होता. त्यामुळे ती त्याला कॉल करत होती. तपास अधिकाऱ्यांना त्या व्यक्तीचे नाव देखील दिले असल्याचा दावा वकिलांनी न्यायालयात केला आहे. व्यवसायासाठी पैशांची आवश्यकता असल्याने हगवणे कुटुंबातील सर्वांचे सोने गहाण ठेवण्यात आले होते. हे सोने गहाण ठेवण्यास वैष्णवी यांनी विरोध केला नव्हता. त्याबाबतचा काहीच उल्लेख देखील या प्रकरणात दाखल असलेल्या फिर्यादीत करण्यात आलेला नसल्याचे वकिलांनी निदर्शनास आणून दिले. इतकच नाहीतर वैष्णवी यांनी एका तरुणाशी केलेले चॅटिंग पती शशांक यांना मिळाले होते. त्यावरूनच दोघांमध्ये वाद झाला होता. ही बाब हगवणे यांनी वैष्णवी यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आणून दिली होती. त्यानंतर कस्पटे कुटुंबीयांनी वैष्णवीचा मोबाईल काढून घेतला होता. असा युक्तिवाद देखील ॲड. दुशिंग यांनी न्यायालयात केला आहे. पाेलिस काेठडीत 3 दिवसांची वाढ वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात तिचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, सासरे राजेंद्र हगवणे, दीर सुशील हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना काल न्यायालयात हजर करण्यात आले होते. या वेळी हगवणे यांचे वकील विपुल दुशिंग यांनी युक्तिवादादरम्यान वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंताेडे उडवण्याचा प्रयत्न करत, आत्महत्यापूर्वी तिने कुठल्या तरुणासोबत चॅटिंग केले हाेते याबाबत तपास अधिकाऱ्यांनी चाैकशी करणे गरजेचे असल्याचे सांगितले. दरम्यान, न्यायालयाने वैष्णवीचा पती, सासू व नणंदेच्या पाेलिस काेठडीत 1 दिवसाची तर सासरे व दिराच्या पाेलिस काेठडीत 3 दिवसांची वाढ केली आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment