पोलिस काॅलनीतील इमारतीवरून उडी मारणाऱ्या मनोरुग्णाला वाचवले:उपचारासाठी आला होता घाटी रुग्णालयात, तेथून आला पोलिसांच्या वसाहतीत
पोलिस आयुक्त कार्यालय परिसरातील कर्मचारी निवासस्थानाच्या इमारतीवरून एका तरुणाने उडी मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार शुक्रवारी (8 नोव्हेंबर) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला. रहिवासी पोलिसांनी त्या तरुणाला सुखरूप वर काढले. हा तरुण मनोरुग्ण असल्याची माहिती बेगमपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक मंगेश जगताप यांनी दिली. भरत बाबूराव वनारसी (32, रा. स्वराजनगर, मुकुंदवाडी) असे तरुणाचे नाव आहे. भरत हा मजुरी करतो. मागील काही दिवसांपासून त्याला फिट्स येतात. तो घाटी रुग्णालयात उपचारासाठी एकटा आला. सकाळी तो पोलिस आयुक्तालयातील कर्मचारी निवासस्थान परिसरातील ‘डी ब्लॉक’मधील एका इमारतीच्या गच्चीवर गेला. तेथून सातव्या मजल्यावरील तो खिडकीच्या कॅनाॅपीवर बसला होता. हा प्रकार परिसराची सफाई करणाऱ्या व्यक्तीच्या निदर्शनास आला. त्याने आरडाओरड करून रहिवासी कर्मचाऱ्यांना जमवले. रेहान बेग याने त्याला बोलण्यात गुंतवून ठेवले. कर्मचाऱ्यांनी गच्चीवर जाऊन भरतला आवाज दिले व त्याचा हात पकडून त्याला वर ओढून घेतले. त्याला बेगमपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांत या घटनेची नोंद करून त्याला नातेवाइकांच्या स्वाधीन केले. पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची सुरक्षा वाऱ्यावर 2017-18 मध्ये पोलिस आयुक्तालय परिसरात एक एकर जागेवर कर्मचाऱ्यांसाठी इमारत बांधली. या वसाहतीत फ्लॅट्स आणि रो हाऊस, बंगले आहेत. तेथे 7 मजली 11 इमारती आहेत. वरिष्ठ अधिकारी आणि पोलिस आयुक्तांसाठी बंगलेही याच परिसरात आहेत. वसाहतीत पोलिस कर्मचाऱ्यांसाठी 504 व पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षकांसाठी 28 फ्लॅट्स आहेत. प्रत्येक इमारतीला पॉवर बॅकअप लिफ्ट आहेत. तेथे सुरक्षा रक्षकाची नेमणूक केलेली नाही. त्यामुळे वसाहतींमधील इमारतीत कोणीही सहज प्रवेश करू शकतो. खिडकीच्या कॅनॉपीवरून तरुणाला पोलिसांनी वर ओढले पोलिस आयुक्त कार्यालय परिसरातील वसाहतीत इमारतीवर शुक्रवारी सकाळी मनोरुग्ण तरुण चढला होता. इमारतीतील रहिवासी पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याचे प्राण वाचवले.