वाल्मीक कराडने राखेचा पैसा बॉलीवूड इंडस्ट्रीत गुंतवला?:प्रोड्यूसर असोसिएशनचे आयडी कार्डही सापडले, तपासाला वेगळे वळण

बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्हा चर्चेचा केंद्रबिंदु ठरला आहे. या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेला आरोपी वाल्मीक कराडला अटक करण्यात आली आहे. आता वाल्मीक कराड हा फिल्म प्रोड्यूसर असल्याचा दावा देखील केला जात आहे. त्याचे आयडी कार्डही समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. यामुळे वाल्मीक कराड राखेच्या अवैध धंद्यातून व खंडणीतून आलेला सगळा पैसा बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये गुंतवला आहे का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. यामुळे पोलिस तपासाला वेगळे वळण मिळाले आहे. वाल्मीक कराड फिल्म प्रॉडक्शनचा आजीवन सभासद आरोपी वाल्मीक कराड हा फिल्म प्रोड्यूसर असल्याचे समोर येत आहे. इंडियन मोशन पिक्चर प्रोड्यूसर असोसिएशनचा वाल्मीक कराड सभासद असल्याचे समजते. या संदर्भातील एक आयडी कार्डही व्हायरल झाले आहे. या कार्डवर वाल्मीक बी आर जे फिल्म प्रॉडक्शनचा आजीवन सभासद असल्याची नोंद असून त्याचा मेंबर नंबर 23480 असा आहे. वाल्मीक कराड राजकीय सभांमधील इव्हेंट मॅनेजमेंट करायचा तसेच बीड जिल्ह्यात त्याची दहशत असल्याचे समोर आलेच आहे. आता वाल्मीक कराड हा चित्रपट निर्माता असल्याचे देखील समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. वाल्मीक कराड त्याच्या अवैध धंद्यातील काळा पैसा तसेच राखेतून आलेला काळा पैसा हा बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये गुंतवत असल्याची शंका उपस्थित झाली आहे. दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येला आता 100 दिवस उलटून गेले आहेत. मात्र, हत्या प्रकरणातील आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे. या प्रकरणात पोलिस तपास करत असून रोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेने खंडणीसाठी 29 नोव्हेंबर 2024 रोजी साडे अकरा ते साडेबाराच्या दरम्यान दोनवेळा फोन केल्याचंही समोर आलं होते. नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगा येथे विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांची एक भेट झाली होती. या भेटीत विष्णू चाटे याने घुले यास वाल्मिक कराडचा निरोप दिला होता. संतोष देशमुख हा आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असा हा संदेश होता, असे सीआयडीने दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रात नमूद आहे.