वाल्मिक कराडचा मुलगा गोत्यात येणार?:आरोपींना 100 टक्के अटक करू, पोलिस उपअधीक्षकांचे महादेव मुंडेंच्या पत्नीला आश्वासन

महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास परळी पोलिसांकडून अंबाजोगाईचे पोलिस उपअधीक्षकांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यानंतर आज महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांनी अंबाजोगाईचे पोलिस उपअधीक्षक अनिल चोरमले यांची भेटली आहे. या भेटीनंतर महादेव मुंडे यांच्या आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल, असे आश्वासन अनिल चोरमले यांनी कुटुंबीयांना दिले आहे. यामुळे वाल्मीक कराडचा मुलगा गोत्यात येण्याची शक्यता आहे. महादेव मुंडे यांची ऑक्टोबर 2023 मध्ये हत्या झाली होती. मात्र, या प्रकरणातील आरोपींना अद्यापही अटक झालेली नाही. भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणाला वाचा फोडली होती. वाल्मीक कराडचा मुलाचा महादेव मुंडेंच्या हत्येशी संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास परळी पोलिसांकडून काढून गुन्हे अन्वेषण विभागाने करावा, अशी मागणी सुरेश धस यांनी केली होती. मात्र, बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी हा तपास अंबाजोगाईच्या पोलिस उपअधीक्षकांकडे वर्ग करण्याचे आदेश दिले. अंबाजोगाईचे पोलिस अधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे तपास वर्ग झाल्यानंतर महादेव मुंडेंच्या कुटुंबीयांनी आज त्यांची भेट घेतली. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलिस अधिकाऱ्यांशी त्यांच्या पतीच्या हत्याप्रकरणाच्या तपासाबाबत चर्चा केली. या चर्चेनंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. डीवायएसपींनी काय दिले आश्वासन?
महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणात आम्ही 100 टक्के रिझल्ट काढू. अजून परळीच्या पीआयने ती फाईल आमच्यापर्यंत पाठवली नाही, अजून त्यांच्या केसची कागदपत्रे इथपर्यंत पोहोचलेली नाहीत. ही फाईल आज आम्हाला मिळेल. त्यानंतर चार पाच दिवसांमध्ये ही फाईल वाचून मी तुम्हाला पुढील माहिती देतो. मला चार दिवस द्या, मी याप्रकरणाचा फॉलोअप घेतो. आपण आरोपीला 100 टक्के पकडू, असे बीडचे पोलिस डीवायएसपी अनिल चोरमले यांनी आश्वासन दिल्याचे मयत महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले. वाल्मीक कराडचा मुलगा अडचणीत येणार?
दरम्यान, महादेव मुंडे यांच्या हत्याप्रकरणात वाल्मीक कराडचा मुलगा सुशील कराड गोत्यात येण्याची शक्यता आहे. महादेव मुंडे हे परळीतील व्यवसायिक होते. त्यांचा 21 ऑक्टोबर 2023 च्या रात्री वन विभागाच्या समोरील मोकळ्या जागेत खून करण्यात आला होता. त्याच घटनास्थळावरून कराडचा मुलगा सुशील कराडने मोबाईलवर फोन केल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता.

  

Share