वाल्मीक कराडचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर:बीड वरून पुण्याला कसे गेले? या प्रश्नाचे उत्तर मिळणार? मांजरसुंब्यातील हॉटेलवर आरोपींचे जेवण?

वाल्मीक कराडचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर:बीड वरून पुण्याला कसे गेले? या प्रश्नाचे उत्तर मिळणार? मांजरसुंब्यातील हॉटेलवर आरोपींचे जेवण?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात प्रमुख आरोप असलेला वाल्मीक कराड आणि त्याचे साथीदार हे बीड वरून पुण्याला कसे गेले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र याबाबत पुष्ठी देणाऱ्या तीन आलिशान गाड्यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या सीसीटीव्ही फुटेज मध्ये बसूनच सर्व आरोपींनी पुण्यात पळ काढला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे पुण्यात सीआयडीला शरण येण्यापूर्वी वाल्मिक कराड ज्या गाडीतून कार्यालयात दाखल झाला होता, तशीच गाडी या ताफ्यात देखील दिसून येत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप करण्यात येत असलेला वाल्मीक कराड याने 31 डिसेंबर रोजी सीआयडी च्या पुण्यातील कार्यालयात आत्मसमर्पण केले होते. त्यावेळी तो पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओ गाडी मधून सीआयडी कार्यालयात दाखल झाला होता. त्यानंतर ही गाडी नेमकी कोणाची? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. याच गाडी संदर्भात आता मोठी बातमी समोर आली असून शरणागती पत्करण्यापूर्वी 30 डिसेंबर रोजी रात्री सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्गावर तीन आलिशान गाड्यांमधून आरोपी पुण्याला पोहोचले असल्याची माहिती मिळत आहे. या माहितीला पुष्टी देणारे सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आले आहे.
मांजरसुंबा येथे हॉटेलवर आरोपींनी जेवण देखील केले खंडणी आणि हत्या प्रकरणात आरोपी असलेले वाल्मीक कराड आणि इतर सर्व आरोपी सीआयडीला शरण येण्यापूर्वी बीड वरून पुण्याला गेले होते का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यालाच पुष्टी देणारे एक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. यात 30 डिसेंबर रोजी रात्री सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्गावर तीन आलिशान गाड्यांमधून हे आरोपी पुण्यात पोहोचले असल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान बीडच्या मांजरसुंबा येथे एका हॉटेलवर या आरोपींनी जेवण देखील केले. तसेच पेट्रोल पंपावर गाडीत डिझेल भरले. त्यानंतर या गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोल नाका येथे रात्री दीड वाजेच्या सुमारास पास झाल्या आहेत. याच गाड्यांमधून हे सर्व आरोपी पुण्याला गेले असल्याची चर्चा आहे. या आरोपींना कोणी मदत केली? याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वाल्मीक कराड याने मोराळे यांची गाडी वापरली का?

या प्रकरणात आरोप होत असलेली पांढऱ्या रंगाची स्कार्पिओ एमएच 23 बीजी 2231 ही गाडी शिवलिंग मोराळे यांच्या मालकीची आहे. मात्र, आपली गाडी वाल्मीक कराड याच्या जवळ नव्हती, असा दावा मोराळे यांनी या आधी माध्यमांशी बोलताना केला होता. मोराळे यांच्याच गाडीने वाल्मीक कराड हा पुण्यातील सीआयडी कार्यालयात दाखल झाला होता. मात्र, कार्यालयात जाण्याच्या रस्त्यावर आपल्याला वाल्मीक कराड भेटला होता आणि त्यानंतर आपण त्याला सीआयडी कार्यालयात सोडले, असा दावा मोराळे यांनी केला होता. त्यामुळे आता बीडवरुन पुण्याला जाताना देखील वाल्मीक कराड याने मोराळे यांची गाडी वापरली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत आता पोलिस तपासाताच अधिकची माहिती समोर येईल.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment