वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली:छातीचा सिटीस्कॅन करण्याचा दिला डॉक्टरांनी सल्ला, जिल्हा रुग्णालयात दाखल
बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या तब्येतीबद्दल तक्रारी सुरू झाल्या आहेत. आता कराडच्या छातीचा सिटीस्कॅन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तसेच पोट दुखीच्या कारणामुळे बुधवारी रात्री वाल्मीक कराडला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी रात्री वाल्मीक कराडला पोट दुखीचा त्रास सुरू झाला होता. याबद्दलची माहिती जिल्हा कारागृहाकडून कळवण्यात आली होती. त्यानुसार डॉक्टरांनी कारागृहात जाऊन वाल्मीकची तपासणी केली. त्यानंतर पुढच्या तपासण्या करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करणे गरजेचे असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानुसार कराडला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वाल्मीक कराड आता सध्या जिल्हा रुग्णालयात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. काही तपासणी करणे गेजेचे असून सोनोग्राफी, ब्लड टेस्ट, युरीन टेस्ट देखील केली जाणार आहे. या सर्व टेस्टचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच वाल्मीक कराडवर सिटीस्कॅन देखील करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि मकोका प्रकरणात अटकेतील वाल्मीक कराडची रात्री त्याची तब्येत बिघडल्याने सरकारी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये हलविण्यात आले आहे. केज न्यायालयात त्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार होती, पण कराडच्या वकीलाने ऐनवेळी हा अर्ज मागे घेतल्याने ही सुनावणी टळली. दरम्यान, वाल्मीक कराडने कोणत्या कारणामुळे जामीन अर्ज मागे घेतला? याचे कारण समोर आले नाही. वाल्मीक कराड याचा खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज मागे घेण्यात आला आहे. वाल्मीकच्या वकिलांनी हा अर्ज मागे घेतला आहे. जामीन अर्जाच्या सुनावणीसाठी दोन तारखा झाल्यानंतर आज सुनावणी होणार होती. त्यामुळे कराडला जामीन की एमसीआर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. मात्र वाल्मीकचे वकील अशोक कवडे यांनी जामीन अर्ज मागे घेतला आहे.