वसमत तालुकावासीयांना आला प्रशासनाच्या संवेदशिलतेचा प्रत्यय:पोलिस, महसूल अन पंचायतचे अधिकारी आलेगाव शिवारात मदतीसाठी दाखल

वसमत तालुकावासीयांना आला प्रशासनाच्या संवेदशिलतेचा प्रत्यय:पोलिस, महसूल अन पंचायतचे अधिकारी आलेगाव शिवारात मदतीसाठी दाखल

वसमत तालुक्यातील गुंज येथील महिला मजूरांची घटना नांदेड जिल्ह्याच्या हद्दीत असली तरी हिंगोली जिल्हा प्रशासनाच्या महसूल, पोलिस अन् पंचायत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने स्थानिक अधिकाऱ्यांना घटनास्थळी मदतीसाठी रवाना केली. त्यातून प्रशासनाच्या संदेनशिलतेचा प्रत्यय वसमत तालुकावासीयांना आला. वसमत तालुक्यातील गुंज येथील महिला हळद काढणीच्या कामासाठी आलेगाव (जि. नांदेड) शिवारात जात असतांना ट्रॅक्टर विहीरीत कोसळले. या अपघातात आठ महिला विहिरीच्या पाण्यात ट्रॅक्टरखाली दबून गेल्या. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गुंजच्या गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर घटनास्थळ नांदेड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये येते. दरम्यान, घटनास्थळ नांदेड जिल्ह्यात येत असले तरी मजूरवर्ग हिंगोली जिल्ह्यातील असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. या घटनेची माहिती मिळताच पुणे येथे बैठकीला गेलेल्या जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी भ्रमणध्वनीवरून जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. तसेच उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी, मंडळ अधिकारी प्रियंका खडसे यांना घटनास्थळी पाठविले. या सोबतच गावातील परिस्थिती व आवश्‍यक माहिती घेऊन मजूरांच्या कुटुंबियांना लागणाऱ्या मदतीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी तातडीने गटविकास अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी रवाना केले तर ग्रामसेवकास गावात थांबून मदत करण्याच्या सूचना दिल्या. त्यावरून हे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, घटना वसमत ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीपासून काही अंतरावरच असल्याने पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी उपाधिक्षक राजकुमार केंद्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार मधुकर आडे, विजय उपरे यांना घटनास्थळी मदतीसाठी रवाना केले. तर विहीरीतून बाहेर काढलेले मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वसमत उपजिल्हा रुग्णालयात आणले जाणार असल्याने वसमत ग्रामीण सह शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी रुग्णालयात पंचनामा करण्यसाठी सज्ज ठेवले आहेत. दरम्यान, घटना बाहेर जिल्ह्यात असली तरी हिंगोली जिल्हा प्रशासनाची धडपड व संवेदनशिलतेचा प्रत्यय वसमत तालुकावासीयांना आला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment