विदर्भ-मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळीची शक्यता:हवामान विभागाचा इशारा, आज सर्वाधिक तापमान कुठे? वाचा

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या हवामानात तीव्र बदल होताना दिसत आहेत. एका बाजूला तापमान सतत वाढत आहे, तर दुसऱ्या बाजूला अचानक पावसाच्या शक्यतेने नागरिकांची चिंता वाढली आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागांत उष्णतेच्या लाटेसोबत अवकाळी पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासह इतर जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट 27 एप्रिल रोजी अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याचा इशारा देत हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. दुसरीकडे वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांमध्ये जरी अलर्ट नसेल, तरीही पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे येथील हवामान विभागाचे तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विटद्वारे सांगितले की, पुढील चार ते पाच दिवसांमध्ये राज्यातील कमाल तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. विदर्भ-मराठवाडा प्रदेशातील बहुतेक भागात मेघगर्जनेसह वादळ येण्याची शक्यता, तर आज विदर्भातील काही भागात गारपीट होण्याची शक्यता.तसेच राज्यात उष्ण-दमट परिस्थितीचे अलर्ट देखील आहेत. येत्या चार दिवसात हवामान कसे? राज्यात कमाल तापमान दोन ते तीन अंशांनी वाढणार आहे. किमान तापमान येत्या चार ते पाच दिवसात फारसे बदलणार नाही. विदर्भात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हिंगोली, परभणी, नांदेड, बीड ,जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना दमट आणि उष्ण हवामानाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज कोणत्या जिल्ह्यात किती तापमान? आज रविवार (27 एप्रिल) रोजी नोंदवलेल्या तापमानानुसार
मुंबई शहर – 33.8°
मुंबई उपनगर – 34.2°
पालघर – 35.6°
ठाणे – 34.0°
रायगड – 34.2°
रत्नागिरी – 32.0°
सिंधुदुर्ग – 32.0°
नाशिक – 38.1°
जळगाव – 43.3°
अहिल्यानगर – 38.2°
पुणे – 39.4°
सातारा – 40.3°
सांगली – 37.7°
कोल्हापूर – 36.8°
सोलापूर – 41.0°
छत्रपती संभाजीनगर – 44.4°
लातूर – 40.0°
धाराशीव – 41.4°
नांदेड – 41.2°
परभणी – 44.2°
हिंगोली – 44.4°
बुलढाणा – 37.6°
वाशीम – 41.4°
अकोला – 43.9°
अमरावती – 42.8°
यवतमाळ – 42.4°
वर्धा – 42.6°
नागपूर – 42.6°
चंद्रपूर – 42.0°
गडचिरोली – 42.2°
गोंदिया – 40.9°