मतदानाचा व्हिडीओ व्हायरल करणे पडले महागात:आखाडा बाळापुरात तरुणावर अचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल
आखाडा बाळापूर ये्थील मतदान केंद्रावर मतदान केल्याचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या एका तरुणावर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात बुधवारी आदर्श अचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघात १०१५ मतदान केंद्रावर मतदान केले जात आहे. मतदान प्रक्रियेच्या वेळी कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आदेश पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी ठाणेदारांना दिले आहेत. या शिवाय पोलिस अधिक्षक कोकाटे, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील यांचे पथक ठिकठिकाणी मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी करीत आहेत. दरम्यान, जिल्ह्यात समाज माध्यमावर चुकीच्या व अफवा पसविणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यासाठी सायबर विभागाचे पाच पथके समाज माध्यमावरील पोस्टवर लक्ष ठेऊन आहेत. या शिवाय मतदान केंद्राच्या १०० मिटर परिसरात मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर मोबाईल नेणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक कोकाटे यांनी दिले आहेत. दरम्यान, आज आखाडा बाळापूर येथील मतदान केंद्रावर सकाळी संतोष शिवाजी आम्ले या तरुणाने मतदान करून त्याच्या मतदान करतांनाचा व्हिडीओ तयार करून व्हॉटस्अप ग्रूपवर अपलोड केला. सदर प्रकार सायबर सेलच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने याप्रकाराची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने त्यास ताब्यात घेऊन त्याच्यावर आदर्श अचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यास समजपत्र देऊन सोडल्याचे सुत्रांनी सांगितले.