विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपला नाही:राजकारणात सर्वांचे दिवस बदलत असतात; संजय राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना इशारा

एकनाथ शिंदेंना पक्ष ताब्यात देण्याचे काम अमित शहांनी केले. त्यामुळे शिंदेंनी आपल्या घरात अमित शहांचा फोटो लावायला हवा. कारण अमित शाहा हे त्यांचे दैवत आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली. तसेच उत्तमराव जानकर यांच्याकडे ईव्हीएमविरोधात प्रचंड पुरावे आहेत, असा दावा करत सर्व पुरावे घेऊन उत्तमराव जानकर हे दिल्लीत गेले. पण त्यांना निवडणूक आयोग भेटत नाही, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदास संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची संजय राऊत यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचेही आत्मचिंतन करण्यात आले. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. काय म्हणाले संजय राऊत?
काही लोक मोह माया लोभ लाभ यासाठी जात आहेत. रोज बातम्या येतात. पण जिथे जातात ती खरी शिवसेना नाही. पण मोह कोणाला सुटला नाही, अशा अनेक प्रसंगातून आम्ही गेलो आहोत. विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपला असे होत नाही. राजकारणात कोणीही संपत नाही. ज्यांना जायचे ते गेले, ते सत्तेच्या मोहापायी गेले. ज्यांना जायचे त्यांची आम्ही मनधरणी करत बसले नाहीत. आमच्याकडे खंबीरपणे काम करणारे पक्षाचे लोक आहे. अशाप्रकारचे नेतृत्व स्थानिकस्तरावर असल्यामुळे शिवसेना अनेक संकटातून पुढे गेलेली आहे. भाजप आणि त्यांच्या सहकार्यांना मिळालेला निर्णय आणि निकाल का मिळाला? याची कारणमीमांसा वारंवार झाली, असे संजय राऊत म्हणाले. जानकरांकडे ईव्हीएम विरुद्ध अनेक पुरावे
उत्तमराव जानकर सध्या दिल्लीत आहेत. ते ईव्हीएम विरुद्ध निवडणूक आयोगाची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडे ईव्हीएमविरोधात प्रचंड पुरावे आहेत. पूर्वी बूथ कॅप्चरिंग करायचे, आता ईव्हीएम आणि मतदार याद्यांच्या माध्यमातून कशाप्रकारे बुथ ताब्यात घेण्यात आले. हे सर्व पुरावे घेऊन उत्तमराव जानकर दिल्लीत गेले. पण त्यांना निवडणूक आयुक्त भेटत नाहीत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. नाशिक पालिका स्वबळावर नाही
मुंबई संदर्भात उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतलेली आहे. मुंबईचे राजकारण वेगळे असते. 14 महानगरपालिका आहेत. प्रत्येक पालिकेतील प्रश्न वेगळे आहेत. नाशिकमध्ये स्वबळावर लढण्याचे ठरलेले नाही. याबाबत निवडणुका लढणारे लोक ठरवतील. नाशिकच्या कोअर कमिटी जे सांगेल, त्यानुसार निर्णय होईल. मुंबईत मात्र वेगळे राहिल, त्याबाबत उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेले आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. शिंदेंनी ईव्हीएमचे आभार मानावे
एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीत वापरलेला अर्मादित काळा पैसा, प्रशासकीय यंत्रणा आणि ईव्हीएम याचे आभार मानले पाहिजे. यातूनच त्यांना विजय मिळाला आहे. ही निवडणूक घोटाळे करून जिंकण्यात आली आहे. मतदान करणाऱ्यांना या निकालावर विश्वास नाही, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. अमित शहा हेच एकनाथ शिंदेंचे दैवत
चंद्राबाबू यांनी पक्ष फोडला नव्हता. त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता. एकनाथ शिंदे, भाजप आणि अजित पवारांचाही निकाल संशयास्पद होता. निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून आमचा पक्ष ताब्यात घेतला. एकनाथ शिंदेंना पक्ष ताब्यात देण्याचे काम अमित शहांनी केले. त्यामुळे शिंदेंनी आपल्या घरात अमित शहांचा फोटो लावायला हवा, बाळासाहेबांचा नको. कारण अमित शाहा हे त्यांचे दैवत आहेत. अमित शहांनीच हे सर्व कांड केले. अमित शाह आणि मोदी काय समुद्रमंथनातून अमृत पिऊन आले नाही, अशा शब्दात संजय राऊतांनी ताशेरे ओढले. राम-कृष्ण सुद्धा आले आणि गेले, तसे अमित शहा आणि मोदी सुद्धा जाणार आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला.

  

Share