विद्यार्थिनींनी बनविला सोलर कॅप प्रोजेक्ट:विक्रेत्यांना उन्हात व अंधारात होणार फायदा; मिनी फॅन, एलईडी लाइट्स

येथील वैनतेय विद्यालयाच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी स्नेहा नागरे आणि गौरी विजय साळुंखे यांनी विद्यालयाच्या अटल टिंकरिंग लॅबमध्ये ठेले विक्रेत्यांसाठी सौर उर्जेवर चालणारी टोपी तयार केली आहे. या टोपीला “सोलर कॅप’ असे नाव दिले गेले आहे. रस्त्यावर ठेले विक्रेते उन्हात आणि रात्रीच्या अंधारात विक्री करतात. उन्हामुळे त्यांना तापमानाचा त्रास होतो. व अंधारामुळे त्यांना विक्री करताना समस्या भेडसावतात. यावर उपाय म्हणून या विद्यार्थिनींनी शिरीष पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या अटल टीकरिंग लॅब मध्ये सोलर कॅप तयार केली. यात सोलर पॅनेल, लिथियम आयन बॅटरी, एक मिनी फॅन, एलईडी लाइट्स आणि आवाज सहाय्यक यंत्रणा यांचा समावेश आहे. या सोलर कॅपमुळे विक्रेत्यांना उन्हापासून संरक्षण आणि रात्री काम करण्यासाठी आवश्यक प्रकाश मिळतो. या प्रोजेक्टवर २,१४० रुपयांचा खर्च आला आहे. एस आय एम स्कूल इनोव्हेशन मॅरेथॉन अंतर्गत या विद्यार्थिनींनी ऑनलाइन पावर पॉइंट प्रेझेंटेशन सादर केले. ज्यात त्यांचा प्रकल्प अत्यंत चांगल्या प्रकारे प्रदर्शित झाला. यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या अटल इन्क्युबेशन सेंटरचे सीईओ अमित रंजन यांनी या विद्यार्थिनींच्या या सोलर कॅप प्रोजेक्टचे ऑनलाइन परीक्षण केले. यावेळी अटल इन्क्युबेशन सेंटरचे सीईओ अमित रंजन व सीओओ वैभव खैरनार यांनी विद्यार्थिनींच्या कामाचे कौतुक केले. त्यांना मार्केटिंगच्या दृष्टीने मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य देण्याचे आश्वासन दिले. या विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक शिक्षकांचे न्या रानडे विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त वि. दा. व्यवहारे, विश्वस्त ॲड. ल. जि. उगावकर, रतन वडघुले आदींनी अभिनंदन केले. अटल टिंकरिंग लॅब ही योजना केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत राबवली जाते. भारतामध्ये सध्या १०,००० पेक्षा अधिक अटल टिंकरिंग लॅब कार्यरत आहेत. या लॅबच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष, प्रयोगशीलता, तंत्रज्ञानाची गोडी निर्माण होते. ते सामान्य समस्यांवर उपाय शोधण्याची क्षमता विकसित करतात. या लॅब्समुळे विद्यार्थ्यांना संशोधनासाठी आवश्यक असलेली साधने, तांत्रिक ज्ञान व प्रोत्साहन मिळत असल्यामुळे त्यांच्या संशोधन क्षमतेत लक्षणीय वाढ होत आहे.