विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांमध्ये सीसीटीव्ही बसवावेत:पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या सूचना, मुलींच्या सुरक्षिततेकडे शाळांना लक्ष देणे गरजेचे

हिंगोली जिल्ह्यातील सर्व शाळांनी विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सुचना पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिल्या आहेत. या शिवाय मुलींच्या सुरक्षिततेकडे शाळांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हिंगोली येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिस अधीक्षक कोकाटे यांच्या उपस्थितीत स्कूल बस सुरक्षा समितीची बैठक झाली. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहूल गावडे, मोटार वाहन निरीक्षक जगदीश माने यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी तसेच शाळा प्रशासनाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलिस अधीक्षक कोकाटे यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील सर्वच शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी लक्ष द्यावे. स्कूलबस चालक व मालक तसेच शाळा व्यवस्थापनांनी शाळेत मुलांची ने-आण करणारी बस व इतर वाहने मुलांकरिता सुरक्षित राहतील यांची खबरदारी शाळेने घ्यावी. प्रत्येक बस व इतर वाहनात सीसीटीव्ही बसवावेत अशा सुचना त्यांनी दिल्या. या सोबतच शाळेच्या बसमध्ये सहा वर्षाखालील मुलांना ने-आण करण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. तसेच मुली असणाऱ्या शाळांतील वाहनांमध्ये महिला कर्मचारी बंधनकारक आहेत. स्कूलबस चालक, वाहक, मदतनीसांची पोलीस विभागाकडून चारित्र्य पडताळणी करुन घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या शिवाय मुलांच्या सुरक्षेसाठी शाळांमार्फत ॲप तयार करून त्यामध्ये जीपीएस बसवावेत. मुले घरातून निघून शाळेत व घरी सुरक्षित पोहोचल्याची नोंद पालक करु शकतील. शाळा प्रशासन व पालक हे मुलांच्या सुरक्षिततेबद्दल जागरूक राहु शकतील. यामुळे मुले कोणत्याही कारणास्तव शाळेत पोचली नाहीत किंवा घरी पोहोचली नाही तर सूचना, अलर्ट देवून लगेच त्याला शोधण्याची कार्यवाही सुरु करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपप्रादेशीक परिवहन अधिकारी गावडे यांनीही मार्गदर्शन केले.