ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे खंडणी प्रकरण:सेवानिवृत्त IAS अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्या पुणे येथील निवासस्थानी तीन तास चौकशी

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याच्या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. सेवानिवृत्त आयएएस अधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या पुणे येथील कोरेगाव पार्क मधील निवासस्थानी सातारा पोलीसांनी त्यांची चौकशी केली अशी चर्चा आहे. मात्र देशमुख यांनी याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. गेल्या काही दिवसापूर्वी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात एका महिलेला सातारा पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते. या महिलेला पोलिसांनी रक्कम स्वीकारताना पकडून अटक केली. मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरील महिलेच्या विनयभंग प्रकरणात गुन्हा दाखल असून ते प्रकरण सुरू असतानाच त्याच महिलेकडून खंडणी मागितल्याचा गुन्हा सातारा पोलिसात दाखल झाला आहे त्यादरम्यान प्रभाकर देशमुख पत्रकार तुषार खरात यांचे फोन संबंधित महिलेला गेल्याची चौकशीत आढळून आले आहे यामुळे यात प्रभाकर देशमुख यांचा कितपत हात आहे याची चौकशी करण्यासाठी म्हणून सातारा पोलिसांनी पुण्यातील कोरेगाव पार्क भागातील देशमुख यांच्या घरी त्यांची तीन तासापेक्षा जास्त चौकशी केली. त्यातून पोलिसांना काय मिळाले हे अध्याप तरी स्पष्ट झाले नाही. मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर सातत्याने आरोप करणारे पत्रकार तुषार खरात यांना देखील अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणासंदर्भात सातारा पोलीस प्रभाकर देशमुख यांच्याकडे पुणे येथील कोरेगाव पार्क मधील निवासस्थानी आल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलांच्या संपर्कात प्रभाकर देशमुख होते असे सांगितले होते. त्या संदर्भाने देशमुख यांची सातारा पोलिसांनी चौकशी केली. तब्बल तीन तास चौकशी करून सातारा पोलीस प्रभाकर देशमुख यांच्याकडून रवाना झाले आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण कोणते नवीन वळण घेते हे पहावे लागणार आहे.