वेल्स ऑन व्हिल्सतर्फे उदमाळ येथे 59 कुटुंबांना फिरत्या ड्रमचे वाटप:भरउन्हाळ्यात महिलांच्या डोक्यावरील हंड्याचा भार हाेणार कमी

सुरगाणा तालुक्यातील उदमाळ येथे ’वेल्स ऑन व्हिल्स’ संस्थेने सामाजिक बांधिलकीतून उदमाळ येथील महिलांच्या डोक्यावरील हंड्याचा भार हलका व्हावा यासाठी संस्थेने ५९ कुटुंबास पाण्याच्या फिरत्या ड्रमचे वाटप केले. ग्रामीण आणि आदिवासी भागातील महिलांना पाणी भरण्यासाठी रोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते म्हणून बुधवारी (दि. २६) आदिवासी महिलांच्या डोक्यावरील हंड्याचा भार कमी करण्यासाठी पाण्याचे फिरते ड्रम वाटप केले. तालुक्यातील अनेक गावात उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र स्वरुप धारण करते. महिलांना डोक्यावर हंडे घेऊन दऱ्याखोऱ्यात पाण्याचा शोध घ्यावा लागतो.डोक्यावर हंडे वाहून नेल्याने अनेक महिलांना आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. यात मणक्याचे आजार, पाठदुखी आणि सांधेदुखी यासारख्या समस्या प्रमुख आहेत. या उपक्रमामुळे त्या त्रासातून काही प्रमाणात दिलासा मिळेल. यावेळी संस्थापक अध्यक्ष शहा मेनन, प्रकल्प संचालक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प व्यवस्थापक नारायण गभाले, दीपक मेघा, चंदू ठाकरे, विठ्ठल गवळी, ईश्वर पवार, गणेश ठाकरे यांच्यासह गावातील ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या . यावेळी या महिलांनी वेल्स ऑन व्हिल्स या संस्थेचे आभार मानले. यापुढेही ड्रम वाटप करण्यात येणार आहे. ही संस्था सहा वर्षांपासून काम करत असून आतापर्यंत तालुक्यातील १३ गावात ६९२ ड्रम मोफत वाटप करण्यात आले आहे. या ड्रमची बाजारात किंमत तीन ते साडेतीन हजार रुपये इतकी आहे. एका ड्रममध्ये ४५ लिटर पाणी बसते. सामाजिक संस्था पुढाकार घेऊन आदिवासी महिलांना भविष्यात गंभीर आजार होऊ नये म्हणून प्रयत्न करतात. या ड्रममुळे महिलांच्या डोक्यावरील हंड्यांचा भार कमी होईल. याला आणखी पाठबळ मिळावे आणि जास्तीत जास्त महिलांनी त्याचा लाभ घ्यावा, अशी अपेक्षा आहे. – कविता पाडवी, उदमाळ (पांगारणे)