कोणाला काय म्हणतो, काय बोलतो? याचा विचार केला पाहिजे:अजित पवारांवरील टीकेवरून भुजबळांचा आव्हाडांना सल्ला
आपण कोणाला काय म्हणतो, कोणाला काय बोलतो? याचा विचार केला पाहिजे, असा सल्ला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिला आहे. जे तुमच्याबरोबर 25 ते 30 वर्ष राहिले आहेत. त्या सर्वांना ते लागू होते, असा टोलाही आव्हाड यांना लगावला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. अजित पवारांचा पक्ष पाकिटमारांची टोळी आहे, असे आव्हाड यांनी म्हटले. या वक्तव्यानंतर अजित पवार गटाच्या नेत्यांनी आव्हाडांचा समाचार घेण्यास सुरुवात केली आहे. काय म्हणाले छगन भुजबळ?
छगन भुजबळ म्हणाले की, आपण शब्द कुठले वापरावेत? याचा विचार जितेंद्र आव्हाड यांनी केला पाहिजे. विचार करून शब्द वापरले पाहिजेत. आपण कोणाला काय म्हणतो, कोणाला काय बोलतो? याचा विचार केला पाहिजे. जे 25 ते 30 वर्ष तुमच्याबरोबर राहिले आहेत. त्या सर्वांना ते लागू होते. त्यांनी एवढ्यावर समजून घेतले पाहिजे, असे मला वाटते. कारण त्यांच्या राजकीय आयुष्यात त्यांना पुढे आणण्यात शरद पवारांचा हात आहे. तसेच त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये त्यांना पुढे आणण्यात माझाही हात आहे, हे त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे त्यांनी शब्द सांभाळून वापरले पाहिजेत, असा सल्लाही भुजबळांनी जितेंद्र आव्हाडांना दिला आहे. नेमके काय म्हणाले आमदार जितेंद्र आव्हाड?
मुंब्य्रातील कळवा येथे एका सभेत बोलताना शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची जीभ घसरली. जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले. अजित पवारांचा पक्ष पाकिटमारांची टोळी असल्याचे आव्हाड म्हणाले. तुमच्यात हिंमत होती, अजित पवार मर्दाची औलाद असते तर बोलले असते शरद पवार यांनी तुतारी निशाणी घेतली आणि म्हटले असते की मी पण दुसरे चिन्ह घेऊन निवडणूक लढवतो, तर त्यांना मर्द म्हटले असते. काकाने देशात वाढवलेला पक्ष माझा पक्ष असल्याचे म्हणून फिरत आहात. पण जनतेला वास्तव माहीत आहे. असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. आव्हाडांच्या मेंदूला लकवा मारला
जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले असून राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांनी आव्हाड यांच्या मेंदूला लकवा मारला आहे, असे खोचक टोला लगावला आहे. आव्हाड हे घरभेदी असून शरद पवार आणि अजित पवार यांना दूर करणाऱ्यांमध्ये प्रथमस्थानी होते, असा गंभीर आरोप देखील ठोंबरे यांनी केला.