मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचा काय आहे इतिहास?:’डग बीगन’ होते ‘वर्षा’ बंगल्याचे नाव, वसंतरावांनी केले नामकरण तर अंतुलेंनी केला कायापालट
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान हे ‘वर्षा’ बांगला आहे. राज्यातील अनेक मोठ्या घडामोडी याच वर्षा बांगल्यामधून होतात. मात्र, वर्षा हा बंगलाच कसेकाय मुख्यमंत्र्यांच्या निवासाचे स्थान बनले? काय आहे या मागचा इतिहास याविषयी आपण या लेखात जाणून घेणार आहोत. ‘वर्षा’ बंगल्याचे नाव ‘डग बीगन’ होते वर्षा बंगल्याचा इतिहास अत्यंत रंजक आहे. विशेष म्हणजे या बंगल्याचे नाव देखील वर्षा नव्हते, या बंगल्याचे नाव ‘डग बीगन’ असे होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मुंबई येथील ‘सह्याद्री’ हे अधिकृत निवासस्थान केले होते. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतरचे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांनी देखिल सह्याद्री याच बंगल्याला निवासस्थान बनवले होते. मारोतराव कन्नमवार यांच्या मंत्रिमंडळात वसंतराव नाईक हे कृषिमंत्री होते. वसंतराव नाईक हे त्यावेळी डग बीगन या बंगल्यात राहत होते. या बंगल्यात घरंदाजपणा आणि आपलेपणा आहे, अशी भावना वसंतरावांची होती. मारोतराव कन्नमवार यांचा अचानक मृत्यू झाला आणि वसंतराव नाईक मुख्यमंत्री बनले. वसंतराव नाईक हे हाडाचे शेतकरी होते. कृषिबद्दल त्यांना अधिक प्रेम होते तसेच पावसाबद्दल फार जिव्हाळा होता. त्यामुळे त्यांनी राहत असलेल्या ‘डग बीगन’ या बंगल्याचे नाव ‘वर्षा’ असे ठेवले. वसंतराव नाईक मुख्यमंत्री झाल्यावर 7 नोव्हेंबर 1956 साली ‘वर्षा’ याच बांगल्याला अधिकृत निवासस्थान बनवले. विशेष म्हणजे याच दिवशी त्यांच्या मुलगा अविनाश यांचा वाढदिवस होता. मारोतराव कन्नमवार यांचे आकस्मिक निधन झाले आणि 5 डिसेंबर 1963 रोजी वसंतराव नाईक मुख्यमंत्री बनले. मंत्रिमंडळाची बैठक संपवून नाईक ‘वर्षा’ या बंगल्यावर परतले तेव्हा त्यांचे भाऊ बाबासाहेब त्यांना म्हणाले होते की, शेवटी वर्षा बंगल्यालाच मुख्यमंत्री बंगला म्हणून लौकिक मिळणार असे दिसते. याच सोबत नाईक यांच्या पत्नी वत्सलाबाई यांना देखील सह्याद्रीपेक्षा वर्षा बंगलाच प्रिय होता. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, सह्याद्री नको की विध्यांद्री नको. आपण येथे खूश आहोत. वसंतराव नाईक या बंगल्यावर सर्वाधिक म्हणजे जवळपास 11 वर्षे वास्तव्यास होते. वर्षाच्या आवारात त्यांनी आंबा, लिंब, सुपारी आदी विविध झाडे लावली. ते माळ्याला म्हणायचे, मी झाडे लावीन ती माझ्यासाठीच आहेत, असे समजू नकोस. पुढील काळात ती कुणालाही उपयोगी पडायला हवीत. वसंतराव यांच्या पत्नी वत्सलाबाई यांच्या मनात वर्षा बंगल्यात काही सुधारणा करायचा विचार होता. पण याला वसंतरावांनी विरोध केला होता. ते म्हणाले, आपण आज मंत्री आहोत. कदाचित उद्या नसूही. आपल्यासाठी सरकारवर खर्चाचा बोजा नको. अंतुलेंनी केला वर्षा बंगल्याचा कायापालट पुढे 1980 मध्ये अब्दुल रहमान अंतुले हे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी वर्षा बंगल्याचा कायापालट केला. हा बंगला एक मजली होता आणि साधा होता. तसेच अनेकवेळा मुख्यमंत्री गाठीभेटी बंगल्यातच घेत असत, यामुळे घरातील इतरांना तसेच स्त्रियांना पाहुण्यांसमोर ये-जा करणे संकोचाचे वाटायचे. त्यामुळे अंतुले यांनी बंगल्यावर आणखी एक मजला बांधला आणि तिथे दोन शयनगृह तयार केले. याच सोबत वर्षा बंगल्यातून मुख्यमंत्री कार्यालयात जाण्यासाठी एक आच्छादित मार्ग उभारला.