राज्य सरकार म्हणून जे कार्य करू ते संविधान अनुरूप करू:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास; चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन
राज्य सरकार म्हणून आम्ही जे कार्य करू ते संविधान अनुरूप करू. तसेच ते काम करत असताना समाजातील शेवटचा घटक म्हणजेच वंचिताचा विचार करून काम करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये चैत्यभूमी परिसरात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. नरेंद्र जाधव लिखित ‘भारतीय प्रजासत्ताक साकारणारा महामानव’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. भारत हा जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला आहे. आणि आगामी काळात जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार आहे. या सर्वांचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलेल्या दिलेल्या संविधानाचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर आणि सर्वात उत्तम संविधान हे भारताचे संविधान असल्याचे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे. संविधानामुळेच सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडवण्याचा मूलमंत्र शिकवला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले. देशापुढे असलेली कोणतीही समस्या, त्या समस्येचा निदान त्यावरील उपाय हा भारताच्या संविधानात पाहायला मिळत असल्याचे देखील फडणवीस यांनी म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला समतेचा, समानतेचा संदेश आपल्या संविधानाच्या माध्यमातून आपण अंगीकारला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. यावेळी नरेंद्र जाधव यांच्या पुस्तकाबद्दल देखील फडणवीस यांनी त्यांचे अभिनंदन आणि आभार मानले. भारतीय संविधानाचा इतिहास आणि कशाप्रकारे प्रकारे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने हे संविधान तयार होत गेले, याचा अतिशय सुंदर आलेख नरेंद्र जाधव यांच्या पुस्तकात आला असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.