पत्नीचा खून करणाऱ्या पती ला शिरवळ पोलिसांनी पकडले:बंगळुरू मध्ये पत्नीचा मृतदेह बॅगेत भरला, मुंबईकडे जाताना पतीचे विषप्राशन

पत्नीचा खून करणाऱ्या पती ला शिरवळ पोलिसांनी पकडले:बंगळुरू मध्ये पत्नीचा मृतदेह बॅगेत भरला, मुंबईकडे जाताना पतीचे विषप्राशन

बंगळुरुत आपल्या पत्नीचा खून करुन तीचा मृतदेह बॅगेत भरून घराला कुलूप लावून मुंबईचे दिशेने पळून जाणाऱ्या आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीसांच्या सतर्कतेमुळे आरोपीला अटक करण्यात आली. राकेश राजेंद्र खेडेकर (वय 35 धंदा नोकरी रा जोगेश्वरी , मुंबई) हा मुंबई येथून बंगळुरु येथे फेब्रुवारी 25 मध्ये आपली पत्नी गौरी (वय 32) हिचेसह बनारगट्टा तेजस्विनी नगर येथे राहण्यास गेला होता. राकेश हा कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर पदावर असून वर्क फ्रॉम होम करीत होता, तर त्याची पत्नी गौरी जॉब शोधत होती. 26 मार्च 2025 चे रात्री राकेशकडे पत्नी गौरीने पुन्हा मुंबईला जाण्याचा आग्रह धरला. या कारणाने त्यांचे वाद होऊन पत्नी गौरी घरातील भांडी आपटू लागली. तेव्हा पती राकेशने आपण आता राहत असलेल्या रुमचे डिपॉझिट भरलेले आहे आपण जर रुम सोडली तर डिपॉझिटचे पैसे मिळणार नाहीत. तसेच, येथे येण्यासाठी आधीच खूप खर्च झाला आहे, असे तिला समजावत होता. तरीही गौरी त्याचे ऐकत नसल्यामुळे त्यांच्यात याच कारणावरुन टोकाचा वाद झाला. अखेर, पत्नी गौरीने घरातील चाकू घेऊन राकेशला मारण्याची भीती दाखवली, त्याचा राग राकेशला आल्याने राकेशने तिच्या हातातील चाकू घेऊन पत्नी गौरीचे मानेवर, गळ्यावर आणि पाठीवर चाकूने वार केले. त्यामध्ये, गौरीने जीव सोडला. गौरी जखमी अवस्थेत घराचे लॉबीमध्ये निपचित पडली, ती मयत झाल्याची खात्री राकेशला झाली. त्यानंतर राकेशने घरातील मोठी बॅग रिकामी करून त्यामध्ये पत्नी गौरीचे शव ठेवून बॅगेची चेन लावली व ती बॅग घराच्या बाथरूम बाहेर नेऊन ठेवली. 27 मार्च 2025 च्या रात्री 12 वाजता राकेश त्याचे साहित्य सोबत घेऊन त्याच्या मालकीची होंडा सिटी कार घेऊन जोगेश्वरी मुंबई येथे जाण्याकरता बंगळुरू येथून रवाना झाला. पत्नीचा खून केल्यामुळे राकेशला टेन्शन आले होते. त्याने महाराष्ट्रातील कागल या गावी आल्यावर एका मेडिकल दुकानांमधून हार्पिक सनीफीनाईल व झुरळ मारण्याचे औषध घेऊन कोल्हापूर, कराडच्या दिशेने प्रवास केला. दरम्यान, राकेशने बंगळुरू येथील इमारतीमधील खालचे मजल्यावर राहणाऱ्या इसमाला फोन करून पत्नीच्या खुनाबाबत व बॅगेत मृतदेह ठेवल्याची माहिती दिली. त्यानंतर पुढे खंडाळा घाट उतरल्यावर शिरवळ येथील निप्रो कंपनीजवळील हायवे रोडवर राकेश कार घेऊन आला. त्याला केलेल्या खुनाचे टेन्शन आल्याने त्याने विकत घेतलेले सर्व कीटकनाशक व औषधे एकत्र करुन प्यायले. त्याचा त्याला त्रास होऊ लागल्याने राकेश कारमधून बाहेर येऊन रस्त्यावर बसला. राकेशला पाहून एका मोटरसायकल स्वाराने त्याची विचारपूस केली. त्यावेळी, आपण फिनाईल पिल्याचे सांगितल्याने दुचाकी स्वाराने त्याला तात्काळ त्याच्या कारमधून शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले. त्याठिकाणी अगोदरच हजर असलेले शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार कुंभार यांनी राकेशकडे काय झाले याबाबत विचारणा केली असता राकेशने त्याच्या पत्नीच्या खूनाबाबतचा प्रकार सांगितला. याबाबत शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी जोगळेकर हॉस्पिटलमधून आवश्यक माहिती घेऊन पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख यांना ही माहिती दिली. पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ बंगळुरू येथे संपर्क करून गौरीच्या खुनाबाबत खात्री केली. तसेच तेथील संबंधित वरिष्ठ अधिकारी पोलीस स्टेशन इन्चार्ज व इतर संबंधितांचे फोन नंबर पोलीस निरीक्षक नलावडे यांना पुरविले व पुढील तपासकामी सूचना दिल्या. पोलिसांनी बंगळुरू पोलिसांना दिली माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सातारा वैशाली कडूकर, पोलीस उपविभागीय अधिकारी फलटण राहुल धस यांना याबाबत माहिती दिली. वरिष्ठांच्या प्राप्त सूचनेनुसार पुढील कारवाई करुन राकेशचे नातेवाईक व बंगळुरू येथील पोलीस अधिकाऱ्यांची संपर्क करून त्यांना आरोपीबाबतची व उपचार बाबतची माहिती दिली. राकेशला अधिक उपचाराची गरज असल्याने त्याला तात्काळ पोलिसांनी भारतीय विद्यापीठ हॉस्पिटल व त्यानंतर ससून हॉस्पिटल पुणे येथे उपचाराकरता दाखल केले. बंगळुरू येथील संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी आज पहाटे ससून हॉस्पिटल येथे पोहोचले असून त्यांनी आरोपीकडे विचारपूस सुरू केलेली आहे. आरोपीने पळून जाण्याच्या व विषारी कीटकनाशके पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याला नागरिक व पोलिसांनी तात्काळ दवाखान्यात दाखल करून व त्यानंतर पुढील उपचारासाठी पुणे येथे रवाना केले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment