सिल्लोड आगारात 11 वाढीव बसेस; पुणे, नागपूर, अमरावतीसाठी फेऱ्या वाढवल्या:जुन्याच दरात करता येणार एसटीचा प्रवास; दिवाळीत प्रवासी संख्येत होणार वाढ
दिवाळीतील होणाऱ्या वाहतुकीसाठी या वर्षी सिल्लोड एसटी विभागाकडून तब्बल ११ वाढीव बसेस तैनात करण्यात आल्या आहेत. २५ ऑक्टोबरपासून दिवाळीच्या गर्दीला सुरुवात झाली असून साधारणत: १५ नोव्हेंबरपर्यंत मोठी गर्दी राहणार आहे. प्रवाशांची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी एसटीचा सिल्लोड विभाग अलर्ट मोडवर आला आहे. सिल्लोड विभाग हा मराठवाडा, खान्देश तसेच विदर्भाला जोडण्यासाठी केंद्रबिंदू ठरतो. या तीनही भागाला जोडण्यासाठी पसरलेल्या रस्त्यांवर एसटीचेही मोठे जाळे पसरलेले आहे. या मार्गावर दिवाळीची होणारी वाहतूक सुरळीत पार पडावी सासाठी एसटीकडून या वर्षी तब्बल ११ वाढीव बसेस देण्यात आल्या आहेत. शिवाय मोठ्या क्षमतेने कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सिल्लोड आगारात दिवसाला तीन ते चार हजार किमी अधिक किमीच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत, तर छत्रपती संभाजीनगर व पुण्याकडे दिवसाला ४ बसेस तसेच अमरावती, जालना,पंढरपूर, अकोला, नागपूर, मुंबई आदी मार्गावरील फेऱ्याही वाढवल्या आहेत. दिवाळीचा सण असल्याने पुणेसह इतर मोठ्या शहरात कामासाठी गेलेले कामगार आता गावाकडे परतले आहेत. यामुळेही सध्या बसेसला मोठी गर्दी वाढत आहे. यादरम्यान महिला आणि वृद्ध प्रवाशांची संख्या मोठी आहे. यामुळे स्थानकावरून धावणाऱ्या लांब पल्ल्यांच्या बसेसमध्ये मोठी गर्दी दिसत आहे. यासाठीच आगाराच्या वतीने जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली. यामुळे दिवाळी मोठी कमाई करण्याची संधी आगाराला आहे. आगाराच्या उत्पन्नात होणार मोठी वाढ सिल्लोड आगाराला आता ऐन दिवाळीच्या सणामध्ये मोठी कमाई करण्याची संधी मिळाली आहे. दिवाळीमुळे सध्या बसेसला मोठी गर्दी होत आहे. यातून आगाराला आर्थिक फायदा होत आहे. याच दरम्यान जादा बस सोडल्यानंतरही गर्दी कायम आहे. जादा बसेसचे नियोजन; आगाराचा निर्णय फायदेशीर सिल्लोड विभागात ६८ बसेस आहेत व यंदा तब्बल ११ वाढीव नवीन बसेस सज्ज आहे. प्रवाशांना एसटीकडून भाडेवाढ दर हा जुनाच आहे. यामुळे प्रवाशांना आणखी दिलासा मिळाला आहे. प्रत्येक प्रवाशाला दिवाळीनिमित्त करावी लागणारी वाहतुक सुरळीत तसेच वेळेत करता यावी यासाठी नियोजन करण्यात आले आहे. यंदा ११ वाढीव बसेस प्रवाशांच्या सेवेत आहेत, अशी प्रतिक्रीया सिल्लोडचे आगार प्रमुख विजय कलवाने यांनी दिली. यासाठी आगाराने खास लालपरी दाखल केल्या आहेत.