13 महिन्यांपासून आंदोलन करणारे शेतकरी नेते अटकेत, तंबूही हटवले:केंद्रीय मंत्र्यांसोबतच्या बैठकीतून परतणाऱ्या शेतकरी नेत्यांवर कारवाई

पिकांना हमीभावाच्या मागणीसाठी पंजाब-हरियाणाच्या शंभू व खानौरी सीमेवर १३ महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकरी नेत्यांना पंजाब पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी ताब्यात घेतले. केंद्रीय मंत्र्यांच्या पथकासोबतची बैठक आटोपून शेतकरी नेते शंभू व खानौरी सीमेवरील आंदोलनस्थळी परतत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. या नेत्यांत सरवनसिंग पंधेर आणि जगजितसिंग डल्लेवाल यांचा समावेश आहे. ते गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून उपोषण करत आहेत. वास्तविक बुधवारी शेतकरी नेते व केंद्रीय प्रतिनिधींमध्ये चर्चेचा सातवा टप्पा पार पडला. तथापि, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर कोणतेही एकमत झाले नाही. केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान, प्रल्हाद जोशी आणि पीयूष गोयलही बैठकीला उपस्थित होते. ३ तासांच्या बैठकीनंतर शिवराज म्हणाले की, चर्चा सकारात्मक होत्या. आता ४ मे रोजी बोलू. बैठकीनंतर शेतकरी नेते परत येऊ लागले तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदरसिंग राजा वारिंग आणि माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांनी आरोप केला की, आप व भाजपने मिळून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. शंभू बॉर्डर: चार हजार पोलिसांनी २ तासांत मोकळे केले आंदोलनस्थळ, २०० वर शेतकरी ताब्यात निदर्शनस्थळावरील शेड जेसीबीने पाडले ‘आप’वर नाराजी… संयुक्त किसान मोर्चाने म्हटले, आप सरकार शेतीत कॉर्पोरेट व परदेशी कंपन्यांच्या बाजूने आहे. ते संघ, भाजपला पाठिंबा देत आहे. बीकेयू (के) प्रमुख हरमीत सिंग म्हणाले की ही बैठक एक फसवणूक होती.