3 ऑक्टोबर हा ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’:3 ते 9 ऑक्टोबर अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा होणार, अजित पवारांची घोषणा

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प आज विधिमंडळात सादर करण्यात आला. 3 ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’म्हणून साजरा केला जाणार अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी यावेळी केली. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानले. शिवाय मराठी भाषेच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार सुरू करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. भाव फुलांना पायी उधळून आयुष्याचा कापूर जाळून तुझे सारखे करीन पूजन गीत तुझे मी आई गाईन शब्दोशब्दी अमृत ओतून अशा काव्य पंक्तीतून अर्थमंत्री अजित पवार यांनी मराठी भाषेचा गौरव करीत माय मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.आपल्या माय मराठीस केंद्रीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 3 ऑक्टोबर, 2024 रोजी झालेल्या बैठकीत अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्यातील जनतेच्या आणि जगभरातील मराठी भाषिकांच्या वतीने मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी महोदयांचे मन:पूर्वक आभार मानतो, असे अजित पवार म्हणाले. यापुढे दरवर्षी 3 ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा सन्मान दिन, तर 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येईल, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केली. मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर या ठिकाणी अभिजात मराठी भाषेच्या संशोधन व अध्ययनासाठी उच्च दर्जाचे संशोधन केंद्र तसेच अनुवाद अकादमी स्थापित करण्यात येणार आहे. उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार सुरू करणार मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून अभिजात मराठी भाषाविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मराठी भाषेच्या संशोधनातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार सुरु करण्यात येणार, अशी माहिती यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. भाषेला अभिजात दर्जा देणे म्हणजे काय? केंद्र सरकारने 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. एखाद्या भाषेला अभिजात दर्जा मिळणे म्हणजे भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहोर उमटणे. भाषा आणखी समृद्ध करण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी सुमारे 250 ते 300 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते. भाषा भवन उभारणे, भाषेतील ग्रंथ व साहित्याचा प्रसार करणे, ग्रंथालये उभारणे, देशभरातील विद्यापीठे किंवा इतर संस्थांमार्फत भाषेचा प्रसार देखील यातून करता येतो. विशेष म्हणजे भारतातील सर्व विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्यासाठी व्यवस्था केली जाणार. प्राचीन ग्रंथांचा अनुवाद केला जाणार. अभिजात दर्जा मिळाल्याने या भाषेतील विद्वान व्यक्तींना दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीजची स्थापना देखील करता येते. भाषेला अभिजात दर्जा कोणत्या निकषांवर दिला जातो? एखाद्या भाषेला अभिजात दर्जा कोणत्या निकषांवर दिला जातो? तर अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी ती भाषा किमान दीड ते दोन हजार वर्षे प्राचीन असावी लागते. या भाषेत समृद्ध ग्रंथ व अन्य साहित्य परंपरा असावी लागते. महत्त्वाचे म्हणजे हे साहित्य मूळ भाषेतीलच असावे, दुसऱ्या भाषांमधून अनुवाद केलेले नसावे. तसेच भाषेचा प्रवास हा अखंडित असावा. प्राचीन भाषा आणि सध्या वापरतो त्या भाषेतील नाते ठळक दिसावेत. या काही अटी आहेत, याच निकषांवर भाषेला अभिजात दर्जा दिला जातो.