मुंबई – अहमदाबाद वगळता 6 बुलेट ट्रेन प्रकल्प अधांतरी:बुलेट ट्रेनमुळे जवळपासच्या शहरांची प्रगती होईल

मुंबई-अहमदाबाद मार्गावर बुलेट ट्रेन केव्हापासून धावणार हे आताच सांगणे कठीण आहे. याशिवाय ६ बुलेट ट्रेन मार्गांची स्थिती आणखीच अनिश्चित आहे. कारण यावर डीपीआर आणि फिजिबिलिटी अहवालापुढे प्रगती झालेली नाही. मुंबई-अहमदाबाद मार्गावर वेगाने काम सुरू आहे. सरकारचे लक्ष्य आहे की, २०२६ पासून या मार्गावर बुलेट ट्रेन धावावी. मात्र, तांत्रिक कारणांमुळे सध्या बुलेट ट्रेन धावणार नाही. त्यासाठी २०३० पर्यंत वाट पाहावी लागेल. २०२६ पासून हायस्पीड वंदे भारत चालवण्याची तयारी आहे. तिचा वेग २५०​ किमी/तास असेल. सध्या वंदे भारतचा वेग १८० किमी/तास आहे. यासाठी नव्या तंत्राच्या दोन वंदे भारत निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली आहे. बुलेट ट्रेनची गती ३५० किमी प्रति तासापर्यंत असते. मात्र, सध्या तीदेखील भारतात २५० किमी/तासापर्यंतच्या गतीनेच चालवली जाईल. बुलेट ट्रेन प्रकल्पावरील खर्च व उत्पन्नाचे काय, या प्रश्नावर रेल्वे बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा प्रकल्प फक्त प्रवासी तिकिटातून येणाऱ्या उत्पन्नाशी जोडून पाहणे योग्य ठरणार नाही. यात महत्त्वाचा भाग म्हणजे बुलेट ट्रेनमुळे या मार्गावरील दुतर्फा शहर, वसाहतींच्या आर्थिक उलाढालीत प्रचंड वाढ होईल. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाचा विचार केला तर यात महाराष्ट्राचे पालघर आणि गुजरातचे वलसाड गुंतवणुकीचे नवे केंद्र असतील. हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे नवे उत्पादन हब, नवी टाऊनशिप,लॉजिस्टिक केंद्र, उद्योग सुरू होतील. यामुळे आर्थिक उलाढालीत तेजी येईल. सिमेंट आणि लोखंड निर्मितीत प्रचंड गुंतवणूक होईल. मुंबई-अहमदाबाद मार्गावर खर्च १ लाख कोटी, ८८ हजार कोटींचे कर्ज देईल जपान या प्रकल्पावर सुमारे १ लाख कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. जपान ८८ हजार कोटी रुपये ०.१% व्याजाने कर्ज देत आहे. हे कर्ज ५० वर्षांसाठी आहे. त्यात १५ वर्षापर्यंत मुद्दल किंवा व्याज देण्याचे बंधन नाही. म्हणजे १५ वर्षांनी परतफेड सुरू होईल. सूत्रांनी सांगितले की, वित्त मंत्रालय आणि रेल्वेचा अर्थ विभागही याविषयी सतर्क आहे की, हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या ओझे होऊ नये. चिंता यामुळे आहे कारण फ्रान्सला पॅरिस-ल्योन बुलेट ट्रेनसाठी खूप मोठे अनुदान द्यावे लागत आहे. तैवानमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाला १ अब्ज डॉलरच्या तोट्यातून बाहेर काढण्यासाठी सरकारला मदत पॅकेज द्यावे लागले. अर्जेंटिनाने बुलेट ट्रेन खर्चाचा अंदाज घेतल्यावर त्याऐवजी हायस्पीड ट्रेन यंत्रणा तयार करण्याचे नियोजन केले आहे. कारण हे ६ बुलेट प्रकल्प डीपीआर-फिजिबिलिटी अहवालापुढे गेले नाहीत 1. दिल्ली-अमृतसर 2. हावडा-बनारस-पाटणा 3. दिल्ली-आग्रा-लखनऊ-बनारस 4. दिल्ली-जयपूर-उदयपूर-अहमदाबाद 5. मुंबई-नाशिक-नागपूर 6. मुंबई-हैदराबाद. हावडा-बनारस-पाटणा आणि दिल्ली-अमृतसरचा डीपीआर बनवणे सुरू झाले आहे. बाकी चार मार्गांच्या फिजिबिलिटी अहवालावर काम होत आहे. दिल्ली-बनारसचा अहवाल रद्द झाला कारण १८० अंशांची अनेक वळणे येत होती. दोन्ही अहवाल आल्यावर विचार होईल की, या मार्गांवर बुलेट ट्रेन चालवणे गरजेचे आहे की नाही. डीपीआरमध्ये योजनेची प्रगती आणि खर्चाचा हिशेब असतो. फिजिबिलिटी अहवालात तांत्रिक, आर्थिक, कायदेशीर आणि व्यावसायिक व्यवहारांची तपासणी केली जाते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment