राज ठाकरेंच्या फडणवीसांना शुभेच्छा अन् इशारा:म्हणाले – सरकार लोकांना गृहीत धरत असल्याचे जाणवले तर सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की

राज ठाकरेंच्या फडणवीसांना शुभेच्छा अन् इशारा:म्हणाले – सरकार लोकांना गृहीत धरत असल्याचे जाणवले तर सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार स्थापन झाले आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतली. याच सोबत एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी महायुतीचे विशेषतः देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. तसेच सरकारला इशारा देखील दिला आहे. राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हंटले की, आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचे अभिनंदन. 2019 ला खरेतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे 2022 मध्ये जे घडले त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिले आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो. पुढे राज ठाकरे यांनी लिहिले की, पुढची 5 वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल. महायुती सरकारला इशारा देत राज ठाकरे यांनी लिहिले की, पण सरकार चुकतेय, लोकांना गृहीत धरतेय असे जर जाणवले, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसले तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे आणि श्री. अजित पवार आणि तसंच भविष्यातील त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शुभेच्छा!, असे त्यांनी लिहिले आहे. दरम्यान, महायुतीच्या या शपथविधी सोहळ्याला राज ठाकरे यांना देखील आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, काही कारणास्तव राज ठाकरे या सोहळ्याला उपस्थित नाही राहू शकले. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांना देखील आमंत्रण पाठवण्यात आले होते, मात्र त्यांचे देखील नेते उपस्थित नसल्याचे दिसून आले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment