मारकडवाडीत शरद पवारांनी विकास पाहावा, बोटींगचाही लाभ घ्यावा:मोहिते यांनी बुडवलेल्या पतसंस्थाही पाहण्याचे भाजपचे आवाहन
शरद पवार हे मारकडवाडीला येत आहे. येथे त्यांनी बोटींग पर्यटन केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी केले आहे. सध्या राज्याच्या राजकारणात मारकवाडीवरुन चांगलेच राजकारण तापवले जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार मारकडवाडी गावाला भेट देण्यासाठी जाणार आहे. मात्र, या त्यांच्या भेटीच्या आधीच मारकडवाडी गावात देवेंद्र फडणवीस आणि राम सातपुते यांचे बॅनर लागले आहेत. तसेच सातपुते यांनी एका पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांना पाच वर्षात केलेल्या विकास कामांची पाहणी करण्याचे आवाहन केले आहे. लोकशाहीचे दडपवण्याचे काम या आधी देखील झाले होते आणि आता देखील होत आहे. 2014 पासून हे सर्व सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. त्यामुळेच मारकडवाडी येथून लाँग मार्च काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा जनतेचा, बहुमताचा कौल नसल्याचा देखील दावा आघाडीने केला आहे. त्यामुळे या विरोधात आवाज उठवणार असल्याचा निर्णय आघाडीने घेतला आहे. मारकडवाडी येथून सुरु होणाऱ्या लाँग मार्चसंदर्भात आघाडीत चर्चा करण्यात येत आहे. राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हा मार्च काढण्यात येणार आहे. यात उद्धव ठाकरे आणि शरद पवार देखील उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मारकडवाडीत बोटींग पर्यटन केंद्राचा लाभ घ्यावा – सातपुते या संदर्भात माजी आमदार राम सातपुते यांनी एका पोस्ट करत शरद पवार यांना बोटींगचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये सातपुते यांनी म्हटले की, ‘उद्या मारकडवाडीत मा.शरद पवार साहेब येणार आहेत. मी केलेल्या विकास कामाची पाहणी करायला. मागील 5 वर्षात 21 कोटी 89 लाख रुपयांची विकासकामे आम्ही मारकडवाडी मध्ये केली . मा.पवार साहेब मारकडवाडी मध्ये आम्ही बोटींग पर्यटन केंद्र पण सुरू केल आहे त्याचा पण आपण लाभ घ्यावा. मोहिते पाटलांचा हा खोटा Narrative चालणार नाही. उद्या येणारच आहात तर मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था, अकलूज परिसरातील मोहितेंनी शेतकऱ्यांच्या लुटलेल्या जमिनी, शेतकऱ्यांना लुटत असलेले कारखाने पण पहावेत. शेतकऱ्यांनी कष्टाने उभा केलेला आणि उत्तम जानकर यांनी विकलेला चांदापुरी साखर कारखाना पण पहावा.’