बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्याला विरोध:महामेळावा दडपण्यासाठी शहरात जमावबंदी, उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा

बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्याला विरोध:महामेळावा दडपण्यासाठी शहरात जमावबंदी, उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा

बेळगाव शहरात सोमवारी मराठी भाषकांच्या महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. मात्र, याला कर्नाटक पोलिसांनी बंदी घातली आहे. बेळगाव शहरात ज्या पाच ठिकाणी पार पडण्याची शक्यता आहे त्या सर्व ठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जमावबंदीचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई देखील केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. बेळगाव शहरात सोमवारपासूनच विधानसौध या ठिकाणी कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. तसेच याच दिवशी मराठी भाषकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केला आहे. जिथे जिथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे तिथे जमावबंदी लावण्यात आली आहे. तसेच याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिलेला असूनही महामेळावा घेणारच असा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा बेळगाव येथील संभाजी चौक येथे सोमवारी सकाळी 11 वाजता होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील धर्मवीर संभाजी चौक, छत्रपती संभाजी उद्यान, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, लेले ग्राउंड, व्हॅक्सिन डेपो अशा पाच ठिकाणी जमाव बंदीचा आदेश लागू केला आहे. या ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यावर बंदी घातली आहे. एकीकरण समितीचे नेते आर.एम.चौगुले यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, महाराष्ट्रात जाण्यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. महाराष्ट्रात गेल्यावरच हे आंदोलन बंद होईल. यापूर्वी देखील अनेकदा पोलिस खात्याने दबाव तंत्र वापरून आंदोलनाला आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. पण त्याला मराठी माणसाने दाद दिली नाही. कोणत्याही परिस्थितीत सोमवारी आम्ही महामेळावा करणारच. महाराष्ट्रातील नेत्यांना देखील बेळगाव येथे जाण्यास बंदी असल्याची माहिती समोर आली आहे. या मेळाव्यासाठी कोल्हापूर येथून मोठ्या संख्येने शिवसैनिक जाणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र कर्नाटक पोलिस यांना सीमेवरच अडवण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमवारी आता नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment