आघाडीत ठाकरे गटाने भूमिका का बदलली?:सपा आमदार रईस शेख यांचा प्रश्न; तर इतरांनी न बोलण्याचा जितेंद्र आव्हाडांचा सल्ला

आघाडीत ठाकरे गटाने भूमिका का बदलली?:सपा आमदार रईस शेख यांचा प्रश्न; तर इतरांनी न बोलण्याचा जितेंद्र आव्हाडांचा सल्ला

विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीतील वाद समोर आला होता. आघाडीतील एकाही आमदाराने शपथ न घेण्याची भूमिका घेतलेली असताना समाजवादी पक्षाच्या दोन्ही आमदारांनी मात्र, शपथ घेत आघाडीला घराचा आहेर दिला होता. त्यानंतर सपाचे आमदार अबू आझमी यांनी ठाकरे गटावरही टीका केली हेाती. त्याला उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी समाजवादी पक्षावर टीका केली होती. आता हा मुद्दा चांगलाच तापत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सर्वांना या प्रकरणात शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. समाजवादी पक्ष विरुद्ध ठाकरे गट असे आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांनी केलेल्या पोस्टमुळे आघाडीतील मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. त्यात ठाकरे गटाने हिंदूत्त्वाचा मुद्दा का पुढे केला? असा प्रश्न आमदार रईस शेख यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे समाजवादी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. समाजवादीचे दोन्ही आमदार आमच्या सोबत – आव्हाड महाविकास आघाडीमध्ये कोण काय म्हणत याला सध्या तरी जास्त महत्त्व देऊ नये. राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तिघांनी जर काही म्हटले तरच त्याला महत्त्व दिले जाईल. मात्र आघाडीतील घटक पक्षांबाबत कोणीही काही बोलू नये, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर आपण त्यांच्याशी बोलून योग्य तो मार्ग काढणार असल्याचे आव्हाड यांनी म्हटले आहे. मात्र समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदार हे आमच्या सोबत असल्याचा दावा देखील जितेंद्र आव्हाड यांनी केला. ठाकरे गटाने भूमिका का बदलली – रईस शेख रोहित पवार यांनी केलेल्या पोस्टविषयी आम्ही सहमत असल्याचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांनी भूमिका का बदलती? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ठाकरे गटाने पुन्हा एकदा हिंदूत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. यावरुन सपा आणि ठाकरे गटात आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. मात्र, महाविकास आघाडीमध्ये असे विषय घ्यायचे नाही, असे समान कार्यक्रमांतर्गत ठरले होते. अशी आठवण देखील शेख यांनी करून दिली. त्यामुळे अशी कोणतीच भूमिका महाविकास आघाडीतील घटक पक्षाने घेऊ नये, असे आवाहन देखील त्यांनी केले. हिंदुत्वाचा जागर करण्याची नौटंकी – गुलाबराव पाटील आपल्या हातातून हिंदुत्वाचा मुद्दा सुटत असल्याचे दिसत असल्याने उद्धव ठाकरे याचयां पक्षाने समाजवादी पक्षावर आरोप केले आहेत. हिंदुत्वाचा जागर करण्यासाठी त्यांनी पुन्हा तोंड बाहेर काढले असल्याचे शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. महानगरपालिका हा पोपटातला जीव आहे. त्यामुळे हा जीव त्यांना हवा आहे. त्यामुळेच आम्ही हिंदुत्वाचे पुरस्कर्ते असल्याचे आणि हिंदुत्वाचा जागर करण्याची नौटंकी करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले. मात्र, आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांचा विधानसभेप्रमाणेच पुन्हा पराभव होणार असल्याचा दावा देखील पाटील यांनी केला आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment